वनक्षेत्रपाल, वनपालांची चौकशी सुरू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

कोल्हापूर - महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतील रोपे वन व्यवस्थापनात दाखवून गैरव्यवहार करणाऱ्या पेंडाखळे वनक्षेत्रपाल, वनपाल आणि वनरक्षकांसह वृक्ष लागवडीत ७० लाखांचा घोटाळा करणाऱ्यांचीही चौकशी सुरू केली असल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी दिली. 

कोल्हापूर - महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतील रोपे वन व्यवस्थापनात दाखवून गैरव्यवहार करणाऱ्या पेंडाखळे वनक्षेत्रपाल, वनपाल आणि वनरक्षकांसह वृक्ष लागवडीत ७० लाखांचा घोटाळा करणाऱ्यांचीही चौकशी सुरू केली असल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी दिली. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी (ता. १) येथील शेंडापार्क येथे यावर्षीच्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

श्री. पाटील म्हणाले, ‘‘पेंडाखळेमध्ये काही कामे अनियमित झाली असतील तर त्याची सखोल चौकशी केली जात आहे. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होते, त्यामध्ये काही ठिकाणी असे प्रकार झाले असतील तर त्याचा शोध घेतला जाईल.’’ सरकारच्या चार कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत ऑगस्ट २०१७ अखेर १९ लाख ७७ हजार रोपे शिल्लक होती. हिच रोपे मे २०१८ अखेर ११ लाख १ हजार शिल्लक असल्याची दाखवली आहेत. त्यामुळे तब्बल ८ लाख ५९ हजार रोपे कोठे गायब झाली, याबाबत ‘सकाळ’ने २७ जून २०१८ ला वृक्ष लागवडीत ७० लाखांचा घोटाळा असे वृत्त प्रसिद्ध केले होते. याची विचारणा केल्यानंतर मात्र पाटील यांनी याचीही चौकशी सुरू असल्याचे सांगून याचे उत्तर उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्‍ला देतील म्हणून बाजू काढली.

यावर सर्व तालुक्‍यांमधील आकडेवारी घेतली जात आहे. यामध्ये काही अंशी दोष असल्याचा संशय आहे; पण चौकशीनंतर सर्व चित्र स्पष्ट होईल, असे शुक्‍ला यांनी सांगितले. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार उपस्थित होते.

 

Web Title: Kolhapur News inquiry of Forestry man, forester