कोल्हापूरातील झूम कचऱ्याच्या ढिगाला आग नित्याचीच

सुधाकर काशीद
सोमवार, 8 जानेवारी 2018

कोल्हापूर - कचरा एक-दोन महिने नव्हे, तर दहा-बारा वर्षे साठलेला... हा कचरा पाच ते सहा लाख टन म्हणजे एखाद्या डोंगराएवढा. या कचऱ्यात रोज दहा ते बारा टनांची भर ठरलेली. यापैकी एक चिमूटभर कचराही येथून हलविला जात नाही. अशा परिस्थितीत कचऱ्याच्या ढिगाला आग नित्याची झाली.

कोल्हापूर - कचरा एक-दोन महिने नव्हे, तर दहा-बारा वर्षे साठलेला... हा कचरा पाच ते सहा लाख टन म्हणजे एखाद्या डोंगराएवढा. या कचऱ्यात रोज दहा ते बारा टनांची भर ठरलेली. यापैकी एक चिमूटभर कचराही येथून हलविला जात नाही. अशा परिस्थितीत कचऱ्याच्या ढिगाला आग नित्याची झाली. मात्र, हे म्हणायला सोपे असले तरी त्याचा धूर व दर्प यामुळे धुराचा एक ढगच तेथे तयार झाला. कचऱ्याचे वर्गीकरण व त्यावर प्रक्रिया करायला पुरेशी जागा नसल्याने ही परिस्थिती उद्‌भवली आहे. 

आज तर एखाद्या ज्वालामुखीतून निघावा, तसा धुराचा लोट बाहेर पडू लागला आहे. विशेष हे, की विद्यमान महापौर स्वाती यवलुजे यांच्या प्रभागातच हा कचऱ्याचा मोठा साठा आहे. शहरात भविष्यात रोज कचरा किती साठेल, त्याला किती जागा लागेल याचे पुरेसे नियोजन न करता केवळ सात ते आठ एकरांत हा कचऱ्याचा साठा केला गेला. कचरा काढायला, त्याचे वर्गीकरण करायला, त्यावर प्रक्रिया करायलाच जागा नसल्याने "झूम' हा कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प बंद पडला आणि हा रोज 20 टनांनी वाढत आहे. कचरा टाकायला नवीन पुरेशी जागाच मिळत नाही, हे यामागचे खरे दुखणे आहे. अशा परिस्थितीत दबलेल्या कचऱ्यात मिथेन वायू व तो ज्वालाग्रही असल्याने त्यामुळे आग लागणार, हे स्पष्टच आहे; पण तरीही केवळ वरवरचे उपचार सुरू आहेत. या परिसरात वस्तीही खूप दाट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना तर रोज धूर आणि दर्प याच्याशी सामना करावा लागतो आहे. 

कचरा टाकण्यासाठी टोपच्या जागेचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात आहे. टोप खाणीची जागा वर्गीकरण केलेला कचरा टाकण्यासाठी मिळाली तर मोठा प्रश्‍न सुटणार आहे. आता फेब्रुवारीपासून खासगी तत्त्वावर कचऱ्यापासून वीजनिर्मिती सुरू होईल. त्यामुळेही थोडा फार कचरा कमी होईल. 
- डॉ. विजय पाटील,
मुख्य आरोग्य निरीक्षक, कोल्हापूर महापालिका 

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी "झूम' प्रकल्प कार्यरत होता; पण कचऱ्यावर प्रक्रिया खतनिर्मितीनंतर उरलेला कचरा टाकायचा कोठे, हा पहिल्यापासूनचाच प्रश्‍न होता. या प्रश्‍नावर कायमस्वरूपी तोडगा न काढता आहे त्यात ऍडजस्ट करण्याची भूमिका महापालिका घेत राहिली. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. रोज पंधरा ते वीस टन कचरा याठिकाणी भर घालत राहिला आणि कचऱ्याचा हा ढीग आकाशाला भिडायला निघाला. 
या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर उरलेला जो इनहर्ट कचरा राहतो, तो टाकण्यासाठी पुरेशी जागाच नाही. मध्यंतरी अशी जागा टोपमध्ये मिळाली होती. याठिकाणी दगडाची खाण होती. या खाणीत कचरा टाकण्यास विरोध झाला.

कोल्हापूरचा कचरा आमच्या गावच्या हद्दीत का? याबरोबरच प्रदूषण व आरोग्याचा प्रश्‍न पुढे करून याठिकाणी कचरा टाकण्यास विरोध झाला. त्यामुळे कचरा आहे तेथेच आहे. रोज एक थर त्यावर वाढतच आहे. कचऱ्याच्या डोंगरातून घाटासारखा मार्ग तयार करून त्यावरून कचरा या डोंगरावर नेला जात आहे आणि कचऱ्यात जनावराचे मांस असल्याने त्यावर कुत्र्यांची झुंड पोसली गेली आहे. ही कुत्री इतकी हिंसक आहेत, की दिवस मावळला की कुत्र्यांच्या भीतीने या रस्त्यावरून कोणी जात नाही, अशी परिस्थिती आहे. 

 

Web Title: Kolhapur News issue of Fire to Zoom waste