दारू दुकानांवरून महापालिका सभेत राडा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

कोल्हापूर - रस्ते हस्तांतराच्या माध्यमातून दारू दुकानांना परवानगी देण्याच्या ठरावावरून महापालिका सभेत आज जोरदार राडा झाला. ठरावासाठी दोन कोटी रुपयांची सुपारी फुटल्याचा गंभीर आरोपही सुनील कदम यांनी केला, तर ज्यांची दारू दुकाने सुरू आहेत त्यांची सुपारी विरोधी आघाडीने घेतल्याचा आरोप कॉंग्रेस गटनेता शारंगधर देशमुख यांनी केला. मानदंड पळविण्याचा प्रकार, प्रचंड गदारोळ, गोंधळ, कानठळ्या बसविणाऱ्या आवाजात रस्ते हस्तांतराचा ठराव 47 विरोधी 32 मतांनी मंजूर करण्यात आला. 

कोल्हापूर - रस्ते हस्तांतराच्या माध्यमातून दारू दुकानांना परवानगी देण्याच्या ठरावावरून महापालिका सभेत आज जोरदार राडा झाला. ठरावासाठी दोन कोटी रुपयांची सुपारी फुटल्याचा गंभीर आरोपही सुनील कदम यांनी केला, तर ज्यांची दारू दुकाने सुरू आहेत त्यांची सुपारी विरोधी आघाडीने घेतल्याचा आरोप कॉंग्रेस गटनेता शारंगधर देशमुख यांनी केला. मानदंड पळविण्याचा प्रकार, प्रचंड गदारोळ, गोंधळ, कानठळ्या बसविणाऱ्या आवाजात रस्ते हस्तांतराचा ठराव 47 विरोधी 32 मतांनी मंजूर करण्यात आला. 

"कुणी सुपारी घेतली आणि कुणी नाही' याची शहानिशा करण्यासाठी थेट महालक्ष्मीची शपथ घेण्याचे आव्हान विरोधी आघाडीच्या सदस्यांनी दिले. "केवळ लाख रुपयात बाटली उभी राहिली. लाख नव्हे पन्नास हजारांत, अरेरे...! काय ही स्थिती,' अशी मस्करीही विरोधी आघाडीने सत्तारूढ सदस्यांची केली. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गाच्या हस्तांतराचा विषय न्यायप्रविष्ट बाब आहे. आयआरबीचा गुंता अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे ठराव मतदानासाठी घेताच कसा, अशी विचारणा करत भाजप-ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी सभागृह डोक्‍यावर घेतले. सत्तारूढ कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य आणि विरोधी आघाडीमध्ये सभेत हातघाई झाली. सभाध्यक्षा महापौर हसीना फरास यांच्यासमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न विलास वास्कर यांच्यासह अन्य सदस्यांनी केला. यावेळी सभागृहात झालेल्या गोंधळामुळे महापौर भांबावून गेल्या. जबरदस्तीने मानदंडाला हात घातल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांसह महिला सदस्याही संतापल्या. दोन्ही आघाड्यांचे सदस्य महापौरांच्या टेबलभोवती जमा झाले. महापौरांनी हा ठराव बहुमतांनी मंजूर झाल्याचे सांगताच विरोधी आघाडीच्या सदस्यांना संताप पुन्हा अनावर झाला. अखेर एकमत होत नसल्यामुळे मतदानासाठी हा ठराव टाकण्याचा आदेश महापौरांनी दिला. विरोधी आघाडीचे सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, किरण नकाते, किरण शिराळे, अजित ठाणेकर, राजसिंह शेळके, संभाजी जाधव, संतोष गायकवाड, विजयसिंह खाडे यांनी मतदानास आक्षेप घेतला. ज्या रस्त्यांचे हस्तांतर व्हायचे आहे, ते रस्ते आयआरबीच्या ताब्यात आहेत. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. हस्तांतरास मंजुरी दिल्यास प्रकरण अंगलट येणार आहे, असे विरोधी आघाडीचे मत होते. या वेळी वकिलांना पाचारण करण्यात आले. न्यायप्रविष्ट बाब असताना ठराव मतदानाला टाकताच कसा, असा जाब विरोधी आघाडीने नगरसचिवांनी विचारला. त्यावेळी महापौर आपल्या म्हणण्यावर ठाम राहिल्या. त्यांनी मतदानाचे आदेश दिले. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हात उंचावून सहमती दर्शवली. विरोधी आघाडीचे सर्वच सदस्य जागेवर उभे राहिले आणि "दारूबंदी झालीच पाहिजे. ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्यांचा निषेध असो' अशा घोषणा दिल्या. 

या गदारोळातच सत्यजित कदम यांनी ठरावासाठी 2 कोटी रुपयांची सुपारी फुटल्याचा आरोप केला. ज्यांच्यात धमक आहे त्यांनी महालक्ष्मीला जाऊन या क्षणीच खरे-खोटे करण्याचे आव्हान त्यांनी दिले. त्यावर शारंगधर देशमुख यांनी विरोधी आघाडीनेच लिकर लॉबीची सुपारी घेतल्याचा आरोप केला. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. या गदारोळातच सदस्यांच्या सह्या घेण्याचे काम सुरू होते. मतदानात ठरावाच्या बाजूने 47 आणि विरोधात 32 मते पडली. ठराव नामंजूर आणि उपसूचनेच्या बाजूने विरोधी आघाडीने मतदान केले. 

तत्पूर्वी प्रश्‍नोत्तराच्या तासात रस्ते हस्तांतरावर चर्चा सुरू झाली. रूपाराणी निकम म्हणाल्या, ""महिलांचा दारूच्या विरोधात रोष असताना ठराव मंजुरीचे धाडस करू नये. भागातील विकासकामांसाठी पैसे नाहीत आणि रस्त्यांची देखभाल दुरुस्ती कोठून करणार? महापौर आपण महिला आहात. ठराव मंजूर झाला तर महिलांचा अवमान होईल.'' 

दिलीप पोवार यांनी पुण्यासह भाजपची सत्ता जेथे आहे तेथे रस्ते हस्तांतराचा ठराव मंजूर झाल्याचे सांगितले. सुनील कदम यांनी जे रस्ते आपल्या ताब्यात नाहीत ते घेण्याचा का प्रकार आहे का? कुणाच्या हितासाठी ठराव आणला गेला? कायद्याच्या कचाट्यात अडकणार हे ध्यानात ठेवा. रस्ते ताब्यात घेतले तर बांधकाम परवान्याचे नियम बदलणार आहेत. नागरिकांना वेठीस का धरता? असा सवाल त्यांनी केला. 

शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत म्हणाले, ""आयआरबीकडे रस्ते हस्तांतरित केले आहेत. सर्वोच्च न्यायालयात खटला प्रलंबित आहे.'' सरनोबत यांच्या खुलाशानंतरही सुनील कदम चढ्या आवाजात मत मांडत होते. शेवटी ते मूळ मुद्द्यावर आले आणि त्यांनी ठराव मंजुरीसाठी दोन कोटींची सुपारी फुटल्याचा खळबळजनक आरोप केला आणि सत्तारूढ आघाडीत आणि त्यांच्यात वादाची ठिणगी पडली. "पुरावे द्या आरोप करू नका,' असे सत्तारूढ सदस्य सांगत होते. शारंगधर देशमुख यांनी लिकर लॉबीची सुपारी विरोधी आघाडीने सुपारी घेतल्याचा आरोप केल्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. जिल्ह्यात दारूबंदी व्हावी, असे म्हणणे त्यांनी मांडले. असा ठराव झालाच पाहिजे, असा आग्रहही विरोधी आघाडीने धरला. देशमुख बोलत असताना विरोधी आघाडीचे कमलाकर भोपळे यांनी आक्षेप घेतला. या दोघांतील वाद हमरीतुमरीवर गेला त्यावेळी भोपळे यांना सावरताना सदस्यांना घाम फुटला. भोपळे यांना उचलूनच बाजूला नेण्यात आले. श्रावण फडतारे आणि प्रतापसिंह जाधव भोपळे यांच्या दिशेने धावले. गोंधळामुळे महापौरांना सभेचे कामकाज चालविणे कठीण झाले व त्यांनी सभा अर्धा तासासाठी तहकूब केली. 

दुपारी साडेतीनच्या सुमारास सभेचे कामकाज सुरू होताच पुन्हा याच विषयावरुन राडा सुरू झाला. प्रा. जयंत पाटील म्हणाले, ""डी- नोटिफिकेशनचा हा विषय आहे. मुळात आयआरबीचा विषय संपला का? पुणे-बंगळूर हा जुना राष्ट्रीय महामार्ग नसल्याचा खुलासा झाल्यामुळेच त्यावेळी हॉटेल व्हिक्‍टर पॅलेसला परवानगी दिली. राष्ट्रीय आणि राज्यमार्ग हे सरकारच्या मालकीचे आहेत. वर्षानुवर्षे आपण ते दुरुस्त करत आहोत. राधानगरी रोड, गारगोटी, गगनबावडा आणि हुपरीकडे जाणारा राज्यमार्ग आपणच दुरुस्त करतो. राधानगरी रस्ता हा बाबूराव यांच्या गॅरेजपासून पुढे सुरू होतो, तसे पत्र नगरचना विभागाकडे आहे. रस्ते सरकारच्या मालकीचे आहेत, असे प्रतिज्ञापत्र आयुक्तांनी घालावे. त्यामुळे आयआरबीचा प्रश्‍न निकालात निघेल. त्यांचे चारशे कोटी रुपये कुणी द्यायचे, हा वादाचा विषय आहे. रस्ते डी-क्‍लासीफाईड झाले की संबंध राहणार नाही. ठराव रस्ते हस्तांतराचा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस दारूबंदीच्या विरोधात आहे. जिल्ह्यात दारूबंदी व्हावी अशी इच्छा आहे.'' 

प्रा. पाटील यांचा मुद्दा विरोधी आघाडीने उचलून धरून महापौरांनी दारूविरोधात मोहीम उघडावी. आताच्या आत्ता शहरातील दारू दुकाने बंद करूया. त्याचे नेतृत्व महापौरांनी करावे, असा आग्रह धरला. महापौरांनीही कोल्हापुरात दारूबंदी झालीच पाहिजे, असे सांगितले. महापौर एका बाजूला ठरावाच्या बाजूने तर दुसऱ्या बाजूला दारूबंदीच्या बाजूने भूमिका घेत होत्या. किरण नकाते यांनी हॉकी स्टेडियम परिसरात परवाना नसलेले दारू दुकान सुरू आहे. संबंधित मालकाला नोटीस वेळेत मिळणार नाही याची काळजी घेतली गेली. सेटिंग लावले गेले, असा आरोप केला. सायंकाळचे साडेचार वाजले तरी सभागृहात गोंधळ सुरू होता. महापौर तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतो आहे, असे विरोधी आघाडीचे सदस्य सांगत होते. 

"वसुली होणार...' 
किरण नकाते म्हणाले, ""ठरावासाठी ज्यांचे हात ओले झाले आहेत त्यांच्याकडून लवकरच वसुली सुरू होईल. हा ठराव वरती टिकणार नाही. थोड्या दिवसांत हे कळेल.'' 

सत्यजित कदम यांनी असेच वक्तव्य केले. त्यावर शारंगधर देशमुख यांनी, ""वसुली करणारा अजून जन्माला यायचा आहे,'' असे सांगत थेट आव्हान दिले. 

सभेची सुरवातच वादळी 
सभेची वेळ बाराची. साडेबारा वाजले तरी सभा का सुरू होत नाही, असे सुरवातीलाच भाजप-ताराराणी आघाडीने भूमिका घेत प्रभारी नगरसचिवांना धारेवर धरले. अधिकाऱ्यांच्या खुर्च्याही बाहेर टाकण्याची तयारी केली होती. साडेबाराच्या सुमारास सत्तारूढ आघाडीचे सदस्य दाखल झाले आणि कामकाजास सुरवात झाली. 

शिवसेना-राष्ट्रवादीत दुफळी 
"राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने काल रस्ते हस्तांतराचा ठराव मंजूर करू नये,' असे निवेदन दिले होते. शिवसेनेचे दुर्गेश लिंग्रस यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी अशीच भूमिका घेतली होती. आज राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. 

Web Title: kolhapur news kmc