सरंजामशाही चालू देणार नाही - भय्या माने

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जुलै 2017

कागल - कागलमध्ये सरंजामशाही चालू देणार नाही, अन्यथा राजा विरुद्ध प्रजा, गरीब विरुद्ध श्रीमंत असा लढा पुन्हा उभा करावा लागेल. समरजित घाटगे हे लोकांची दिशाभूल करीत आहेत. व्यसनावर बोलून कागलला बदनाम करायचे त्यांनी थांबवावे, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक प्रताप ऊर्फ भय्या माने यांनी केले. 

कागल - कागलमध्ये सरंजामशाही चालू देणार नाही, अन्यथा राजा विरुद्ध प्रजा, गरीब विरुद्ध श्रीमंत असा लढा पुन्हा उभा करावा लागेल. समरजित घाटगे हे लोकांची दिशाभूल करीत आहेत. व्यसनावर बोलून कागलला बदनाम करायचे त्यांनी थांबवावे, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक प्रताप ऊर्फ भय्या माने यांनी केले. 

घरकुलासंदर्भात काल भाजपने मोर्चा काढला होता, त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. येथील गैबीचौकापासून मोर्चाची सुरवात झाली. मोर्चा पालिकेसमोर आल्यावर त्याचे सभेत रुपांतर झाले. या वेळी ते बोलत होते. यानंतर मुख्याधिकारी टिना गवळी व नगराध्यक्षा माणिक माळी यांना निवेदन देण्यात आले. 

श्री. माने म्हणाले, ""आम्ही जागा देतो, ठराव देतो, समरजित घाटगे यांनी म्हाडाकडून निधी आणून गरिबांना मोफत घरे द्यावीत. गरिबांनी चांगल्या घरात रहायचे नाही काय? गाड्या घ्यायच्या नाहीत काय? आम्हाला गिधाडं, गाढवं, घोडा काहीही म्हणा, पण गरिबांना घरे द्या. समरजित हे शाहूंचे रक्ताचे वारस असतील; पण आमदार हसन मुश्रीफ हे कर्तृत्वाने शाहूंच्या विचाराचे वारसदार आहेत. कारखान्याचे डिस्टीलरी उत्पादन थांबवावे व मगच व्यसनाधिनतेवर बोलावे. प्रकाश गाडेकर हे कर्तृत्वाने मोठे झालेले आहेत. 

रमेश माळी म्हणाले, ""घरकुलसारखी योजना पूर्ण करणारी कागल ही राज्यातील एकमेव "क' वर्ग पालिका आहे. म्हाडाचेच कन्स्लटंट इंजिनिअर श्री. देशपांडे यांच्याकडून घरकुलांची माहिती करून घ्यावी. या आधीही घरकुलाची चौकशी झालेली आहे. शासकीय लेखापरीक्षणही झाले आहे. कोणीही येथे गैरव्यवहार झाल्याचे म्हटलेले नाही. कितीही अडचणी व संकटे आली तरी घरकुल प्रकल्प पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. 

प्रकाश गाडेकर म्हणाले, ""म्हाडाच्या अध्यक्षांनी घरकुलासाठी पाच कोटी रुपये निधी आणावा. गरिबांची खरोखर कणव असेल तर त्यांनी त्यांचे पन्नास हजार रुपये भरावेत, असे सांगत शाहू कारखान्याची काजळी, डिस्टिलरी प्रकल्प, दूध संघ याबाबत जोरदार टीका केली.'' 

या वेळी पक्षप्रतोद प्रवीण काळबर, अजित कांबळे, चंद्रकांत गवळी आदींची भाषणे झाली. उपनगराध्यक्ष नितीन दिंडे यांनी स्वागत केले. संजय चितारी यांनी आभार मानले. 

मोर्चामध्ये नविद मुश्रीफ, संगीता गाडेकर, प्रकाश नाळे, पांडुरंग सोनुले आदींसह नगरसेवक, नगरसेविका, राष्ट्रवादी व मित्रपक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

तर राजीनामा देऊ... 
निपाणी, मिरज, संकेश्‍वर येथील मुस्लिमांना घरे दिल्याचा आरोप कालच्या भाजपच्या मोर्चावेळी करण्यात आला होता. त्याला प्रत्युत्तर देताना पालिकेचे पक्षप्रतोद प्रवीण काळबर म्हणाले, ""विरोधकांनी केलेला आरोप सिद्ध करून दाखविला तर मी राजीनामा देईन.'' 

Web Title: kolhapur news kagal bhaiya mane