भुर्जपत्रावरील ग्रंथ अन्‌ हस्तलिखितांचा ठेवा...!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

कोल्हापूर - शुक्रवार पेठेतील लक्ष्मीसेन संस्थान मठाने केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य अशा क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जैनधर्मीयांचे प्रतिनिधित्व करणारा हा मठ प्राचीन तर आहेच; शिवाय गेल्या कित्येक वर्षांच्या कोल्हापूरच्या इतिहासाचा साक्षीदारही आहे. 

कोल्हापूर - शुक्रवार पेठेतील लक्ष्मीसेन संस्थान मठाने केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य अशा क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जैनधर्मीयांचे प्रतिनिधित्व करणारा हा मठ प्राचीन तर आहेच; शिवाय गेल्या कित्येक वर्षांच्या कोल्हापूरच्या इतिहासाचा साक्षीदारही आहे. 

मठाच्या प्रवेशद्वाराची कमान काळ्या पाषाणातील असून त्यावर अत्यंत कोरीव व सुंदर नक्षीकाम आहे. प्रवेशद्वारावर नगारेही आहेत. मठात प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवंतांची २८ फूट उंचीची मूर्ती आहे. ही मूर्ती राजस्थानात घडवण्यात आली. तेथून ती १९५९ ला कोल्हापुरात आणण्यात आली. एक स्वतंत्र गाडा तयार करून रेल्वे स्टेशनपासून मठापर्यंतच्या अरुंद रस्त्याने ती मठात आणली. १९६२ मध्ये कलकत्ता येथील नथमल पारसमल कासलीवाल यांच्या दानराशीतून ही मूर्ती उभी करण्यात आली. 

मठाच्या आतील बाजूस मध्यभागी जुने चंद्रप्रभः दिगंबर जिन मंदिर असून त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. एकाच दगडातून ४१ फूट उंचीचा चतुःमुखी मानस्तंभ आहे. मठात ज्वालामालिनीचे स्वतंत्र मंदिर असून मूर्ती प्राचीन आहे. मठात श्री लक्ष्मी श्रृत भांडार असून त्यात पंधराशे वर्षांपूर्वीची ग्रंथसंपदा, ताडपत्री ग्रंथ, हस्तलिखित, कन्नड, मराठी, संस्कृत, अर्धमागधी, प्राकृत, इंग्रजी ग्रंथ संपदा आहे. अलीकडेच बहुउद्देशीय प्रशस्त सभागृह (जैन भवन) बांधण्यात आले अिाहे. ते सर्वसुविधांनी युक्त आहे. 

मठात मराठी जैन साहित्याच्या प्रसारासाठी १९८४ ला महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेची स्थापना झाली आहे. जुन्या ग्रंथांतील मानवतावादी विचार साहित्यातून समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावा, हा त्यामागील मूळ उद्देश. 

नवे साहित्य निर्माण व्हावे व त्याचे वाचन सर्वधर्मीयांकडून व्हावे, यासाठी मठ प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे येथील दुर्मिळ ग्रंथ जपण्यासाठी तत्पर आहे. 
 

पाच हजारहून अधिक ग्रंथ
खरे तर मठाच्या विविध वैशिष्ट्यांमध्ये आवर्जून उल्लेख करावा लागतो, तो येथील प्राचीन धर्मग्रंथांचा. मठातील लक्ष्मीसेन ग्रंथालयात भुर्जपत्रावर लिहिलेले चारशेहून अधिक ग्रंथ आहेत. येथे चारशेदहाहून अधिक हस्तलिखिते आहेत. जैन विद्या व संस्कृती या विषयांवर सुमारे पाच हजार ग्रंथ मराठी, हिंदी, कन्नड व इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. देशातील विद्वानांसह परदेशातील अभ्यासकांना जैनधर्मीयांवरील अभ्यासासाठी हे ग्रंथालय उपयुक्त ठरते. त्यामुळे परदेशातील अभ्यासकही या ग्रंथालयाला भेट देतात.

Web Title: kolhapur news jain math history