आयसोलेशनमध्ये गारवा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

कोल्हापूर - आजाराने बेजार आणि उकाड्याने हैराण झालेल्या रुग्णांना आजपासून गारवा मिळाला. ‘सकाळ’मध्ये ‘रुग्ण आजाराने बेजार आणि उकाड्याने हैराण’ अशी बातमी प्रसिद्ध होताच राजस्थानी जैन मारवाडी समाज आणि आमदार अमल महाडिक यांनी तातडीने  दखल घेतली. राजस्थानी जैन समाजाने २५ तर आमदार अमल महाडिक यांनी १५ पंखे रुग्णालयाला भेट दिले.

कोल्हापूर - आजाराने बेजार आणि उकाड्याने हैराण झालेल्या रुग्णांना आजपासून गारवा मिळाला. ‘सकाळ’मध्ये ‘रुग्ण आजाराने बेजार आणि उकाड्याने हैराण’ अशी बातमी प्रसिद्ध होताच राजस्थानी जैन मारवाडी समाज आणि आमदार अमल महाडिक यांनी तातडीने  दखल घेतली. राजस्थानी जैन समाजाने २५ तर आमदार अमल महाडिक यांनी १५ पंखे रुग्णालयाला भेट दिले. दोनच दिवसांत पंखे रुग्णालयात बसल्याने रुग्णांतून समाधान व्यक्त होत आहे.

आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये पंख्याविना रुग्णांचे उकाड्यात हाल होत असल्याची बातमी ‘सकाळ’मध्ये १० मे रोजीच्या अंकात प्रसिद्ध झाली. बातमीत कोणी पंखे देईल का? असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद राजस्थानी जैन मारवाडी समाजाने, अंतिम सेवा दल, तसेच आमदार अमल महाडिक यांनी चांगला प्रतिसाद दिला. राजस्थानी जैन मारवाडी समाजाने २५ पंखे दिले, तर आमदार अमल महाडिक यांनी १५ पंखे दिले. रुग्णालयातील ३४ खोल्यांतील पंख्याबरोबरच इतर काही वॉर्डांतही पंखे बसविले. राजस्थानी जैन समाजाने रुग्णालयात पंखे दिले.

मी कावीळचा उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले. शिये येथून येथे उपचारासाठी मी आले. काविळीवर चांगला उपचार होतो, असे ऐकले होते; पण येथील खोल्यांमध्ये पंखेच नव्हते. उकाड्याने हैराण होत होते. आज पंखे बसल्याने समाधान वाटले.
- पूनम मगदूम,
शिये, रुग्ण.

या वेळी नगरसेवक ईश्‍वर परमार, जवाहर गांधी, अशोक ओसवाल, दिलीप ओसवाल, माणिक ओसवाल, प्रवीण ओसवाल, रतनलाल परमार, राजेश राठोड, प्रकाश परमार, कांतिलाल ओसवाल, प्रकाश ओसवाल आदी उपस्थित होते. सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथील डॉक्‍टर रमेश जाधव यांच्याकडे पंखे दिले. 

आमदार अमल महाडिकांकडून 15 पंखे 
आमदार अमल महाडिक यांनी रुग्णालयासाठी १५ पंखे दिले. तसेच रुग्णालयात एलईडी ट्यूब बसविल्या. खराब झालेले स्विचही बदलून दिले.

Web Title: Kolhapur News issue of fans in Isolation hospital