हॉलीवूडला भुरळ कोल्हापूरच्या लोकेशन्सची!

संभाजी गंडमाळे
मंगळवार, 29 मे 2018

कोल्हापूर - कावळा नाका येथील मेरी वॉन्लेस हॉस्पिटल, छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, वरणगे-पाडळी येथील तलाव...अशी विविध लोकेशन्स आता हॉलीवूडला भुरळ घालणार आहेत. ‘रिमेंबर ॲम्नेसिया’ या चित्रपटाचा टिझर नुकताच लाँच झाला असून टोरांटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट दाखवला जाणार आहे. त्यानंतर तो सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

कोल्हापूर - कावळा नाका येथील मेरी वॉन्लेस हॉस्पिटल, छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, वरणगे-पाडळी येथील तलाव...अशी विविध लोकेशन्स आता हॉलीवूडला भुरळ घालणार आहेत. ‘रिमेंबर ॲम्नेसिया’ या चित्रपटाचा टिझर नुकताच लाँच झाला असून टोरांटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट दाखवला जाणार आहे. त्यानंतर तो सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

हॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. रवी गोडसे यांचा हा चित्रपट असून, सव्वा वर्षापूर्वी या चित्रपटातील काही प्रसंगांचे चित्रीकरण कोल्हापूर परिसरात झाले. डॉ. गोडसे अमेरिकेत चाळीस वर्षे स्थायिक आहेत. एरवी हॉलिवूडमध्ये जाण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात. मात्र, हॉलिवूडचा चित्रपटच चित्रीकरणासाठी कोल्हापुरात आला. वैद्यकीय व्यवसायातील विविध अनुभवांवर हा चित्रपट बेतला आहे. त्याचे चित्रीकरण येथे महालक्ष्मी सिने सर्व्हिसेसने यशस्वी केले. डॉ. गोडसे यांचे लेखन व दिग्दर्शन असून पॉल ग्रेग, कॅरॉल शाईन, कॅरी ओरेली, पीटर सिल्बरमन यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.  जेम्स हॅरीसन, सर्टीस कूक, लिसा वॉल्टर, रॉनडेल शेरीडन, तोवाह फेल्डशू यांच्यासह मराठीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, महेश मांजरेकर, श्रुती मराठे, मेधा मांजरेकर, जयंत वाडकर, विजय पाटकर, लोकेश गुप्ता आणि येथील अभिनेता आनंद काळे, प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. सूरज पवार यांच्या चित्रपटात भूमिका आहेत. 

लोकेशन्सची भुरळ
‘रिमेम्बर ॲम्नेशिया’ या हॉलिवूडपटानंतर बॉलीवूडच्या बहुचर्चित ‘पद्मावती’ चित्रपटाचे शूटिंग येथे झाले. त्यानंतर बेल्जियमच्या एका टीमच्या प्रोजेक्‍टचे चित्रीकरण झाले. जकीमपेठ, सांगवडे, शिंगणापूर, प्रयाग चिखली, हणमंतवाडी, पंचगंगा घाट, राजाराम बंधारा, पन्हाळ्याच्या पायथ्याची बुधवार पेठ, गगनबावड्यातील बावडेकर हवेली, वसगडेतील जुना वाडा, फुलेवाडीतील पाटलांचा बंगला, राधानगरीतील शिरगाव, कांबळवाडी, आवळी बुद्रुक, अणदूर, पळसंबे, असळज, निपाणीचा वाडा, आजऱ्यातील रामतीर्थ, कागल घाटगे सरकारांची विहीर, तसेच वारणा परिसरातील अनेक लोकेशन्सची आता निर्मात्यांना भुरळ पडते आहे. शहर आणि परिसरातील दहा ते बारा बंगले हे शूटिंगसाठीची चांगली लोकेशन्स म्हणून निर्मात्यांच्या यादीत समाविष्ट झाली आहेत. 

१०० जणांना काम...
एका चित्रपटाचे चित्रीकरण जेव्हा सुरू होते, त्यावेळी किमान शंभर लोकांना रोजगार मिळतो. ‘पद्मावती’सारख्या बिग बजेट चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी साडेचारशेहून अधिक लोकांना रोजगार मिळाला. सध्या वसगडेत सुरू असलेल्या मालिकेच्या शूटिंगमुळेही किमान १०० जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. 

‘रिमेंबर ॲम्नेसिया’ प्रदर्शित झाल्यानंतर आता येथील लोकेशन्सचे आणखी मार्केटिंग होणार आहे. त्यामुळे चित्रीकरण आणि एकूणच अर्थकारणाला चालना मिळणार आहे.
- आनंद काळे,
अभिनेता

Web Title: Kolhapur News Kolhapur Locations in Hollywood films