बंदोबस्तातील पोलिसांसाठी ‘खारीचा वाटा’ उपक्रम

अमोल सावंत
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

गणेश विसर्जन मिरवणुकीत बिस्किट पुड्यांचे वाटप; कोल्हापुरातील युवकांची सामाजिक बांधिलकी

गणेश विसर्जन मिरवणुकीत बिस्किट पुड्यांचे वाटप; कोल्हापुरातील युवकांची सामाजिक बांधिलकी
कोल्हापूर - दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात पोलिस, महापालिका कर्मचारी, अन्य विभागांतील अधिकारी, विविध संस्था संघटनांतील स्वयंसेवकही कार्यरत असतात. विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांच्या सुरक्षेची, वाहतुकीची, सर्व व्यवस्थेची जबाबदारी या सर्वांवर असते. खरेतर या काळात अनेकांना साधा चहाही घेता येत नाही. याचा विचार करून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अमेय गोखले, गौतम पलुसकर, सुशीलकुमार पाटील, हितेश पटेल, चैतन्य पोंक्षे यांनी गेल्या पाच वर्षांपासून सामाजिक बांधिलकीतून ‘खारीचा वाटा’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे मिरवणुकीसाठी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस, स्वयंसेवकांना बिस्किट पुड्यांचे वाटप केले जाते. गतवर्षी चार हजार बिस्किट पुड्यांचे वाटप केले होते. यावर्षीही हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविला जाणार आहे. 

याबाबत अमेय म्हणाले, ‘‘खारीचा वाटा हा शब्दप्रयोग ऐकला की आठवतो रामयणातला सेतू बांधण्याचा प्रसंग. सत्कार्याला आपली किती मदत होणार, त्यापेक्षा आपली मदत त्या कामाला होत आहे ही भावना महत्त्वाची, म्हणूनच गेली काही वर्षे ‘खारीचा वाटा’ या नावाने हा उपक्रम सुरू केला.

मदत म्हणून आम्ही पंचगंगा, बावडा असो वा रंकाळा विसर्जनाच्या सर्व जागा. संपूर्ण विसर्जन मार्गावर बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांना, कर्मचाऱ्यांना आम्ही बिस्किटाचे पुडे त्यांच्या जागेवर जाऊन हातात देतो. त्यांची चहावेळेची भूक भागत असते. तेव्हा आम्हाला अतिव समाधान मिळते. आपलीही कोणीतरी काळजी करते हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. हा उपक्रम प्रत्येक गावात करायचा आमचा मानस आहे. त्यामुळे या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांचे स्वागत आहे. प्रत्येक जण सहभागी होऊ शकतो.’’

विसर्जन मिरवणुकीत कुठेही जाऊन एकाच जागी दहा ते पंधरा पुडे दिले जात नाहीत; तर पाठीवर सॅक घेऊन मिरवणूक मार्गावर फिरत प्रत्येकाच्या हाती बिस्किटचा पुडा दिला जातो. सकाळी ११ ते दुपारी तीन, रात्री दहा ते दोन वेळेत या पुड्यांचे वाटप होते. बिस्किटचा एक पुडा अन्‌ कपभर चहा घेतला तरी लागलेली भूक शांत होते. कंटाळा कुठल्या कुठे निघून जातो.

मिरवणुकीतून बाजूला होऊन हॉटेलमध्ये जाऊन काहीबाही खाणे हे प्रत्येकाला शक्‍य होत नाही. त्यातही पोलिसांना तर ड्यूटी दिलेल्या जागेवरून हलताही येत नाही. अशावेळी बिस्किटचा हा पुडा आधार ठरतो. हा उपक्रम राबविण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे. स्वयंस्फूर्तीने सहभागी होत असे उपक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. मग होताय ना ‘जॉईन’?

Web Title: kolhapur news kharicha vata programe for police