शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदी किशोरी पसारे

संदीप खांडेकर
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदी कमला महाविद्यालयाच्या किशोरी राजू पसारे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदी कमला महाविद्यालयाची विद्यार्थिनी किशोरी राजू पसारे, तर सचिवपदी साताराच्या आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनचा विद्यार्थी अमित विकास भिसे याची बिनविरोध निवड झाली. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दोघांचा सत्कार केला. महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्‍टच्या अंमलबजावणीनंतर विद्यार्थी मंडळासाठी ही पहिलीच निवड प्रक्रिया झाली. 

दुपारी अडीचच्या सुमारास निवडीस सुरवात झाली. अध्यक्षपदासाठी किशोरी व न्यू कॉलेजचा विद्यार्थी अभिषेक दादासाहेब श्रीराम यांनी अर्ज दाखल केले होते. अभिषेकने अर्ज माघारी घेतल्याने अध्यक्षपदी किशोरीचे नाव निश्‍चित झाले. सचिवपदासाठी अमित, उंब्रज (ता. कऱ्हाड) येथील मंगलताई जगताप महिला महाविद्यालयातील नम्रता नारायण काटवटे, किर्लोस्करवाडी (ता. पलूस, जि. सातारा) येथील शुभांगी सतीश नलवडे, सातारा मधील इस्माईलसाहेब मुल्ला महाविद्यालयातील विशाल जितेंद्र मांडरे यांनी अर्ज दाखल केले होते. पैकी नम्रता, शुभांगी व विशाल यांनी अर्ज माघार घेतल्याने अमितचा सचिवपदाचा मार्ग सुलभ झाला. दोघांच्या निवडीची घोषणा कुलगुरू डॉ. शिंदे यांनी केली. तसेच त्यांचा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पुस्तक देऊन सत्कार केला.

या वेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, वित्त व लेखाधिकारी डॉ. अजित चौगुले, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक व समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे उपस्थित होते. या वेळी सिनेट सदस्य प्रा. मधुकर पाटील, दीपक थोरात यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. 

केवळ दोन महिन्यांचे कारभारी
किशोरी व अमित पदावर केवळ दोन महिने राहतील. निवड प्रक्रिया लांबल्याने त्यांना एका अधिसभेत प्रश्‍न विचारण्याची संधी मिळणार आहे. दोन महिन्यांत त्यांचे शिबिरही घेणार असल्याचे विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. गुरव यांनी सांगितले. 

कमी कार्यकाळातही प्रश्‍न मांडणार
किशोरी पसारे ही नगरसेवक राजू पसारे यांची मुलगी आहे. या निवडीच्या निमित्ताने तिने राजकारणाची पहिली पायरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदी झेंडा फडकवला आहे. ती म्हणाली, ‘‘अधिसभेत विद्यार्थ्यांचे प्रश्‍न मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. भलेही दोन महिन्यांचा कार्यकाळ मिळाला असला, तरी त्याचा पुरेपूर लाभ उठवणार आहे.’’

Web Title: Kolhapur News Kishori Pasare on Students welfare comity