हुपरी नगरपालिका उपनगराध्यक्षपदी भाजपचे जयकुमार माळगे

बाळासाहेब कांबळे
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

हुपरी - नगर पालिकेच्या पहिल्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे जयकुमार मंगलराव माळगे यांची बिनविरोध निवड झाली. त्याचबरोबर भाजपचे सुदर्शन अण्णासाहेब खाडे व ताराराणी आघाडीचे अमेय श्रीनिवास जाधव यांचीही स्वीकृत नगरसेवक पदी बिनविरोध निवड झाली.

हुपरी - नगर पालिकेच्या पहिल्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे जयकुमार मंगलराव माळगे यांची बिनविरोध निवड झाली. त्याचबरोबर भाजपचे सुदर्शन अण्णासाहेब खाडे व ताराराणी आघाडीचे अमेय श्रीनिवास जाधव यांचीही स्वीकृत नगरसेवक पदी बिनविरोध निवड झाली.

नवनिर्मित हुपरी पालिकेची पहिलीच खास सभा क्रीडा संकुलात पार पडली. त्या मध्ये या निवडी करण्यात आल्या. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा जयश्री महावीर गाट होत्या. निवडी नंतर उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे व स्वीकृत नगरसेवक सुदर्शन खाडे आणि अमेय जाधव यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी तसेच गुलाल उधळत जल्लोषात शहरातुन विजयी मिरवणूक काढली.

दुपारी साडे बाराला सभेच्या कामकाजास सुरुवात झाली. तहसीलदार वैशाली राजमाने, मुख्याधिकारी तानाजी नरळे उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी दहा ते बारा या वेळेत उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपचे जयकुमार माळगे यांचा एकमेव अर्ज आला. तर स्वीकृत नगरसेवक पदासाठी सुदर्शन खाडे व अमेय जाधव या दोघांचेच अर्ज आले होते. त्यामुळे नगराध्यक्षा जयश्री गाट यांनी उपनगराध्यक्षसह स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा करून औपचारिकता पूर्ण केली.

पालिका निवडणूक प्रक्रिया तसेच प्रशासक म्हणून चांगली कामगिरी पार पाडल्या बद्दल वैशाली राजमाने यांचा पालिकेतर्फे सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित पदाधिकारी तसेच नगरसेवक यांचाही फेटे बांधून व रोपे देऊन सत्कार करण्यात आला.

नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष श्री. माळगे यांचे वडील मंगलराव माळगे १९८४ ला उपसरपंच तर २००२ ला सरपंच म्हणून कार्यरत होते. त्यामुळे जयकुमार यांनी वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकल्याची चर्चा होत आहे. सभेला सत्ताधारी भाजपसह ताराराणी आघाडी, अंबाबाई आघाडी, शिवसेनेचे सर्व असे १८ नगरसेवक उपस्थित होते. 

हुपरी पालिका पदाधिकारी निवडीचे प्रमुख केंद्र इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांचे कार्यालय ठरले. तिथूनच सर्व सुत्रे हलवण्यात आली. आमदार हाळवणकर यांच्यासह नगरसेवक तानाजी पवार, जिल्हा अध्यक्ष हिंदुराव शेळके, उद्योगपती महावीर गाट, अशोकराव स्वामी, माजी सरपंच मंगलराव माळगे, अमित गाट,विकास पाटील- चंदूरकर आदी नेते मंडळीनी " किंगमेकर " ची भूमिका बजावली.

Web Title: Kolhapur news Jaykumar Malage selected