गूळ उत्पादनाला वातावरणाचा फटका

राजकुमार चौगुले
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

कमी पाऊस, रोगाचा परिणाम - तीस टक्‍क्‍यांपर्यंत उत्पादन घटण्याचा अंदाज
कोल्हापूर - कमी पाऊस व रोगामुळे ऊस उत्पादनावर परिणाम होणार असल्याने त्याचा फटका यंदाच्या गूळ उत्पादनालाही बसण्याची शक्‍यता आहे. ऊस उत्पादन घटल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुळाचे उत्पादन ३० टक्‍क्‍यांपर्यंत घटण्याचा अंदाज गूळ उद्योगातून व्यक्त केला जात आहे. 

कमी पाऊस, रोगाचा परिणाम - तीस टक्‍क्‍यांपर्यंत उत्पादन घटण्याचा अंदाज
कोल्हापूर - कमी पाऊस व रोगामुळे ऊस उत्पादनावर परिणाम होणार असल्याने त्याचा फटका यंदाच्या गूळ उत्पादनालाही बसण्याची शक्‍यता आहे. ऊस उत्पादन घटल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुळाचे उत्पादन ३० टक्‍क्‍यांपर्यंत घटण्याचा अंदाज गूळ उद्योगातून व्यक्त केला जात आहे. 

जिल्ह्यातील करवीर, कागल, पन्हाळा, गगनबावडा व राधानगरी तालुक्‍यांचा काही भाग हा गुळाचे आगार समजला जातो. गुळासाठी उपयुक्त जातीचा ऊस या भागात घेतला जातो. या तालुक्‍यांमध्ये इतर भागापेक्षा पाऊसही जास्त होतो. यंदा मात्र पाच ते सात दिवसांचा कालावधी वगळता पावसाळ्याचे संपूर्ण दिवस कोरडे गेले आहेत. यामुळे उसाची वाढ झालेली नाही. प्रतिकूल हवामानामुळे उसाच्या उताऱ्यात घट होण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम गूळ निर्मितीवर होईल. प्रतिकूल हवामानामुळे उसाची वाढ थांबल्याने लवकरच परिपक्व झाला आहे. याचा परिणाम गूळ उताऱ्यावर होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

गूळ दरात वाढ शक्‍य 
गेल्या वर्षीही गुळाचे दर तेजीत होते. गुळाला सातत्याने तीन हजार रुपये क्विंटलच्या वर दर मिळाला. यंदाही हीच परिस्थिती कायम राहील, असा अंदाज आहे. गुळाचा दर हा साखर कारखान्यांच्या दरावरही अवलंबून असतो. ‘एफआरपी’त वाढ झाल्याने यंदाही उसाचा दर गेल्या वर्षीपेक्षा जास्त मिळण्याचा अंदाज आहे.

यंदा उसाची वाढ झालेली नाही. यामुळे गेल्या वर्षीइतकेही गूळ उत्पादन निघेल, याची शाश्‍वती वाटत नाही. यंदा घट निश्‍चित आहे. 
- मनोज पाटील, गूळ उत्पादक, पाडळी

आम्ही गूळ संशोधन केंद्रावर नुकत्याच गुळासाठी लागवड केलेल्या काही जातींची वाढ तपासली आहे. अनेक जातींच्या उसाची वाढ अनपेक्षितरीत्या थांबून त्या आताच परिपक्व झाल्या आहेत. आणखी कालावधीनंतर हा ऊस खराब होत असल्याने गुळाच्या उत्पादनात उसाच्या वाढीअभावी घट होणार आहे.. 
- डॉ. अशोक पिसाळ, कृषी विद्यावेत्ता, प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र

सध्या गुजरात, राजस्थानमध्ये गुळाची मागणी कायम आहे. गूळ पट्ट्यात उसाच्या वाढीसाठी फारसे चांगले वातावरण नाही. यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्‍यता आहे. गूळ उत्पादन घटल्यास दरही नक्कीच वाढेल. 
- नीमेश वेद, गूळ व्यापारी, कोल्हापूर

Web Title: kolhapur news jaggery production loss by environment