बसायला आधार.. हाताला रोजगार...

सुधाकर काशीद
गुरुवार, 19 एप्रिल 2018

कोल्हापूर - फक्‍त कट्ट्यावर बसून पोट भरत नाही, हे खरं आहे. परंतु कोल्हापुरात शाहूपुरीतील तीन कट्टे मात्र किमान शंभर जणांच्या पोटाचा आधार ठरले आहेत. रोज काम करायचे आणि रोजची रोजीरोटी भागवायची अशा पद्धतीने काम करणाऱ्या मजुरांसाठी हे कट्टे म्हणजे एम्प्लॉयमेंट ऑफिस ठरले आहेत. या कट्ट्यावर ते सकाळी सातला येऊन बसतात.

कोल्हापूर - फक्‍त कट्ट्यावर बसून पोट भरत नाही, हे खरं आहे. परंतु कोल्हापुरात शाहूपुरीतील तीन कट्टे मात्र किमान शंभर जणांच्या पोटाचा आधार ठरले आहेत. रोज काम करायचे आणि रोजची रोजीरोटी भागवायची अशा पद्धतीने काम करणाऱ्या मजुरांसाठी हे कट्टे म्हणजे एम्प्लॉयमेंट ऑफिस ठरले आहेत. या कट्ट्यावर ते सकाळी सातला येऊन बसतात. ज्यांना कामगाराची गरज आहे, ते येथे येतात आणि मजुरी ठरवून यांना कामासाठी घेऊन जातात. त्यामुळेच हे तीन कट्टे कोणालाही उपाशी राहू देत नाहीत, असे सर्वजण मानतात.

शाहूपुरीत गोकुळ हॉटेलच्या पिछाडीस टिक्‍के बिल्डिंग आहे. ही मूळ बिल्डिंग तत्कालीन दरबार सर्जन डॉ. टेंगशे यांची. शाहूपुरीत व्यापार पेठ वसली आणि ही बिल्डिंग टिक्‍के परिवाराने विकत घेतली. या बिल्डिंगला चांगला पंधरा फूट लांबीचा घडीव दगडी कट्टा आहे.

हा कट्टा सकाळी सात वाजल्यापासून भरू लागतो. एक एक जण येतो, कट्ट्यावरच्या कोपऱ्यात आपली पिशवी ठेवतो आणि कट्ट्यावर बसतो. अवघा काही वेळ जातो आणि या कट्ट्यासमोर दुचाकी वाहने, मोटारी थांबू लागतात. ‘अमुक ठिकाणी हमालीचे काम आहे. कोण कोण येणार?’ असे त्यातील व्यक्‍ती विचारतात. मग या कट्ट्यावरचे पाच-सहा जण उठतात. मजुरी कमी, जादा अशी घासाघीस करत काम स्वीकारतात आणि ठरलेल्या कामावर जातात. मिळालेले काम लवकर आटपले तर परत कट्ट्यावर येतात किंवा थेट दुसऱ्या दिवशी सकाळीच येतात. या कट्ट्यावरच्या प्रत्येकाला दिवसभरात काही ना काही काम मिळते. तर कधी कधी दोन-तीन दिवस वाट्याला प्रतीक्षाही येते. परंतु, प्रत्येकाची थोडी फार काय ती कमाई होतेच. 

हा कट्टा कायम भरलेला असतो. काही जण कामावर जातात. काही नवे येतात. काही काम आटोपून पुन्हा या कट्ट्यावर येतात. सायंकाळी सात वाजेपर्यंत कट्टा असाच कष्ठाळू माणसांच्या अस्तित्वामुळे जीवंत भासतो. टिक्‍के बिल्डिंगचा हा कट्टा तब्बल ५० ते ६० वर्षे कष्टकऱ्यांचा आधार आहे. त्यावर रोज ५०-६० जण बसतात. त्यामुळे तो दगडी कट्टा गुळगुळीत झाला आहे. ज्या भिंतीला ते टेकून बसतात, त्या भिंतीवर कष्टकऱ्यांच्या घामाची तेलकट किनार उमटली आहे. या बिल्डिंगचे मालक टिक्‍के यांनी या कष्टकऱ्यांना आपल्या कट्ट्यावर बसायची पूर्ण मुभा दिली आहे. या कट्ट्यावर बसणारे सर्व कष्टकरी पन्हाळा, शाहूवाडी, करवीर, गगनबावडा तालुक्‍यांतील आहेत. 

दुसरा असाच कट्टा मलबार हॉटेलसमोर फुलाच्या दुकानाजवळ आहे. तेथे ते कष्टकरी बसतात. ते सगळे पंढरपूर भागातील आहेत. त्यामुळे पंढरपुरी कट्टा अशीही त्याची ओळख आहे. तिसरा कट्टा शाहूपुरीतच रत्नाकर बॅंकेलगत एका झाडाखाली आहे. तेथेही सकाळी सात-आठपासून कष्टकरी बसतात. ज्यांना मजुराची, हमालाची गरज आहे ते तेथे येतात आणि त्यांना कामावर घेऊन हाताला रोजगार मिळवून देतात.

पोटासाठीच कोल्हापुरात
हे कष्टकरी कोरडवाहू शेतकरी आहेत. त्यांच्या गावाकडे जमिनी आहेत; पण केवळ पावसावरच्या शेतीमुळे पोटासाठी कोल्हापुरात रोजगार हे ठरून गेले आहे. बहुतेक सर्व कष्टकरी मध्यमवयीन आहेत. काही जण साठीकडे पोचलेले आहेत.

Web Title: Kolhapur News Katta in Shahupuri special story