कागल आरटीओ नाका एन्ट्रीसाठी बदनाम

सुधाकर काशीद
शनिवार, 30 जून 2018

कोल्हापूर - कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) रोज नवी घोषणा आहे. काही नव्या बदलाची सुरुवात आहे. परंतु, आरटीओतील सर्वांत मोठ्या चर्चेची ‘एन्ट्री’ आता कधी आणि कशी थांबणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कागल येथील आरटीओ नाका (चेक पोस्ट) हा या एन्ट्रीसाठी बदनाम झालेला नाका आहे.

कोल्हापूर - कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) रोज नवी घोषणा आहे. काही नव्या बदलाची सुरुवात आहे. परंतु, आरटीओतील सर्वांत मोठ्या चर्चेची ‘एन्ट्री’ आता कधी आणि कशी थांबणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कागल येथील आरटीओ नाका (चेक पोस्ट) हा या एन्ट्रीसाठी बदनाम झालेला नाका आहे.

आरटीओ ऑफिसमध्ये धडाधड नवे बदल करणारे प्रभारी प्रादेशिक अधिकारी अजित शिंदे या नाक्‍यावरची एन्ट्री बंद करणार का? हा खरा प्रश्‍न आहे. कारण या नाक्‍यावरचे पंटर, तेथे गोळा होणारी एन्ट्री हा संपूर्ण आरटीओ विभागाला बदनाम करणारा आजवरचा ढळढळीत मुद्दा आहे. 
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कायम रडारवर असलेला हा नाका आहे.

या नाक्‍यावर अनेक वेळा कारवाई झाली आहे. इथल्या एन्ट्रीला वाहतूक व्यावसायिक वैतागलेले आहेत; पण पाण्यात राहून माशाशी वैर नको म्हणून सहसा कोण तक्रार करत नाही, अशी परिस्थिती आहे. सगळ्या आरटीओ ऑफिसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. परमीट नूतनीकरण, वाहन परवाना देणाऱ्या ट्रॅकवर कॅमेरे आहेत; पण गोकुळ शिरगाव चेक पोस्टवर मात्र कॅमेरा तर नाहीच; पण तेथे अनोळखी माणसाला फिरकुही दिले जात नाही, अशी परिस्थिती आहे. 

या चेक पोस्टवर प्रत्येक ट्रक थांबतो. ट्रक थांबला की किन्नर खाली उतरतो. ट्रकच्या कागदपत्रांची उरळी घेऊन पळतच तिथल्या केबीनकडे जातो. आणि पुन्हा काही क्षणात पळतच येऊन तो आपल्या ट्रकमध्ये चढतो. यामधल्या काही क्षणात एन्ट्रीचा कारभार होतो. 

या नाक्‍यावर अधिकारी असतात; पण पंटर म्हणून ओळखले जाणारे काही लोकच नाक्‍याचे कामकाज सांभाळतात. या पंटर लोकांचा आरटीओ खात्याशी कसलाच संबंध नसतो; पण नाक्‍यावर रूबाब या पंटर लोकांचाच असतो. या नाक्‍यावरील कारभाराची चर्चा एवढी की, ‘लाचलुचपत’ खात्याने या नाक्‍यावर अनेकवेळा कारवाई केली. कारवाईनंतर काही दिवस एन्ट्री थांबली; पण पुन्हा परंपरा चालू, अशी स्थिती आहे. 

चेक पोस्टच्या आधुनिकीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यात चेक पोस्टवर सीसीटीव्ही यंत्रणा नक्‍की असणार आहे. त्यामुळे तेथे काही चुकीचे घडत असेल तर तेही दिसणार आहे. चेक पोस्टचे आधुनिकीकरण झाल्याने तिथला कारभार देखरेखीखाली राहील.
- अजित शिंदे, 

प्रभारी परिवहन अधिकारी

Web Title: Kolhapur News Kagal RTO check post issue