काखेत कळसा... गावाला वळसा...

सुधाकर काशीद
गुरुवार, 22 मार्च 2018

कोल्हापूर - होती ती तळी बुजवली. मोठ्या सार्वजनिक विहिरीचा वापर कचरा कोंडाळ्यासारखा सुरू झाला. अनेक खासगी विहिरी नव्या बांधकामाच्या निमित्ताने विनावापर पडून राहिल्या. झुळूझुळू वाहणारे नैसर्गिक जलस्रोत थेट गटाराला मिळू लागले आणि ‘काखेत कळसा गावाला वळसा’ या म्हणीचा साक्षात्कार अनुभवण्याचे दिवस कोल्हापूरकरांच्या वाट्याला आले.

कोल्हापूर - होती ती तळी बुजवली. मोठ्या सार्वजनिक विहिरीचा वापर कचरा कोंडाळ्यासारखा सुरू झाला. अनेक खासगी विहिरी नव्या बांधकामाच्या निमित्ताने विनावापर पडून राहिल्या. झुळूझुळू वाहणारे नैसर्गिक जलस्रोत थेट गटाराला मिळू लागले आणि ‘काखेत कळसा गावाला वळसा’ या म्हणीचा साक्षात्कार अनुभवण्याचे दिवस कोल्हापूरकरांच्या वाट्याला आले.

आजही या क्षणी कोल्हापूरच्या जुन्या भागात दहा-बारा फूट खाली खोदले की, पाण्याचा मुसंडा बाहेर पडतो. काळाच्या ओघात दबून टाकलेले हे पाणी उसळी मारून वर येते अशी परिस्थिती आहे. आणि आपण कोल्हापूरकर मात्र एक दिवस पाणी पुरवण्यात खंड पडला तर पाण्यासाठीही दाही दिशा करतो आहे.

आज जलदिन आहे. पाण्याचा एक एक थेंब वाचवला तरच भविष्यात आपली पिढी वाचेल अशी परिस्थिती आहे. कोल्हापूरच्या काठाने पंचगंगा वाहते हे खरे आहे; पण कोल्हापूर शहराच्या भागाभागात दबल्या गेलेल्या पाणीसाठ्याचा वापर करण्याची गरज आहे.

हे पाणी पिण्यासाठी राहूदे, इतर कारणासाठी वापरले तर वापरून शिल्लक राहणार आहे. दबून राहिलेल्या पाण्याला वाट मिळणार आहे. तेथे पुनर्भरण होऊ शकणार आहे. पण कोटीच्या कोटी रकमेच्या किंबहुना पाण्यासारखा पैसा खर्च करून उभ्या राहणाऱ्या नव्या पाणी योजनांच्या आराखड्यातून थोडे आजूबाजूला पाहिलं तर पेठापेठांची रोजच्या रोज गरज भागवू शकतील, असे नैसर्गिक जलसाठे पुन्हा खुले करता येणे शक्‍य होणार आहे. आज शहराला भोगावतीतून पाणी उपसा करून पाणी मिळते, शहर लहान होते, तेव्हा कळंबा तलावातून पाणी मिळत होते हे खरे आहे. पण त्यापूर्वी हे शहर नैसर्गिक पाणी साठ्यावरच जगले हे वास्तव आहे. कळंबा तलावातून १८७० मध्ये खापराचे नळ घालून बाबूराव केशव ठाकूर या अंबाबाईच्या भक्ताने कोल्हापुरात पहिल्यांदा नळाने पाणी आणले, हा इतिहास आहे. पण तत्पूर्वी ज्या जलसाठ्यांचा वापर शहरात होत होता, त्याचे पुढे जतन झाले नाही. 

शिवाजी चौकात आयडीबीआय बॅंकेच्या खाली विहीर आहे. घुडणपीर दर्ग्यात १२ महिने वाहणारा झरा आहे. मिरजकर तिकटीला रिक्षा स्टॉपसमोर पानपट्टीच्या दुकानाखाली विहीर आहे. याशिवाय विठ्ठल मंदिरात दीक्षित विहीर, शेजारी कोडोलीकर विहीर, समोर राजगुरू विहीर आहे. वांगी बोळात आराध्येच्या घरात एका बाजूला महादेव मंदिर व त्या मंदिरात पाणी आहे. निवृत्ती चौकातील महादेव मंदिराचा भागही फूटभर पाण्यात आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालय म्हणजे पूर्वीची हत्ती बांधण्याची जागा. तेथे आजही तुडुंब भरलेली विहीर आहे. समोरच रिकीबदार गल्लीत एक विहीर आहे.

शनिवार पोस्टाजवळ मठ तालीम येथे १२ महिने भरून वाहणारी विहीर आहे. टाऊन हॉल बागेतून कुकुटेश्‍वर हा नैसर्गिक झरा तर पिढ्यान्‌ पिढ्या वाहतो आहे. उत्तरेश्‍वरावर रहाटगाडग्याची विहीर आहे. गंगावेशीत डिग्रजकर यांच्या वाड्यातून १२ महिने झऱ्यासारखे पाणी खळखळ करत वाहत असते. महालक्ष्मी धर्मशाळेजवळ पंगू वाड्यात आजही सुस्थितीत विहीर आहे. याशिवाय जुन्या कोल्हापुरात थोडे जरी खोदले तरी पाणी लागते. बांधकामाला ते अडथळा ठरते म्हणून पंप लावून उपसून गटारात सोडले जाते आणि एक दिवस कधी पाणी आले नाही की याच कोल्हापुरात रस्ता रोको, निदर्शने, मोर्चा, टॅंकरची पळवापळवी सुरू होते.

आजही या विहिरी तुडुंब...
रंकाळा तलावातूनही चक्क पिण्यासाठी शहरात पाणी आणले गेले. आज त्याचा पुरावा पाहायचा झाल्यास उभा मारुती चौकात देवळाच्या डाव्या बाजूला आजही एक पाणवठा आहे. तेथे २४ तास पाणी वाहते. ते रंकाळा तलावातून आले. या पाण्यावर एक छोटी योजनाही आहे. या योजनेद्वारे घातलेल्या नळामधून पाणीटंचाईच्या काळात पाणी सोडता येते. कात्यायनीची विहीर म्हणून ओळखली जाणारी विहीर महाद्वार रोडवर शुक्‍ला यांच्या वाड्यात आहे. त्यावेळी कात्यायनी डोंगरातून आणलेले पाटाचे पाणी या विहिरीत सोडले आहे. आजही ही विहीर तुडुंब भरलेली आहे. त्यावरही छोटी नळ पाणी पुरवठा योजना आहे. 

विहिरीत कचरा...
रावणेश्‍वर, कपिलतीर्थ, वरुणतीर्थ, सिद्धाळा, पद्माळा, खंबाळा, खाराळे, फिरंगाई, कुंभार तळे, सुसर बाग, काशी कुंड, मणकर्णिका कुंड, ही तळी, जलसाठे मुजले आहेत. शाहूपुरी व्हिनस कॉर्नर व राजारामपुरी जनता बाजारमागे विहिरीत कचरा टाकला जात आहे. व्हिनस कॉर्नरच्या विहिरीचे नाव मुळे विहीर आहे; पण त्या विहिरीची अवस्था बघितली तर एवढे पाणी निसर्गाने कोल्हापूरला देऊन काय उपयोग, असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे.

Web Title: Kolhapur News Jal Din special