कोल्‍हापुरात होणार गूळ टेस्टिंग लॅब - कृष्णात पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

कोल्हापूर - येणाऱ्या गुळाची प्रत राहावी, यासाठी लवकरच बाजार समितीत गूळ टेस्टिंग लॅब सुरू करण्यात येणार आहे. याचबरोबर गूळ उत्पादकाला चांगला दर मिळवून देण्यासाठी कोल्डस्टोअरच्या उभारणीसही प्राधान्य देत असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील यांनी दिली.

कोल्हापूर - येणाऱ्या गुळाची प्रत राहावी, यासाठी लवकरच बाजार समितीत गूळ टेस्टिंग लॅब सुरू करण्यात येणार आहे. याचबरोबर गूळ उत्पादकाला चांगला दर मिळवून देण्यासाठी कोल्डस्टोअरच्या उभारणीसही प्राधान्य देत असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील यांनी दिली.

महिन्यापासून गुळाचे दर घसरत आहेत. याबाबतीत विचारविनिमय करण्यासाठी बाजार समितीतर्फे गूळ उत्पादकांची बैठक बोलावण्यात आली, त्यात ते बोलत होते.
दर घसरल्याने गूळ उत्पादकांच्या संतापाचा सामना संचालकांना करावा लागला. संतप्त उत्पादकांनी गुळाच्या दरवाढीकडे काय करता येईल, याकडे गांभीर्याने पाहावे, असे सांगत संचालकांना धारेवर धरले. हमीभाव मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचा ठराव मंजूर केला. 

महिन्यापासून गुळाचे दर मोठ्या प्रमाणात घसरले. गुजरातच्या बाजारपेठेत बाहेरचा गूळ येत आहे. कोल्हापुरी गुळातही काही शेतकरी साखरेची भेसळ करून गूळ तयार करतात. याचा फटका सर्वांनाच बसत असल्याने असे प्रकार उत्पादकांनी टाळावेत. कोल्हापुरी गुळाचा ब्रॅंडला धोका उत्पन्न होईल, असा गूळ तयार करू नये यासाठी स्वत:च बंधने घालून घ्यावीत, असे आवाहन विलास साठे यांनी केले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भगवान काटे यांनी गूळ उत्पादकांच्या हितासाठी कोणालाही भेटण्याची तयारी आहे, असे सांगत असतानाच उत्पादक संजय पाटील यांनी भाषणबाजीपेक्षा दराचे काही तरी बोला, अशी मागणी करीत गूळ उत्पादक दराच्या खेळात भरडला जात असल्याचे सांगितले. 

काही दिवसांत चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींची भेट घेऊन चर्चा करण्याचे बाजार समिती प्रशासनातर्फे सांगण्यात आले. या वेळी श्रीकांत घाटगे, दादा पाटील, बी. जी. पाटील, बाळासाहेब पाटील आदींनी तीव्र भावना मांडल्या. या वेळी उपसभापती अमित कांबळे, सचिव दिलीप राऊत आदी उपस्थित होते.

... अन्यथा आंदोलन 
चार दिवसांत गुळाचे दर वाढवून मिळावेत, तसे न घडल्यास शासनाने गूळ दराबाबत हस्तक्षेप करावा, अन्यथा कोणत्याही क्षणी गूळ उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भगवान काटे, संजय जाधव, श्रीकांत घाटगे, शिवाजी पाटील आदींनी दिला.      

गूळ भाव परवडेनात 
गूळ उत्पादकांसाठी प्रतिटन उसासह चार हजार रुपये खर्च येतो. असे असताना प्रत्यक्ष गुळाला तीन हजार रुपये ते तीन हजार २०० रुपये दर मिळतो. हा दर अपेक्षेपेक्षा कमी आहे. यातून गूळ उत्पादकांचे ८०० ते १००० रुपये नुकसान होते. त्यामुळे गुऱ्हाळ घर चालविणे शेतकऱ्याला शक्‍य नाही. परिणामी, गुळाचे दर वाढवून मिळावेत, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

सौद्यावेळी संचालक उपस्थित राहणार
गूळ तपासताना तो चाकू लावून तपासला जातो, हे प्रकार रोखण्याची गरज असल्याची मागणी तानाजी आंग्रे यांनी केली. संचालकांनी एकदा तरी सौद्याच्या वेळी हजेरी लावावी, मग आमच्या व्यथा समजतील. तुम्ही आल्यानंतर दरात थोडी तरी वाढ झालेली तुम्हाला दिसेल, असे सांगताच अध्यक्ष श्री. पाटील यांच्यासह संचालकांनीही आम्ही सौद्याच्या वेळी उपस्थित राहू, असे कबूल केले.

Web Title: Kolhapur News Jaggery Testing lab