मल्हारपेठेत सुनेचा सासऱ्याकडून निर्घृण खून

मल्हारपेठेत सुनेचा  सासऱ्याकडून निर्घृण खून

कळे - अंघोळीच्या कारणावरून झालेल्या वादात सासऱ्याने सुनेचा पारळीने घाव घालून खून केला. हा प्रकार मल्हारपेठ (ता. पन्हाळा) येथे आज सकाळी साडेसातच्या सुमारास घडला. शुभांगी रमेश सातपुते (वय ३०) असे सुनेचे नाव आहे; तर पांडुरंग दशरथ सातपुते (७०) असे खुनी सासऱ्याचे नाव आहे. पांडुरंगने नातू मयुरेश (९, इयत्ता दुसरी) व नात कनिष्का (४) यांनाही गंभीर जखमी केले. याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात रमेश पांडुरंग सातपुते यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पांडुरंगवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 (व्हिडिआे - नितीन जाधव)

घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी - पांडुरंग सातपुतेचा परंपरागत चर्मोद्योग व्यवसाय आहे. त्याची दोन मुले संजय व रमेश हेही परंपरागत व्यवसाय करतात. पांडुरंग व त्याची पत्नी शांताबाई धाकटा मुलगा रमेशबरोबर राहतात. आज सकाळी अंघोळीच्या कारणावरून घरात वाद झाला. रमेशची मुले मयुरेश व कनिष्का शाळेला जाण्यासाठी तयार होत होती. या वेळी रमेशची आई शांताबाई या अंघोळीला निघाल्या. सून शुभांगी यांनी मुलगा मयुरेशला शाळेला जाण्यास उशीर होईल म्हणून आधी मुलांना अंघोळ घालते, तुम्ही थांबा, असे सांगितले व आधी मयुरेशला अंघोळीस दिले. त्यामुळे चिडून सासू शांताबाई यांनी सून शुभांगी व नातू मयुरेश यांना शिवीगाळ केली.

‘अण्णा, आईला मारू नका’
आईला आजोबा मारत असल्याचे पाहून मयुरेश व कनिष्का ही दोन्ही नातवंडे आरडाओरड करू लागली व ‘अण्णा, आईला मारू नका’ अशा विनवण्या करीत होती; पण पांडुरंगला जराही दया आली नाही. उलट त्याने नातवंडांवरही वर्मी घाव घातले. एवढेच नाही तर त्याने कनिष्का तावडीतून सुटून गल्लीत आल्यावर मागून येऊन तिच्या कपाळावरही मारले.

या वेळी रागाच्या भरात शुभांगीचा सासरा पांडुरंग सातपुते याने शुभांगी व नात कनिष्का यांच्यावर चाकू व रापीने वार केले. शुभांगीने चाकू व रापी हिसकावून घेऊन खिडकीतून बाहेर फेकले. त्यानंतर संतप्त पांडुरंगने लोखंडी पारळीने शुभांगीवर वर्मी घाव घातले. ते अडविताना शुभांगीचे दोन्ही हात मनगटापासून तुटले. तरीही पांडुरंग थांबला नाही. पाठोपाठ हातावर, पायावर, डोक्‍यात, पाठीवर एकापाठोपाठ एक वार करीतच राहिला. या वेळी आरडाओरडा करणाऱ्या दोन्ही नातवंडांनाही त्याने जखमी केले.

तत्पूर्वी, कोणी घरात सोडवायला येऊ नये म्हणून पांडुरंगने तळमजल्यावरील दरवाजा आतून बंद केला होता. आरडाओरड ऐकू येऊनही शेजाऱ्यांना दरवाजा उघडता आला नाही. काही वेळात पांडुरंगची मुलगी शारदाने आतून दरवाजा उघडला. दोन्ही लहान मुलांना व शुभांगीला त्याच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला; पण पांडुरंग कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. खून केल्यानंतर तो पारळी घेऊन गल्लीत येऊन बसला. या वेळी त्याच्या चेहऱ्यावर पश्‍चातापाचा लवलेशही नव्हता. झाल्या प्रकाराची माहिती शेजाऱ्यांनी रमेशला फोनवरून दिली. या वेळी घरी परतलेल्या रमेशला मारण्यासाठी पांडुरंग काठी घेऊन अंगावर धावून गेला.

घटनेची माहिती पोलिसांना समजताच कळे पोलिस घटनास्थळी हजर झाले व त्यांनी पांडुरंगला ताब्यात घेतले. रुग्णवाहिकेतून शुभांगी व तिच्या दोन्ही मुलांना ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यात आले. शुभांगीच्या अंगावरील घाव एवढे वर्मी लागलेले होते, की त्यांना उचलून रुग्णवाहिकेपर्यंत नेणे अवघड बनले. त्यामुळे त्यांना चादरीतून रुग्णवाहिकेपर्यंत न्यावे लागले. ‘सीपीआर’मधून नंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारांदरम्यान शुभांगी यांचा मृत्यू झाला. कळे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश देसाई अधिक तपास करीत आहेत.

वाद नेहमीचेच...
पांडुरंग नेहमीच दरवाजा लावून कुटुंबीयांना मारहाण करीत असे. रोजच वादाचा प्रकार घडत असल्याने आज घडलेली घटना एवढी भयंकर असेल, याची शेजाऱ्यांना कल्पनाही नव्हती; पण घटना पाहिल्यानंतर प्रकाराचे गांभीर्य सर्वांच्या लक्षात आले.

‘मला माहितीच नाही...’
पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पांडुरंगची पत्नी शांताबाई यांच्याकडे चौकशी केली असता, ‘मी अंघोळ करीत असताना बाहेर काय झाले,’ हे आपल्याला माहीत नसल्याचे सांगितले.

हृदयद्रावक चित्र
पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील व कळे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश देसाई यांनी दुपारी घराची पाहणी केली, ‘‘घराच्या पहिल्या मजल्यावरील स्वयंपाकघर, गॅलरीसह सर्व खोल्या रक्ताने माखल्या होत्या. गच्चीवर लहान मुलांचे रक्तात भिजलेले पायांचे ठसे उमटले होते. तळमजल्यावर व जिन्यावर रक्त सांडले होते. जमिनीवर पाय ठेवायलाही जागा नव्हती. स्वयंपाकघरात चपातीचे मळून ठेवलेले पीठ, टोस्ट बुडविलेले चहाचे दोन कप, गॅसवरून खाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेला लोखंडी तवा, चालू स्थितीतील गॅस असे हृदयद्रावक चित्र दिसत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com