‘रावते साहेब सांगा... दिवाळी करायची कशी?

‘रावते साहेब सांगा... दिवाळी करायची कशी?

कोल्हापूर - ड्यूटीवर असताना झालेल्या अपघातामुळे खचून गेलेल्या दोन महिला कंडक्‍टरांनी आज आपल्या व्यथांना वाट मोकळी केली. दोन वेगवेगळ्या अपघातांत लाखो रुपये खर्च झाल्याची सल त्यांच्या मनात होती. एका महिला कंडक्‍टरचा उजवा हात दंडाचे लिगामेंट तुटले गेले, तर दुसऱ्या महिला कंडक्‍टरला मांडी घालून बसता येत नाही, अशी स्थिती आहे. दिवाळीचा अडीच हजार रुपयांचा बोनस व कौटुंबिक खर्च यांचा ताळमेळ बसविताना होणारी परवड याविषयीची नाराजी त्यांनी व्यक्त केली. ‘सांगा रावते साहेब, आम्ही दिवाळी साजरी कशी करायची,’ असा प्रश्‍नच त्यांनी उपस्थित केला. 

कमी वेतनात कुटुंबाचा खर्च करणे कठीण 
 किणी (ता. हातकणंगले) येथील अनुराधा परीट या तेरा वर्षांपूर्वी कंडक्‍टर म्हणून एस. टी. सेवेत दाखल झाल्या. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंतचे. तीन वर्षांपूर्वी त्या कोल्हापूर-वडगाव गाडीतून जात होत्या. गाडी दाभोळकर कॉर्नरला गेल्यानंतर अचानक गाडीच्या आडवे कोणीतरी आले आणि ड्रायव्हरने ब्रेक मारला. त्यामुळे प्रवाशांची तिकिटे काढणाऱ्या परीट थेट गाडीच्या पुढच्या दरवाजातील पायऱ्यांवर जाऊन कोसळल्या. त्यांच्या दंडातील लिगामेंट मोडले. उपचारासाठी त्यांना अडीच लाख रुपये खर्च आला. मुळात वेतन साडेसात हजार रुपये आणि खर्च अडीच लाख, हा हिशेबच त्यांच्या डोक्‍यात भणभणत होता. आई-वडिलांची एकुलती असल्याने पतीसह त्या किणीमध्येच राहतात. त्या व त्यांचे पती महादेव परीट आई-वडिलांचा सांभाळ करतात. परीट म्हणाल्या, ‘‘कमी वेतनात कुटुंबाचा खर्च चालवणे कठीण आहे. महिला कंडक्‍टरांचे दुखणे काय असते, हे समजावून घ्यायला पाहिजे. संपामुळे प्रवाशांचे हाल आम्हालाही नकोत. पण, आमच्या मागण्यांचा विचार होणार तरी कधी?’’  

खर्चात काटकसर नित्याचीच 
 संजीवनी जाधव या पाडळी-अंबपच्या. शिवाजी विद्यापीठातून त्यांनी एम.ए.ची पदव्युत्तर पदवी घेतली. बारा वर्षांपूर्वी त्या एस. टी.मध्ये भरती झाल्या. काही वर्षांपूर्वी कामावर येताना त्यांचा अपघात झाला. तरीही त्याच अवस्थेत त्या कामावर आल्या. दुसऱ्या दिवशी पाठीच्या दुखण्याने त्यांचा जीव हैराण झाला. दवाखान्यात गेल्यानंतर खुब्याला जोरदार मार बसल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. उपचाराचा खर्च साडेतीन लाखांवर झाला. त्यांची मुलगी दहावी, तर मुलगा सातवीला आहे. त्यांच्या शिक्षणाचा खर्च पेलताना त्यांना काटकसर करावी लागते. त्यात हा खर्च त्यांच्या आवाक्‍याबाहेरचा ठरला. त्यासह शस्त्रक्रियेनंतर पुढील आयुष्यात मांडी घालून बसता येणार नाही, या डॉक्‍टरांच्या वाक्‍याने त्यांना धक्का बसला. काही दिवस आरक्षण खिडकीवर त्यांनी काम केले. आता पुन्हा कंडक्‍टर म्हणून त्यांना काम करावे लागणार आहे. त्या म्हणाल्या, ‘‘महिला कंडक्‍टरचे काम जोखमीचे आहे. तिकिटाच्या जमलेल्या पैशांचा पै न्‌ पै हिशेब द्यावा लागतो. एक रुपया जरी कमी आला, तर दंड आकारला जातो.’’ 

दिवाळीसाठी अडीच हजार रुपये बोनस मिळाला. मुलगा, मुलगी व आईला घेऊन बाजारात गेले. मुलीने बावीसशे रुपयांच्या ड्रेसकडे बोट दाखविले. त्यामुळे बाजारातून पुन्हा थेट घर गाठले. अडीच हजार रुपयांत दिवाळी साजरी करता येत नाही, हे कुणाला सांगायचे आम्ही? आमचा संप आमच्या न्याय्य मागण्यांसाठी आहे. प्रवाशांचे हाल करण्याचा आमचा हेतू मुळीच नाही. फक्त प्रवाशांनीसुद्धा आमच्या वेदना समजून घ्याव्यात. 
- उमा सडोले, महिला कंडक्‍टर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com