पाठबळानेच उजळेल ‘ज्योत’

पाठबळानेच उजळेल ‘ज्योत’

कोल्हापूर - फेन्सिंगमधील (तलवारबाजी) युवा खेळाडू ज्योती अरुण सुतार हिने सुमारे ६० हून अधिक स्पर्धांमध्ये सुवर्ण आणि रौप्यपदके मिळवली आहेत. पण, केवळ घरची परिस्थिती बेताची असल्याने तलवारबाजीत भारतात आठव्या स्थानी असलेल्या या गुणी खेळाडूला परदेशात होणाऱ्या दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांपासून दूर राहावे लागले.

सध्या ज्योतीचे प्रशिक्षक आणि पालक या खेळाडूचे पालकत्व घेण्यासाठी प्रायोजक शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. कोल्हापुरात कुस्ती खेळाडूंना सहकाराचा आधार मिळतो. तसा हात मिळाल्यास नक्कीच ही ‘ज्योती’ देशाचे नाव क्रीडा विश्‍वात गाजवेल.

लहानपणापासूनच मर्दानी खेळाची आवड असलेल्या शिवाजी पेठेतच ज्योतीने लाठी-काठी खेळता-खेळता तलवारबाजीचे धडे गिरविले. गेली ११ वर्षे ती अनेक स्पर्धांमधून कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करीत आहे. तिचे खेळातील प्रावीण्य पाहून प्रशिक्षकांनी फेडरेशनच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त केले. त्यातूनच तिने आजवर १८ नॅशनल चॅम्पियनशिप, ३४ राज्यस्तरीय आणि आठ फेडरेशन कपमध्ये यश प्राप्त केले आहे. पण, घरची परिस्थिती बेताची असल्याने केवळ पैसे भरता न आल्याने परदेशात होणाऱ्या २३ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय स्पर्धेस जाता आले नाही. या स्पर्धेसाठी तिची अधिकृत निवडही झाली होती. 

मात्र, अत्याधुनिक व्हाईट कीट, इलेक्‍ट्रॉनिक जॅकेट आणि मास्क घेण्याची ताकद नसल्याने ती जाऊ शकली नाही. खरे तर जिल्ह्यात या खेळाचे बोटावर मोजण्याइतकेच खेळाडू आहेत. त्यात मुली तर एक-दोनच असतील. यामुळे घरगुती सुतारकामाचा व्यवसाय सांभाळत तिचे वडील अरुण सुतार यांनी आणि किरकोळ शिवणकाम व्यवसाय करून ज्योतीच्या आई स्मिता यांनी खेळासाठी ताकदीबाहेरचा खर्च केला आहे. यामुळेच विविध राज्यांमध्ये ती स्पर्धेत सहभागी होऊ शकली. पण, आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सुमारे ५५ हजार रुपये आणि फेडरेशन मान्यताप्राप्त सुरक्षारक्षक, तलवार, जाकीट यासाठीची रक्कम उपलब्ध करणे शक्‍य न झाल्याने पुण्यातील राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण केंद्रातही (साई) ती प्रशिक्षणासाठी जाऊ शकलेली नाही. फॉईल आणि सेबर प्रकारात खेळणारी ज्योती सध्या बी.एस्सी.च्या प्रथम वर्षात शिकत आहे.

इलेक्‍ट्रॉनिक जाकीट, तलवार आणि इतर कीटसाठी मदत मिळाल्यास ज्योती सुतार आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकेल. कुस्तीचे खेळाडू साखर कारखाने तसेच नावाजलेल्या संस्था दत्तक घेत असतात. त्याप्रमाणे अशा खेळांसाठीही या संस्थांनी पुढे यायला हवे. जेणेकरून केवळ पैशांअभावी मागे पडलेल्या खेळाडूंचे भविष्य उज्ज्वल होईल.
- उमेश पाटील,
प्रशिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com