कोल्हापूर-सांगली रस्ता ‘डर्ट ट्रॅक’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - अपघातात सर्वाधिक बळी घेणारा रस्ता म्हणून चर्चेत असणारा कोल्हापूर-सांगली रस्ता पुन्हा एकदा अपघातप्रवण रस्ता बनला आहे. वाहन चालवताना या महामार्गावर डर्ट ट्रॅक चालवण्याचाच अनुभव घ्यावा लागत आहे.

कोल्हापूर - अपघातात सर्वाधिक बळी घेणारा रस्ता म्हणून चर्चेत असणारा कोल्हापूर-सांगली रस्ता पुन्हा एकदा अपघातप्रवण रस्ता बनला आहे. वाहन चालवताना या महामार्गावर डर्ट ट्रॅक चालवण्याचाच अनुभव घ्यावा लागत आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे, रस्त्याची ओबड-धोबड झालेली स्थिती पाहता हा रस्ता प्रवास सुखकर करण्यासाठी आहे की प्रवास खडतर करण्यासाठी, असा प्रश्‍न चालकांच्या मनात येत आहे. 

कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढू लागल्याने तसेच दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढल्याने या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार या मार्गाचे चौपदरीकरणाच्या कामास सुरुवातही झाली आणि दानोळी फाट्यापर्यंत चौपदरीकरणाचे कामही पूर्ण झाले. या मार्गावर ३४ वर्षे टोलचे भूत नागरिकांच्या मानगुटीवर बसत असल्यामुळे नागरिकांनी टोलला विरोध करण्यास सुरवात केली. त्यातच रत्नागिरी ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग मंजूर केला. त्यामुळे या मार्गावर कोल्हापूर-सांगली रस्ता येत असल्याने या मार्गावरील टोल माफ करावा आणि हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतर करावा, अशी मागणी पुढे आली. २०१५ साली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा मार्ग हस्तांतर केला जाईल, अशी घोषणा केली; परंतु अद्याप तो हस्तांतर झालेला नाही. काम करणाऱ्या कंत्राटदाराने ही काम थांबवले. यामुळे या रस्त्याची देखभालच नसल्याने या रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत.

सद्यस्थिती... कुठे काय?
- हेर्लेच्या अलीकडे पुलाजवळ वळताना रस्ता वरखाली असल्याने वाहन उडते.
-  मालेजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठे खड्डे पडल्याने चालकांना अंदाज येत नाही. वाहन खड्ड्यातून गेल्याने दणका बसतो.
-  रुकडीच्या अलीकडे पेट्रोल पंपाजवळ मोठे खड्डे 
 - रुकडीपासून पुढे गेल्यावर मध्ये मोठा स्पीडब्रेकरसारखा खड्डा
 - इचलकरंजी फाटा येथे खड्डेच खड्डे 
-  रामलिंग फाटा व त्याआधीच दोन्हीकडील रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा वाहनावरील ताबा सुटतो.
-  हातकणंगलेच्या अलीकडे पुलाजवळ खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान

वाहनांचा देखभाल खर्च वाढला
शिरोली फाटा येथून ते दानोळी फाट्यापर्यंत येताना आणि जाताना दोन्ही रस्त्यांवर खड्ड्यामुळे वाहन चालकांना डर्ट ट्रॅकचा थरार अनुभवण्यास मिळतो. वाहन चालवताना खड्डे चुकवतच वाहन चालवावे लागते. यामुळे प्रवाशांच्या आरोग्यावर परिणाम होतोच; शिवाय वाहनांचा देखभाल खर्च ही वाढू लागला आहे. 

Web Title: Kolhapur News Kolhapur-Sangli road 'dirt track'