खिद्रापूरला पर्यटक कधी पोहोचणार ?

खिद्रापूरला पर्यटक कधी पोहोचणार ?

कोल्हापूर - कोल्हापूरचे पर्यटन म्हणजे महालक्ष्मी, पन्हाळा, जोतिबा यावरच पिढ्यान्‌पिढ्या भर दिल्याने खिद्रापूरचे कोपेश्‍वर मंदिर पर्यटकांच्या नजरेआड राहिले आहे. महालक्ष्मी मंदिरात नाही एवढे शिल्प सौंदर्य या खिद्रापूरच्या मंदिरावर आहे. एवढेच काय राज्य पुरातत्त्व विभागाच्या यादीतही या मंदिराचा ‘अ’ श्रेणीत समावेश आहे; पण इकडे पर्यटकांचा ओघ मात्र जेमतेम आहे.

आपल्याच खिद्रापूरचे महत्त्व पर्यटकांच्या नजरेसमोर आणायला आपणच कमी पडलो हेच याचे कारण आहे. इकडे पर्यटकांना आपण खेचून आणू शकलो तरच आपले हे वैभव सर्वदूर पोहोचणार आहे, नाहीतर शिरोळ तालुका आणि कर्नाटकातील शिरगुप्पीच्या हद्दीत एका बाजूला हे मंदिर एकांतवासात राहणार आहे. 

शिरोळपासून नृसिंहवाडी आणि नृसिंहवाडीपासून १२ किलोमीटरवर खिद्रापूर हे गाव आहे. गावालगतच कृष्णा नदीचे पात्र आहे. मुबलक पाणी असल्याने ऊस आणि केळीच्या बागांनी सारा परिसर हिरवागार आहे. अशा परिसरात कृष्णा नदीच्या पात्रापासून काही अंतरावर हे मंदिर आहे. हे शिव मंदिर १२ व्या शतकातले आहे. या मंदिराच्या भिंती म्हणजे शिल्प सौंदर्याचा अस्सल नमुना आहेत. मंदिरातील प्रत्येक खांबावरील नक्षी वेगवेगळी आहे. हत्तींनी आपल्या पाठीवर या मंदिराचा भार उचलला आहे, असे दाखवणारी मंदिराची रचना आहे.

शिल्पसौंदर्य इतके अचूक आणि एकमेकास अनुरूप की त्या काळी किती सूक्ष्म पद्धतीने शिल्पकला साकारणारे कलाकार होते याची कल्पना करणेही अशक्‍य होते. हे शिल्प १२ व्या शतकातले म्हणजे साधारण आठशे नऊशे वर्षांपूर्वीचे. मंदिर आसपासच्या परिसरात माहीत होते; पण गेल्या पंचवीस तीस वर्षांत हे मंदिर खऱ्या अर्थाने अन्य लोकांच्या नजरेस आले. राज्य पुरातत्त्व विभागानेही या मंदिराची नोंद घेतली.

पुरातत्त्व विभागाने जरूर साऱ्या परिसराची डागडुजी केली. एक सुरक्षा रक्षक नेमला; पण अजूनही म्हणाव्या त्या ताकदीने या मंदिराचे शिल्प सौंदर्य पाहाण्यास पर्यटक येत नाहीत. एवढेच काय परदेशी पर्यटकांसाठी असलेल्या डेक्कन ओडिसी या रेल्वेमधून येणाऱ्या परदेशी प्रवाशांनाही या शिल्प सौंदर्याचे दर्शन घडण्यासाठी नेले जात नाही. हे मंदिर लांब आहे. जिल्ह्याच्या एका टोकाला आहे म्हणून पर्यटन विकास महामंडळही जर पर्यटकांना तेथे पोहोचवत नसेल तर मग या मंदिराला एकांतवासाशिवाय दुसरे काय वाट्याला येणार आहे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com