जोतिबा खेटे येत्या रविवारपासून

निवास मोटे
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

जोतिबा डोंगर - श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील श्रीक्षेत्र जोतिबा मंदिरात रविवार (ता. 4)पासून खेट्यांना प्रारंभ होत आहे. त्यासाठी जोतिबा डोंगर सज्ज झाला आहे.

जोतिबा डोंगर - श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील श्रीक्षेत्र जोतिबा मंदिरात रविवार (ता. 4)पासून खेट्यांना प्रारंभ होत आहे. त्यासाठी जोतिबा डोंगर सज्ज झाला आहे.

माघमध्ये जोतिबाचे पाच खेटे घातले जातात. त्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांतून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या दिवशी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होतील. "श्रीं'ची सालंकृत महापूजा बांधण्यात येईल. खेट्यांच्या पार्श्‍वभूमीवर डोंगरावर सर्वत्र कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. शनिवारी (ता. 3) रात्रीच बंदोबस्त तैनात करणार असल्याचे कोडोलीचे सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले. 

खेट्यांना पहाटे चारपासून प्रारंभ होतो. कुशिरे-पोहाळे, गिरोली, दानेवाडी या भागातील डोंगराकडे येणारे पायी रस्ते गर्दीने फुलून जातात. गायमुख तलावास यात्रेचे स्वरूप येते. भाविक पंचगंगा नदीपासून पायी येतात; तर पंढरपूर, बार्शी, बेळगाव, सांगली, सातारा या भागातील भाविक गायमुख तलाव ते जोतिबा मंदिर परिसरात पायी येतात. 

खेटे म्हणजे काय? 
माघ महिन्यातील पाच रविवारी जोतिबा डोंगरावर भरणाऱ्या यात्रेस जोतिबाचे खेटे म्हणतात. भाविक शक्‍यतो अनवाणी चालत येतात. यात महिला भाविकांचीही संख्या लक्षणीय असते. पूर्ण डोंगर गर्दीने फुलून जातो. "चांगभलं'चा जयघोष होतो. 

रविवार अन्‌ व्यायाम 
जोतिबा डोंगरावरील "श्रीं'च्या दर्शनाच्या निमित्ताने कोल्हापुरातील पाचशेहून अधिक भाविकांचा दर रविवारी कुशिरे येथे गाड्या लावून डोंगरवाटा, पायवाटेने दर्शनाला जाण्यासाठी प्रवेश सुरू होतो. या वाटेने डोंगरावर जाण्यासाठी 50 ते 60 मिनिटे लागतात. रविवारी तरी दर्शनाच्या निमित्ताने आरोग्यासाठी पायी व्यायाम व्हावा, यासाठी हे कोल्हापूरकर नित्यनियमाने डोंगरावर येतात. 

महाप्रसादाचा भाविकांना दिलासा 
खेट्यांच्या निमित्ताने अनेक संस्था, तरुण मंडळांच्या भाविकांना शिरा, उप्पीट, कांदापोहे, चिवडा, लाडू, सुगंधी दूध, चहा-कॉफी असा हा प्रसाद पाच रविवारी मंदिर परिसर व गायमुख तलाव परिसरात दिला जातो. या प्रसादामुळे भाविकांना दिलासा मिळतो. 

Web Title: Kolhapur News Jotiba Khete start