कोल्हापूर पालिकेत एक्‍सरे फिल्मची परस्पर खरेदी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

कोल्हापूर - पालिकेच्या आरोग्य विभागाकडे आयुक्तांसह विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंजुरीविनाच सुमारे दीड लाखांच्या एक्‍सरे फिल्म परस्पर खरेदी केल्याचे प्रकरण उघडकीस आले असून हे प्रकरण प्रभारी आरोग्याधिकारी अरुण वाडेकर आणि लिपिक विजय कामिरे यांना भोवले आहे. दोघांचीही वेतनवाढ दोन वर्षांसाठी रोखण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी दिला आहे.

कोल्हापूर - पालिकेच्या आरोग्य विभागाकडे आयुक्तांसह विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंजुरीविनाच सुमारे दीड लाखांच्या एक्‍सरे फिल्म परस्पर खरेदी केल्याचे प्रकरण उघडकीस आले असून हे प्रकरण प्रभारी आरोग्याधिकारी अरुण वाडेकर आणि लिपिक विजय कामिरे यांना भोवले आहे. दोघांचीही वेतनवाढ दोन वर्षांसाठी रोखण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी दिला आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडील लिपिक विजय कामिरे यांनी रुग्णालयासाठी लागणारी एक्‍सरे फिल्म आयुक्तांच्या मंजुरीविनाच मुंबई येथील मे. विनोद मेडिकल सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड, अंधेरी यांच्याकडून खरेदी केली आहे. सुमारे दीड लाख रुपयांच्या या खरेदीसाठी आयुक्तांची कोणत्याही प्रकारची मंजुरी नाही. ही बाब निदर्शनास आली. आरोग्याधिकारी डॉ. अरुण वाडेकर यांनीही याबाबत आयुक्तांना माहिती दिली नाही. याउलट थेट संबंधित फर्मलाच २२ नोंव्हेबर २०१६ ला रिक्विझिशन नोटीस देऊन माल ताब्यात घेण्यात आला होता. आयुक्तांच्या मंजुरीविना अशा प्रकारे माल खरेदी करणे चुकीचे आहे. प्रभारी आरोग्याधिकारी वाडेकर आणि लिपिक कामिरे यांचे हे वर्तन बेशिस्त तसेच आर्थिक शिस्तीचा भंग करणारे आहे. या प्रकरणी आयुक्तांनी १८ जानेवारी २०१८ ला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर त्यांनी खुलासा दिला.

दरम्यान, या प्रकरणी आयुक्त डॉ. चौधरी यांनी या दोघांचीही देय असणारी एक वेतनवाढ दोन वर्षांसाठी रोखण्याचा आदेश दिला आहे. या दोघांनीही पुन्हा अशी चूक केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही या नोटीसमध्ये म्हटले आहे.

नको त्या खरेदीकडेच कल
महापालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार संशयास्पदच आहे. नको त्या औषधांची खरेदी करण्याकडे येथे मोठा कल असतो; तर लोकांना हवी ती औषधे मात्र येथे उपलब्ध नसतात. त्यामुळे बऱ्याचदा रुग्णांना बाहेरच्या चिठ्ठ्या दिल्या जात आहेत. एकेकाळी चांगले चालणारे सावित्रीबाई फुले हॉस्पिटल आता मात्र हळूहळू ओस पडू लागले आहे. परंतु, गरीब रुग्णांच्या उपचारासाठी हे रुग्णालय सुस्थितीत असणे आवश्‍यकच आहे. त्यामुळे येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बारीक लक्ष हवे. नवीन पदाधिकारी आले, की तेही या रुग्णालयाला भेट देतात, पाहणी करतात. पण, मूळ समस्या काही केल्या सुटत नाहीत.

सिव्हिल कामावरच खर्च जास्त
सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये सुधारणा करण्याच्या नावाखाली सिव्हिल कामावरच जास्त खर्च केला जातो. रुग्णालय अवाढव्य जागेत सुरू आहे. प्रत्यक्षात अनेक हॉल आणि खोल्या रिकाम्याच आहेत. त्यामुळे देखभाल करणे जिकिरीचे आहे. देखभालीच्या नावावर सिव्हिल कामावरच खर्च जास्त केला जातो. वैद्यकीय सोयी-सुविधा, औषधे यावरचा खर्च मात्र तुलनेत कमी होत आहे. त्यामुळे लोकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांवर परिणाम होत आहे.

Web Title: Kolhapur News issue of purchase of X-ray film