जोतिबा डोंगर भाविकांनी फुलला

निवास मोटे
शुक्रवार, 30 मार्च 2018

जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेसाठी भाविक दाखल झाल्याने डोंगर गर्दीने फुलून गेला आहे. सलग सुट्ट्यांमुळे दूरच्या भाविकांनी संपूर्ण परिवारासह डोंगरावर हजेरी लावली आहे.

जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेसाठी भाविक दाखल झाल्याने डोंगर गर्दीने फुलून गेला आहे. सलग सुट्ट्यांमुळे दूरच्या भाविकांनी संपूर्ण परिवारासह डोंगरावर हजेरी लावली आहे. प्रशासनाने बंदोबस्त तसेच दर्शन रांगेचे नियोजन केले असून  पोलिसांनी गावात संचलन केले.

आज (ता. ३०) मानाच्या सासनकाठ्या दाखल होतील. काल सायंकाळी पाडळी (निनाम) जि. सातारा, विहे (ता. पाटण), किवळ (ता. कराड) या मानाच्या सासनकाठीचे केखले (ता. पन्हाळा) गावातील माळावर मिरवणुकीने स्वागत झाले. 
उद्या सायंकाळी पाच वाजता तिन्ही सासनकाठ्या मूळमाया श्री यमाईदेवी मंदिराजवळ येतील. तेथे मानाचा विडा देण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी व कर्मचारी, पुजारी येतील. त्यानंतर सासनकाठ्या मिरवणुकीने मुख्य मंदिर परिसरात येतील.

आज सकाळपासून भाविकांच्या झुंडी डोंगरावर येत राहिल्या. पंढरपूर, सोलापूर, बार्शी, उस्मानाबाद या भागांतील सासनकाठ्या भाविकांनी एस.टी.वर व रेल्वेवर टाकून कोल्हापूरपर्यंत आणल्या. तेथून रेल्वे स्टेशन मार्गे टाऊन हॉल मार्गे त्या पंचगंगा नदीकाठी पायी आणल्या होत्या. भाविकांनी नदीत स्नान केले. ऊन कमी झाल्यावर भाविक डोंगरावर पोहोचले.

मंदिर परिसरात हलगी, पिपाणी, सनई, ढोल, व्हलेरबाजा या वाद्यांच्या निनादाने मंदिर परिसर दणाणतोय. येणारे सर्रास भाविक हे गुलालात न्हाऊन निघत आहेत. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक सासनकाठीचे टोक (गोंडा) हे शिखरास लावून काठी उभी करून ती मुख्य मंदिराभोवती वाद्यांच्या तालावर नाचविली जाते. आतापासूनच सासनकाठी व शिखरांवर गुलाल खोबरे मोठ्या प्रमाणात पडू लागले आहे. त्यामुळे मंदिर गुलालात रंगू लागले आहे.

Web Title: Kolhapur News Jotiba Dongar Chaitra Yatra