गडहिंग्लज प्रांत कार्यालयावर "जद'चा मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

गडहिंग्लज - राज्यात जनतेच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. महागाईने कहर केला आहे. रस्ते, पाणी, रेशन वितरण, शिक्षण आदी क्षेत्रातील सर्व प्रश्‍नांवर सरकार अपयशी ठरत असून या प्रश्‍नांची तत्काळ सोडवणूक करावी यासाठी आज येथे जनता दलाने मोर्चा काढला. प्रांत कार्यालयासमोर सरकार विरोधात जोरदार घोषणा देत निर्धार निदर्शने केली. 

गडहिंग्लज - राज्यात जनतेच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. महागाईने कहर केला आहे. रस्ते, पाणी, रेशन वितरण, शिक्षण आदी क्षेत्रातील सर्व प्रश्‍नांवर सरकार अपयशी ठरत असून या प्रश्‍नांची तत्काळ सोडवणूक करावी यासाठी आज येथे जनता दलाने मोर्चा काढला. प्रांत कार्यालयासमोर सरकार विरोधात जोरदार घोषणा देत निर्धार निदर्शने केली. 

माजी आमदार श्रीपतराव शिंदे, नगराध्यक्षा स्वाती कोरी यांच्या नेतृत्वाखाली पालिकेपासून मोर्चाला प्रारंभ झाला. दसरा चौकातून हा मोर्चा प्रांत कार्यालयासमोर आला. या वेळी 
सौ. कोरी म्हणाल्या, ""संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींना हयातीचे दाखले सक्तीचे केले आहेत. परंतु हे दाखले अधिकारी देण्यास तयार नाहीत. लोकप्रतिनिधींनी दिलेले दाखले ग्राह्य धरले जात नाही. यामुळे गरजू लोक पेन्शनपासून वंचित आहेत. एकतर अधिकाऱ्यांना दाखले देण्यास तयार करावे, अन्यथा लोकप्रतिनिधींचे दाखले ग्राह्य मानावेत.'' 

या वेळी दत्ता मगदूम, काशिनाथ देवगोंडा यांची भाषणे झाली. त्यानंतर प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांना निवेदन दिले. कर्जमाफीच्या नावाखाली सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. हिंदूतत्ववादी संघटनांवर कारवाई व्हावी, शाळा बंदचा निर्णय मागे घ्यावा, रेशन वितरणातील बायोमेट्रीक पद्धत सुधारावी, पिण्याच्या पाणी टंचाईत दूर करावी, चित्रीचे लाभक्षेत्र महाराष्ट्रातील शेवटच्या गावापर्यंत वाढवावे, तालुक्‍यातील सर्व रस्ते नवीन करावेत, शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, महागाई अटोक्‍यात आणावी आदी मागण्या केल्या असून त्या लवकर पूर्ण करण्याची सूचना निवेदनातून केली आहे. 

मोर्चात बापू म्हेत्री, उपनगराध्यक्ष उदय पाटील, नितीन देसाई, रमेश मगदूम, अजितसिंह शिंदे, बाबुराव धबाले, दादू पाटील, उदयराव कदम, कृष्णा परीट, राम मजगी, बसवराज खणगावे, शकुंतला हातरोटे, क्रांती शिवणे, सागर पाटील, सुनिता पाटील, विनोद बिलावर, अमृत भोसले, शिवाजी काकडे, अनिल कुंभार, बाळासाहेब मोरे आदी सहभागी झाले होते. 

परदेशातील काळापैसा आणून शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी पंधरा लाख रूपये जमा करतो असे सांगणारे सरकार यात अपयशी ठरले आहे. साधी कर्जमाफीसुद्धा वेळेत आणि गरजूंना मिळालेली नसून त्यांची फसवणूक झाली आहे. महागाईने सामान्य जनता भरडली जात आहे. भीमा कोरेगाव दंगलीत कोट्यवधींचे नुकसान करणारे हिंदुत्ववादी संघटना व त्यांचे प्रमुख संभाजीराव भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर कोणतीच कारवाई नाही. जातीयवाद्यांना पाठीशी घालणारे सरकार अजून पानसरे व दाभोळकर यांच्या खुन्यांना पकडू शकले नाहीत. या सर्व प्रश्‍नावर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. 
- ऍड. श्रीपतराव शिंदे,
माजी आमदार 

Web Title: Kolhapur News Janata Dal agitation in Gadhinglaj