केएमटी वर्कशॉप अधीक्षक निलंबित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - केएमटीच्या नादुरुस्त बसगाड्यांची जबाबदारी निश्‍चित करून आज केएमटी वर्कशॉपचे अधीक्षक एम. डी. सावंत यांना निलंबित करण्यात आले. महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी हे आदेश काढले.​

कोल्हापूर - केएमटीच्या नादुरुस्त बसगाड्यांची जबाबदारी निश्‍चित करून आज केएमटी वर्कशॉपचे अधीक्षक एम. डी. सावंत यांना निलंबित करण्यात आले. महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी हे आदेश काढले.

गेल्या आठवड्यात पापाची तिकटी येथे अपघात केलेल्या केएमटी बस (एमएच ०९ बीसी २१६६) च्या ब्रेकच्या वारंवार तक्रारी होत्या, असे त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात नमूद केले आहे. १५ डिसेंबर २०१६ ते २४ जुलै २०१७ पर्यंतच्या आठ महिन्यांत सहावेळा ब्रेक लागत नाही, कमी लागतो, लोडला ब्रेक कमजोर आहे, अशा तक्रारी होत्या. त्यानंतर वारंवार या दुरुस्त्या करण्यात आल्या. अपघातादिवशी बस केएमटी वर्कशॉपमधून बाहेर सोडली, त्या वेळी ती सुस्थितीतच होती, असेही या अहवालात नमूद केले आहे. दरम्यान, अपघातानंतर या समितीने ३४ बसगाड्यांची पाहणी केली. त्या वेळी अनेकांमध्ये तक्रारी आढळून आल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली.

केएमटी बस पापाची तिकटी येथून जाणाऱ्या ताबूत विसर्जन मिरवणुकीत घुसली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला. या अपघाताच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, सहायक आयुक्त संजय भोसले, मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांची समिती नेमण्यात आली. या समितीने अपघाताच्या अनुषंगाने या बसचे पोस्टमार्टमच केले. या वाहनाचे डेली लॉगशीट, त्या दिवशीचा बसचा वाहतूक तक्ता तपासण्यात आल्या. बसवर नेहमी काम करणाऱ्या चालक-वाहकांचे जबाब नोंदविण्यात आले.
वाहतूक बंदविषयी सूचनाच नाही

विसर्जन मिरवणुकीच्या काळात रस्त्यावरची वाहतूक बंद करताना वाहतूक शाखेकडून किंवा पोलिस प्रशासनाकडून त्याबाबतचे पत्र येते. किमान जाहीरनामा प्रसिद्ध केला जातो; पण ताबूत विसर्जनावेळी असा कोणताही जाहीरनामा किंवा पत्र आले नसल्यामुळे या मार्गावरची बससेवा सुरूच ठेवली होती.

दीड महिन्यापूर्वीच पासिंग
अपघात झालेल्या बसचे पासिंग १८ ऑगस्ट २०१७  ला करण्यात आले. ही बस २००८ मॉडेलची आहे. आतापर्यंत ही बस आठ लाख ३० हजार किलोमीटर धावलेली आहे.

अपघातापूर्वी तांत्रिक पाहणी
अपघातापूर्वी दोन दिवस अगोदर म्हणजेच २९ सप्टेंबर २०१७ ला या बसचे पासिंग झाल्यानंतर प्रशासकीय तांत्रिक निरीक्षण करण्यात आले. या तपासणीत बसच्या नेमक्‍या कोणत्या बाबी तपासण्यात आल्या, या सर्व गाड्यांच्या तपासणी रजिस्टर बुकमध्ये स्वाक्षरीसह स्वयंस्पष्ट उल्लेख दिसून येत नाही.

अपघाताबाबत समितीचे निष्कर्ष
- बस दुरुस्तीबाबत डेली व्हेईकल लॉगशीटमध्ये नोंदी घेतल्या आहेत. दुरुस्ती तक्रारीनुसार दुरुस्तीचे काम केले नाही, अशी बाब घडल्याचे दिसून येत नाही.
 - अपघात झाला, त्या वेळी बसची निश्‍चित तांत्रिकदृष्ट्या वस्तुस्थिती काय होती, याबाबत शासकीय विभागाकडून (आरटीओ) अहवाल प्राप्त होणे आवश्‍यक होते.

- तपासकामी बस पोलिस विभागाच्या ताब्यात असल्याने त्यावर भाष्य करता येत नाही.
-  अपघात घडला, त्या वेळी कोणती परिस्थिती अपघातास कारणीभूत झाली व कोणाच्या चुकीमुळे अपघात घडला, याबाबी पोलिस तपासातील असल्याने त्यावर भाष्य करता येत नाही.

-  त्या बसच्या ब्रेकबाबत वारंवार होत्या तक्रारी

- प्रशासकीय अधिकारी निर्दोष, अपघाताबाबत चालकाकडे बोट
- त्रिस्तरीय समितीने आयुक्तांकडे दिला अहवाल

Web Title: Kolhapur news KMT Workshop Superintendent Suspended