कोल्हापुरातील गुंतवणूकदारांची डीएसकेंविरोधात पोलिसांत धाव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - पुण्यातील डीएसके ग्रुपमध्ये गुंतवणूक केलेल्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी २७५ गुंतवणूकदारांनी राजारामपुरी पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. दरम्यान, हे सर्व गुंतवणूकदार डीएसके ग्रुपवर गुन्हा दाखल करणार होते. आज फिर्याद देण्याची शक्‍यता आहे. 

कोल्हापूर - पुण्यातील डीएसके ग्रुपमध्ये गुंतवणूक केलेल्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी २७५ गुंतवणूकदारांनी राजारामपुरी पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. दरम्यान, हे सर्व गुंतवणूकदार डीएसके ग्रुपवर गुन्हा दाखल करणार होते. आज फिर्याद देण्याची शक्‍यता आहे. 

वीस वर्षांपासून कोल्हापुरातील सुमारे २०० कोटींची गुंतवणूक डीएसके ग्रुपमध्ये केली आहे. दोन दिवसांपासून पुणे व मुंबई येथे डी. एस. के. यांच्या घरावर छापे टाकण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे कोल्हापुरातील गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे. ज्यांनी या ग्रुपमध्ये गुंतवणूक केली आहे. त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कोल्हापुरातील सुमारे ६०० गुंतवणूकदारांनी १ लाखापासून ५ कोटींपर्यंत डीएसकेमध्ये गुंतवणूक केली आहे. ही रक्कम अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे आपल्या ठेवींची रक्कम परत मिळण्यासाठी धडपड सुरू आहे, मात्र दाद कोणाकडे मागायची यापेक्षा थेट डीएसके विरुद्ध गुन्हा दाखल करूनच न्याय मिळावा यासाठी जिल्ह्यातील आतापर्यंत २७५ गुंतवणूकदारांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

गुंतवणूकदार असोसिएशनच्या वतीने काल केलेल्या आवाहनानुसार आज जिल्ह्यातील शेकडो गुंतवणूकदार शहरात आले. अकरापासून सर्व गुंतवणूकदार एकत्र येऊ लागले. उद्या (सोमवारी) आणखी गुंतवणूकदार एकत्र येणार असल्याचे गुंतवणूकदार असोसिएशनचे अध्यक्ष बी. डी. किल्लेदार यांनी सांगितले. राजारामपुरी येथे जमलेल्या गुंतवणूकदारांच्या गर्दीमुळे या परिसरात लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. 

गुन्हा दाखल करताना वैयक्तिक गुन्हा दाखल करून घ्यावा, त्यानंतर सामूहिक गुन्हा दाखल केला जाईल, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रत्येक गुंतवणूकदाराची गुंतवणूक वेगवेगळी आहे. त्यामुळे ही भूमिका घेतली जाणार आहे. 
-ॲड. सत्यजित पवार

Web Title: Kolhapur News investors complain against DSK in police