‘जलसमृद्धी’त सावळा गोंधळ

सदानंद पाटील
सोमवार, 14 मे 2018

शाहूवाडी तालुक्‍यात निवडलेल्या लाभार्थ्याच्या घरी एक जेसीबी असताना आता जलसमृद्धीतूनही एक जेसीबी मंजूर झाल्याने योजनेतील भोंगळपणा उघड झाला आहे. त्यातच आता पावसाळ्याच्या तोंडावर जेसीबी घेऊन फुकट कर्जाच्या रकमेचे हप्ते भरायचे का, असा प्रश्‍न लाभार्थ्यांना पडला आहे.

कोल्हापूर - राज्यात जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाच्या कामांना चालना देण्यासाठी राज्य शासनाने आणलेल्या जलसमृद्धी अर्थसहाय्य योजनेत जिल्ह्यात सावळा गोंधळ सुरू आहे. पाच महिन्यांनंतर ही योजना अंतिम टप्प्यात आली असताना आजरा, गगनबावडा तालुक्‍यांत एकही लाभार्थी मिळालेला नाही; तर शाहूवाडी तालुक्‍यात निवडलेल्या लाभार्थ्याच्या घरी एक जेसीबी असताना आता जलसमृद्धीतूनही एक जेसीबी मंजूर झाल्याने योजनेतील भोंगळपणा उघड झाला आहे. त्यातच आता पावसाळ्याच्या तोंडावर जेसीबी घेऊन फुकट कर्जाच्या रकमेचे हप्ते भरायचे का, असा प्रश्‍न लाभार्थ्यांना पडला आहे.

जलसमृद्धी योजनेंतर्गत सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट, सहकारी संस्था व सोसायट्यांच्या माध्यमातून खोदाई यंत्र (जेसीबी), पोकलॅन यांसारखी उत्खनन यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी शासन पाच लाख ९० हजार रुपयांचे अनुदान देणार आहे. मृद व जलसंधारण विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या या योजनेचा शासन निर्णय २ जानेवारी २०१८ ला प्रसिद्ध करण्यात आला. 

पाच महिन्यांपासून या योजनेची प्रसिद्धी करणे, त्याबाबत शुद्धीपत्रक काढणे, वेळोवेळी मुदतवाढ देणे, निवड थेट करणे की चिठ्ठ्या टाकून करणे अशा वादविवादानंतर १५ लाभार्थी निवडण्यापर्यंतचा टप्पा जिल्ह्याने गाठला आहे. मात्र, आजरा आणि गगनबावडा तालुक्‍यातून अर्ज न येणे व तेथे लाभार्थी न मिळणे, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. सुशिक्षित बेरोजगारांसाठी ही योजना असतानाच ज्यांच्याकडे यापूर्वी एक जेसीबी आहे, अशा लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेलाच राजकीय ‘वास’ येऊ लागल्याची तक्रार होत आहे.   

शाहूवाडी तालुक्‍यातून ज्या महिला लाभार्थीचे नाव निश्‍चित केले आहे, त्यांच्या पतीचे एक जेसीबी मशिन आहे. या व्यक्‍तीला पेन्शनही सुरू आहे. असे असताना सुशिक्षित बेरोजगार अंतर्गत त्यांना मशिन दिली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने हे मशिन दिले आहे.
- आनंदा पाटील, 
अर्जदार, सावडे खुर्द 
(ता. शाहूवाडी)

तालुकानिहाय लाभार्थी
 करवीर ४  पन्हाळा १ 
 शाहूवाडी १  चंदगड १ 
 भुदरगड १  राधानगरी १ 
 कागल २  शिरोळ २ 
 हातकणंगले १  गडहिंग्लज १
 

Web Title: Kolhapur News Jal Samrudhi scheme issue