‘कोल्हापूर आयटी हब’ लय भारी !

‘कोल्हापूर आयटी हब’ लय भारी !

पुण्यातील तरुण एकवटले - ‘कोल्हापूर’चे प्रमोशन ‘आयटी’तून जगभर

कोल्हापूर - ते येथे शिकले, मोठे झाले. आज ‘आयटी’मध्ये पुणे, मुंबई, बंगळूर, हैदराबादमध्येच नव्हे, तर परदेशातही नोकरी करीत आहेत. हे सर्वजण ‘कोल्हापूर आयटी हब’च्या व्हॉटस्‌ ॲप ग्रुपच्या माध्यमातून एकत्रित आले आहेत. ते कोल्हापूरच्या मातीचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहेत. जगभरातील आयटी कंपन्यांना कोल्हापुरात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. याचबरोबर कोल्हापूरचे प्रमोशन आयटीच्या माध्यमातून जगभर करीत आहेत.

आम्ही शिकलो, आयटीमध्ये जॉब करतो. पगार मिळतोच; पण कोल्हापूर सोडून जावे लागले. तरीही आमची नाळ आजही कोल्हापूरच्या मातीशी जोडलेली आहे. कोल्हापूरचा विकास झाला पाहिजे, तेथेही आयटी कंपन्या आल्या पाहिजेत ही आमची इच्छा आहे. त्यासाठी पुण्यातूनच सर्वांचे संघटन करण्याची कल्पना आली आणि त्यातून ‘कोल्हापूर आयटी हब’ हा व्हॉटस्‌ ॲप ग्रुप तयार केला. मूळचा पन्हाळा तालुक्‍यातील देवाळेतील सचिन चराटी सांगत होता. येथील आयसोलेशन हॉस्पिटलजवळ त्याचे घर आहे. या तिशीतील तरुणाच्या मनातील व्हॉटस्‌ ॲप ग्रुपने कमाल केली आहे. पाहता पाहता सदस्यांची संख्या वाढली आणि ग्रुप क्रमांक दोनही तयार झाला.

केवळ व्हॉटस्‌ ॲपवरील चर्चेवरून त्यांनी कोल्हापूरचे प्रमोशन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी ‘कोल्हापूर आयटी हब डॉट कॉम’ ही वेबसाईट सुरू केली. त्यासाठीचे वेब पेज डिझाईन रोहित पोवार याने केले. त्याला अपेक्षित सर्व सहकार्य ‘श्री’ आणि ‘बाबा’ काटकर यांनी केले. पदरमोड  करून त्यांनी ही वेबसाईट सुरू केली. याच वेबसाईटबरोबर इतर फ्लॅटफॉर्मवरूनही कोल्हापूरचे प्रमोशन केले जात आहे. रवी बेल्लाड यांनी गुगल पेज सुरू केले आहे. सचिन सातपुते, सुशांत सूर्यवंशी हे ट्विटरचे काम पाहत आहेत. अक्षय शिंदे याने लोगो डिझाईन केला आहे. पृथ्वीराज पाटील यांचाही सहभाग आहे. 

लवकरच आम्ही ‘पीपीटी’ तयार करून त्याचे प्रेझेंटेशन ग्रुप समोर करणार आहोत, असेही सचिन चराटी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

जगभर प्रमोशन...
अमेरिकेतील निनाद, जर्मनीमधील काही जण व्हॉटस्‌ ॲप ग्रुपसह इतर फ्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकत्रित आले आहेत. तेही मूळचे कोल्हापूरचे आहेत. तेही प्रमोशनसाठी सहकार्य करीत आहेत. जर्मन, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया येथे XING.COM यासारख्या वेबसाईट व इतर सोशल मीडियाचा प्रभाव अधिक आहे. तेथेही प्रमोशन करून तेथील कंपन्या कोल्हापुरात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी सरकारची मदत मिळविण्याचेही प्रयत्न असल्याचे चराटी यांनी सांगितले.

डॉक्‍टर, प्राध्यापकांचेही प्रोत्साहन
आयटीतील तरुणांबरोबर इतरही काही व्यक्ती या ग्रुपवर आहेत. त्यांच्याकडूनही प्रोत्साहन मिळत आहे. यामध्ये कोल्हापुरातील ‘सायबर’मधील आयटी विभागाचे प्रमुख व्ही. आर. कुलकर्णी, आरोग्य विभागातील निवृत्त अधिकारी डॉ. वणकुंद्रे हे सुद्धा कोल्हापुरातील आयटी प्रमोशनसाठी ग्रुपच्या माध्यमातून कार्यरत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com