जयंती नाल्याचे पाणी थेट पंचगंगेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - जयंती नाल्यातील मैलामिश्रित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्यामुळे पूर्वेकडील नदीकाठची गावे आणि इचलकरंजीवासीयांचे आरोग्य धोक्‍यात येणार आहे. इचलकरंजी शहराला याआधीही अनेकदा अशा प्रकारे दूषित पाण्याचा फटका बसून; कावीळ, गॅस्ट्रोचा सामना करावा लागला आहे.

कोल्हापूर - जयंती नाल्यातील मैलामिश्रित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्यामुळे पूर्वेकडील नदीकाठची गावे आणि इचलकरंजीवासीयांचे आरोग्य धोक्‍यात येणार आहे. इचलकरंजी शहराला याआधीही अनेकदा अशा प्रकारे दूषित पाण्याचा फटका बसून; कावीळ, गॅस्ट्रोचा सामना करावा लागला आहे.

आताही मैलामिश्रित पाणी थेट नदीत मिसळत असतानाही महापालिका प्रशासन त्याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. त्यामुळे धोका केव्हाही उद्‌भवू शकतो. महापालिका आजारांचा फैलाव होण्याची वाट पाहते आहे काय? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

गेल्या महिनाभरात शहराला पावसाने झोडपले. या पावसामुळे जयंती नाल्यातून कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे मैलामिश्रित पाणी वाहून नेणारी पाइपलाइनही वाहून गेली. त्याला आता महिना होत आला, तरी वाहून गेलेल्या पाइपलाइनच्या जागी नवीन पाइपलाइन टाकलेली नाही. त्यामुळे रोज मोठ्या प्रमाणात दूषित पाणी पंचगंगा नदीत मिसळत आहे. आजही नदीकाठची अनेक गावे आणि इचलकंरजी शहराला या दूषित पाण्यामुळे धोका  आहे.

दरवर्षी अशा प्रकारचा धोका या गावांना होतोच; पण यंदा ऑक्‍टोबर महिन्यातच अशी परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे पाण्यातून साथीचे आजार फैलावण्याचा धोका आहे. हा प्रकार गंभीर असतानाही महापालिका प्रशासन अपेक्षित गतीने त्याबाबत काम करताना दिसत नाही. प्रत्येक वेळा बळी गेल्यानंतरच महापालिका प्रशासन जागे होणार काय? असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. हरित लवादासमोरही पंचगंगा प्रदूषणाचा खटला सुरू आहे. अनेकदा या लवादाने महापालिकेला फटकारले आहे; तरीदेखील महापालिका प्रशासनाला जाग येत नाही. 

एसटीपीचीही नेमकी स्थिती काय?
सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) सुरू झाल्यानंतर पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्‍न सुटेल, असे आश्‍वासन अनेकदा महापालिकेने दिले होते; पण एसटीपी केंद्र अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू नाही. याबाबत महापालिकेने गांभीर्याने पावले टाकण्याची आवश्‍यकता आहे. एसटीपीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही प्रदूषण थांबत नसेल, तर या सांडपाणी प्रक्रिया केंद्राची कार्यक्षमताही तपासून पाहण्याची आवश्‍यकता आहे.

Web Title: Kolhapur News Jayanti Drain water Directly mixing in Panchaganga