केएमटी बसेचची अवस्था ना आरसा, ना वायपर

डॅनियल काळे
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर -  पापाची तिकटीजवळ केएमटी बस ताबूत विसर्जन मिरवणुकीत घुसल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असतानाच केएमटीच्या कारभाराची लक्तरेही वेशीवर टांगली जात आहेत. केएमटीच्या अनेक बसेसना ना आरसा आहे, ना पावसात त्यांचे वायपर सुरू असतात. तसेच ब्रेक फेल होणे, स्टेअरिंग लॉक होणे, अशा बसेसही केएमटीच्या ताफ्यात आहेत. त्यामुळे या बसेस चालविणे ही मोठी जोखीम असल्याचे अनेक वाहनचालकांचे म्हणणे आहे.

ब्रेक फेल असणाऱ्या बसेसही लवकर दुरुस्त होत नाहीत, त्यामुळे आम्ही करायचे तरी कसे? असा प्रश्‍न अनेक चालकांनी उपस्थित केला आहे.

कोल्हापूर -  पापाची तिकटीजवळ केएमटी बस ताबूत विसर्जन मिरवणुकीत घुसल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असतानाच केएमटीच्या कारभाराची लक्तरेही वेशीवर टांगली जात आहेत. केएमटीच्या अनेक बसेसना ना आरसा आहे, ना पावसात त्यांचे वायपर सुरू असतात. तसेच ब्रेक फेल होणे, स्टेअरिंग लॉक होणे, अशा बसेसही केएमटीच्या ताफ्यात आहेत. त्यामुळे या बसेस चालविणे ही मोठी जोखीम असल्याचे अनेक वाहनचालकांचे म्हणणे आहे.

ब्रेक फेल असणाऱ्या बसेसही लवकर दुरुस्त होत नाहीत, त्यामुळे आम्ही करायचे तरी कसे? असा प्रश्‍न अनेक चालकांनी उपस्थित केला आहे.

केएमटी बस ताबूत विसर्जन मिरवणुकीत घुसल्याने मोठा अनर्थ घडला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर आणखी एकाची प्रकृती गंभीर आहे. अपघाताच्या अनेक कारणांची चर्चा सुरू झाली असून काल ज्या बसला अपघात झाला, ती एअर ब्रेक बस होती. मिरवणुकीच्या मागे बस गेल्यानंतर चालक ब्रेक दाबत दाबत गेला. त्या वेळी हवा कमी कमी होत गेली. त्यामुळे बसचा ब्रेक लागला नसावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. या अपघाताची कारणमीमांसा सुरू झाली आहे. अनेक बसेस चालवायला ड्रायव्हर नकार देतात. कारण या बसेसची स्थितीच इतकी वाईट आहे. ब्रेक लागत नाही, वायपर चालू नाही की, अनेक बसेसना आरसेच नाहीत. पॉवर स्टेअरिंगही मध्येच लॉक होतात. त्यामुळे बस चालवायची तरी कशी? असा सवाल अनेक चालकांना पडत आहे. शहरात गर्दी वाढत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी असते. अशा स्थितीत जोखीम पत्करूनच चालक बसेस चालवत आहेत. 

सुभाष स्टोअर्स लुटणारा वर्कशॉपचा प्रमुख
दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या सुभाष स्टोअर्स विभागाची लूट करणारे डिझेल घोटाळ्यांसह अनेक बाबतीत संशयास्पद कारभार असणारे एम. टी. सावंत यांच्याकडेच केएमटीच्या वर्कशॉपची धुरा देण्यात आली आहे. सावंत यांची कारकीर्दच वादग्रस्त आहे. त्यामुळे पुन्हा त्यांच्याकडे हा विभाग कशासाठी दिला? असा सवाल उपस्थित होतोय.

गर्दीच्या ठिकाणी थांबे नकोच

कोल्हापूर शहराची दळणवळणाची वाहिनी म्हणून केएमटी बसकडे पाहिले जाते. नेहमी या ना त्या अपघाताने, चालक-वाहकांच्या संपामुळे, रोजंदारीमुळे महापालिकेचा परिवहन विभाग चर्चेत असतो. कालच्या पापाची तिकटी परिसरातील अपघातामुळे तर तो पुन्हा उजेडात आला. सभापतीच्या घरावर पोलिस बंदोबस्त ठेवावा लागला. मात्र ज्या दोघांचे हकनाक बळी गेले त्यांचा यात काय दोष होता? अपघात का झाला? अपघात टाळण्यासाठी काय केले पाहिजे, यावर एक दृष्टिक्षेप...

गर्दी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग हवेतच
शहरातील ज्या गर्दीतून दुचाकी चालविणे मुश्‍कील होत आहे, तेथून २८ फुटी केएमटी बस रोज प्रवास करीत आहे. शहरातील काही गर्दीची ठिकाणे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. काल घडलेला अपघात अन्य ठिकाणी होण्याची वाट न पाहता ते टाळण्यासाठी शहरातील गर्दीच्या ठिकाणी रोजच्या फेऱ्या पर्यायी मार्गाने गेल्या पाहिजेत. काही सणासुदीला गर्दीच्या मार्गावरील फेऱ्या बंद किंबहुना पर्यायी मार्गाने धावणे आवश्‍यक आहे.

गर्दी आणि केएमटी...
खरी कॉर्नर ते पापाची तिकटी येथे सकाळी नऊ ते बारा आणि दुपारी साडेचार ते रात्री आठ दरम्यान मोठ्या प्रमाणात शाळेची मुले आणि गर्दी असते. बिनखांबी ते पापाची तिकटी रस्त्यावरून सायंकाळी चालणेही शक्‍य होत नाही. त्या रस्त्यावरील केएमटीच्या फेऱ्या बंद केल्या पाहिजेत.

माळकर तिकटी, शिंगोशी मार्केट, शिवाजी चौक, गंगावेस चौक, रंकाळा स्टॅंड चौक, खासबाग, मिरजकर तिकटी, जाऊळाचा गणपती कॉर्नर (रंकाळा टॉवर), सीपीआर (चिमासाहेब) चौक, अशा काही ठिकाणी नेहमी गर्दी असते. तेथे केएमटीचा प्रवास सुखकर होण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत.

महाद्वार रोडवर केएमटी खरोखरच गरजेची आहे काय? याचाही प्रशासनाने पुन्हा विचार करण्याची वेळ आली आहे. पापाची तिकटीला झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हा मार्ग केएमटीसाठी बंद केला पाहिजे. 

उपनगरातील प्रवाशांची सोय होईल आणि केएमटीला त्याचा फायदा होईल, असे मार्ग नव्याने तयार करण्याची वेळ आली आहे. गर्दीतून जाणारी केएमटी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग प्रवाशांच्या सूचनांतून घेणे आवश्‍यक आहे. 
 
अपघात का झाला?
केएमटी बसचा ब्रेक फेल झाला नाही. गर्दीचा अंदाज आला नसल्याची माहिती चालकाने थेट कंट्रोलमध्ये दिली आहे. ताबूत विसर्जन मिरवणुका ज्या मार्गाने जाणार आहेत त्या मार्गावर केएमटी-एसटी वाहतूक बंद केली पाहिजे. असे न घडल्यामुळेच काल दोघांचे बळी गेले. यावरून केएमटी चालकावर किती ताण असू शकतो, याचाही अंदाज येतो.

धोकादायक थांबे
शिवाजी चौक, बिंदू चौक या ठिकाणी असलेल्या थांब्यामुळे वाहतूक खोळंबते. रस्त्याकडेला जादा जागा असलेल्या ठिकाणीच असे थांबे असले पाहिजेत. शिवाजी रोडवर हॉटेल चोपदारजवळ असलेला थांबा हलविणे आवश्‍यक आहे. हा थांबाच वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहे. तेथेही नेहमी गर्दी असते. ब्रेक फेल किंवा अन्य कारणांवरून अपघात झाल्यास अनेकांचा बळी जाऊ शकतो.

Web Title: kolhapur news KMT Bus condition