तीन वर्षे सापडेना खांबावरील दोष! 'हा' समाज अनेक दिवस अंधारात

प्रकाश तिराळे
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

दुर्देव ते कोणते. . . . . !
येथील सरपंच पद व एक ग्रामपंचायत सदस्या मागासवर्गीय समाजातीलच आहेत. असे असताना या मातंग समाजाला अनेक समस्यांच्या विळख्यात रहावे लागत आहे. यासारखीे दुसरी शोकांतिका नसावी. अशी नाराजीची भावना या समाजातील सुशिक्षित तरुणांनी व्यक्त केली आहे

मुरगूड : जवळपास दहा वर्षे विकासापासून दूर असणारा कागल तालुक्यातील मातंग समाज गेल्या 15 दिवसांपासून अंधारात चाचपडत आहे. सर्वत्र विजेचा झगमगाट असताना ऐन दिवाळीतदेखील हा समाज ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अंधारात राहिला. तर गेल्या तीन वर्षांपासून वारंवार तक्रार करूनदेखील येथील तिन्ही खांबावर असणारे दोष दुरुस्त करण्यात प्रशासनाला सपशेल अपयश आले आहे, अशी येथील नागरिकांची तक्रार आहे.

पुरोगामी विचारांचा वसा आणि वारसा जपणारा कागल तालुका आहे. याच तालुक्यातील कुरुकली येथे मातंग समाज गेली दहा वर्षे विकासाच्या प्रतीक्षेत आहे. या समाजाला गेली दहा वर्षे ग्रामपंचायतीमध्ये प्रतिनिधित्व नाही. त्यामुळे येथे विकासाचा ठणठणाट आहे. समाजाच्या प्रवेश द्वारावर गेली चार वर्षे गटर फुटलेली आहे. त्याची दुरुस्ती करण्यास ग्रामपंचायत प्रशासनाला मुहूर्त सापडलेला नाही. पावसाळ्यात गल्लीच्या प्रवेश द्वारावरच तळे साचलेले असते. शेजारीच प्राथमिक शाळा आहे. येथून जाणाऱ्या सांडपाण्याचा त्रास शाळेतील विद्यार्थ्याना होत असतो. पण याचे देखील भान कोणाला नाही. गल्लीतील रस्त्याची तर प्रचंड प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे. दलित वस्तीसाठी येणारा निधी अन्यत्र वापरून या समाजाला त्याच्या न्याय हक्कापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे.

येथे एकूण तीन विजेचे खांब आहेत. त्यापैकी एक सौर उर्जेवरील आहे. सौर उर्जेवरील दिवा गेली कित्येक दिवस बंदच आहे. त्यातील बटरी कधीच गायब झाली आहे. दोन खांब या समाजातील गल्लीत तर एक खांब शेजारील बेलवळेकर गल्लीत आहे. या तिन्ही खांबावरील कनेक्शन एकच आहे. पण गेल्या तीन ते चार वर्षांपासून या खांबावरील पथदिवे एकाच वेळी कधीही लागलेले नाहीत. त्यातील एक किंवा दोन हमखास बंद असतातच. जर लागले तर केवळ चार दिवस असतात. याचा दोष गेली चार वर्षे वीज वितरण कंपनीला सापडलेला नाही. येथे वाढीव वीज खांबांची गरज आहे. पण त्यासाठी प्रशासनाने कसलाच पाठपुरावा केलेला नाही. त्यामूळे काही कुटूंबे वीज कनेक्शन आज मिळेल उद्या मिळेल या आशेवर आहेत. याबाबत मुरगूड वीज वितरण कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन देखील तिकडून कसली ही कार्यवाही झालेली नाही. शिवाय दोष तर कायमच आहे. या समाजातील लोकांकडे पाणी साठवणुकीसाठी पुरेशी साधने नाहीत म्हणून एका विशेष योजनेतून 10 वर्षांपूर्वी एजारो लिटर क्षमतेची पाण्याची टाकी देण्यात आली होती. ती पाण्याची टाकी काढून टाकून त्या ठिकाणी प्राथमिक शाळेचे स्वयंपाक घर बांधण्यात आले आहे. तर ही पाण्याची टाकीच गेल्या दोन वर्षांपासून गायब आहे. गेल्या दहा वर्षात केवळ दोन वर्षे 15 % अनुदान या समाजावर खर्च केले आहे.

या सर्व समस्येबाबत वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाकडे मागणी करून देखील त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. 15 ऑगस्ट 2017 रोजीच्या गावसभेत समाजातील तरुणांनी याबाबतची विचारणा ग्रामपंचायत प्रशासनाला केली होती. त्यावेळी याबाबतची कसली ही ठोस माहिती प्रशासनाला देता आली नव्हती. लवकरच याबाबत आम्ही योग्य कार्यवाही करू अशी ग्वाही दिली . व वेळ मारून नेहण्याचे काम प्रशासनाने केल्याचे एकंदरीत या सर्व समस्याची जैसे थे परिस्थिती वरुन दिसून येते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: kolhapur news kagal matangs deprived of power 3 years