योग-ध्यान शिकण्यासाठी तरूणाईही अग्रेसर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

कोल्हापूर - योग आणि विविध ध्यानपध्दती शिकण्यासाठी आता तरूणाईचाही सहभाग वाढला आहे. त्याशिवाय शालेय विद्यार्थ्यांनाही योगाचे प्रशिक्षण शाळाशाळांत दिले जावू लागले आहे. त्यासाठी खास योगशिक्षकांच्या नेमणूका केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील योग प्रशिक्षणाचा आढावा घेतल्यानंतर दोन हजारहून अधिक योगप्रशिक्षक जिल्ह्यात सातत्याने प्रशिक्षण देत असल्याचे सकारात्मक चित्र पुढे आले. 

कोल्हापूर - योग आणि विविध ध्यानपध्दती शिकण्यासाठी आता तरूणाईचाही सहभाग वाढला आहे. त्याशिवाय शालेय विद्यार्थ्यांनाही योगाचे प्रशिक्षण शाळाशाळांत दिले जावू लागले आहे. त्यासाठी खास योगशिक्षकांच्या नेमणूका केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील योग प्रशिक्षणाचा आढावा घेतल्यानंतर दोन हजारहून अधिक योगप्रशिक्षक जिल्ह्यात सातत्याने प्रशिक्षण देत असल्याचे सकारात्मक चित्र पुढे आले. 

पतंजली योग समितीचे पाचशेहून अधिक योग शिक्षक जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्याशिवाय दीड हजारांवर प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना समितीच्या माध्यमातून योगाचे प्रशिक्षण दिले आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने 35 मिनिटांचा अभ्यासक्रम निश्‍चित केला असून हा अभ्यासक्रमही समितीच्या माध्यमातून शिकवला जातो. त्याशिवाय समितीच्या माध्यमातून दीडशेहून अधिक योग प्रशिक्षणाचे स्थायी वर्ग चालवले जातात. 

योग विद्या धामच्या माध्यमातून जिल्ह्यात दीड हजारांवर योग शिक्षक असून शहरात दोन ठिकाणी स्थायी वर्ग चालवले जातात. त्याशिवाय जिल्ह्यात योग, योगोपचार वर्गासह शुध्दिक्रिया शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी उंची व बुध्दीसंवर्धन वर्ग, ध्यान शिबिरांचे आयोजन सातत्याने केले जाते. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या वतीने शहरात महिन्यातून किमान चार ते पाच शिबिरांचे आयोजन केले जाते. या तीन प्रातिनिधीक संस्था असल्या तरी शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही वर्षात योग आणि ध्यानाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली असून कोल्हापूरकरांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी त्याचा निश्‍चितच फायदा होतो आहे. 

सलग अकरा वर्षे  मोफत योग प्रशिक्षण...! 
शिवाजी पेठेतील शिवाजी तरूण मंडळाच्या सहकार्याने बाळासाहेब सासने यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत योग प्रशिक्षणाच्या उपक्रमाने यंदा अकरा वर्षे पूर्ण केली आहेत. ऋतू कोणताही असो सकाळी सहा ते साडेसात या वेळेत हा वर्ग एकही दिवस न चुकता होतो. या वर्गातून आजवर परिसरातील दहा हजारांवर कोल्हापूरकरांना योगाचे प्रशिक्षण मिळाले असून योगशिक्षकांची पुढची फळीही आता तयार झाली आहे. 

योगशिक्षक विलासराव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अकरा वर्षापूर्वी मोफत योग वर्गाला प्रारंभ झाला. श्री. सासने या वर्गातूनच योग शिकले आणि योगशिक्षक म्हणून काम करू लागले. स्वतःच्या विविध शारिरीक व्याधी दूर झाल्याच शिवाय परिसरातील अनेकांना योग वर्गात येवून शिकण्याचे आवाहन केले. व्याधीमुक्तीबरोबरच वाढत्या वयात दिवसभर उत्साह टिकवून ठेवण्यासाठी या वर्गाचा फायदा होतो, असे ते सांगतात. पूर्वी ब्रम्हेश्‍वर मंदिराजवळ वर्ग चालायचा. पण, आता शिवाजी तरूण मंडळाच्या सभागृहात दररोज हा वर्ग सुरू आहे. पतंजली योग समितीचा एक तासाचा अभ्यासक्रम येथे शिकवला जातो. श्री. सासने यांच्यानंतर आता श्रुती खांडेकर, नितीन खराडे, साधना खराडे, उल्का साळोखे योगशिक्षक म्हणून काम करू लागले आहेत. दररोज किमान पस्तीस लोक या वर्गात नियमित योगासनांसाठी येतात. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिवाजी मंदिरसह कोल्हापूर हायस्कूल आणि संजीवन इंग्लीश मीडियम स्कूल येथे योग शिबिरे घेतली जाणार आहेत. 

एक व्यक्ती जरी आला तरी त्याला शिकवायचेच पण वर्ग बंद राहता कामा नये, याची खबरदारी घेतली आणि एक स्थायी योग वर्ग आम्ही आकाराला आणू शकलो. 
- बाळासाहेब सासने, योग प्रशिक्षक.

Web Title: kolhapur news International Yoga Day youth