योगा, प्राणायाम, व्यायाम हीच यशाची त्रिसूत्री 

योगा, प्राणायाम, व्यायाम हीच यशाची त्रिसूत्री 

कोल्हापूर - योगा, प्राणायाम व व्यायाम या त्रिसूत्रीमुळे "ब्रिटिश फॉर्म्युला थ्री'मध्ये देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकविणारी कामगिरी करता आली. मात्र आता ध्येय "ब्रिटिश फॉर्म्युला वन'मध्ये विजेते होण्याचे आहे. त्यासाठी नियोजनापूर्वक जोरदार सराव सुरू केला आहे, अशी माहिती ऍडव्हेंचर स्पोर्टस्‌च्या क्षितिजावरील उदयोन्मुख रेसर कृष्णराज धनंजय महाडिक याने आज दिली. इंग्लंडमध्ये झालेल्या बीआरडीसी "ब्रिटिश फॉर्म्युला थ्री'मध्ये एकोणीस वर्षांनंतर देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या कृष्णराजचे कोल्हापुरात आगमन झाले असून त्याने आज "सकाळ' कार्यालयाला भेट दिली. या वेळी तो बोलत होता. सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी रोप देऊन त्याचा सत्कार केला. 

कृष्णराज याने मनमोकळेपणाने आपली रेसिंगच्या क्षेत्राकडे वाटचाल कशी झाली, याबाबत दिलखुलास गप्पा मारल्या. देशात रेसिंगसाठी आवश्‍यक सोयी-सुविधा उपलब्ध होणे आवश्‍यक असून त्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्याने रोखठोक सांगितले. तो म्हणाला, ""पृथ्वीराज, विश्‍वराज व मला आमचे वडील तालमीत घेऊन जायचे. त्यांची इच्छा आम्ही कुस्ती करावी, अशी होती; पण माझ्या शारीरिक कुवतीचा अंदाज लक्षात घेता ती करणे माझ्या आवाक्‍याबाहेरचे होते. त्यामुळे वडिलांनी आम्हाला आपापल्या क्रीडा प्रकारांत लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. मोहितेज रेसिंग ऍकॅडमीतर्फे 2007ला हुपरी मार्गावरील अभिषेक कॉटस्पिन मिलच्या परिसरात "सर्किट 09' ट्रॅक केला होता. ऍकॅडमीचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते यांचा मुलगा ध्रुव हा माझा क्‍लोज फ्रेंड असल्याने मला गो कार्टिंगची आवड लागली. सचिन मंडोडी हे गो कार्टिंगमधील माझे प्रशिक्षक. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2008 ते 2015 पर्यंत मी माझ्या गटातील चॅम्पियनशिप पटकावली.'' 

मी 2013 मध्ये जे. के. टायर बीएमडब्ल्यू फॉर्म्युला रेसिंगच्या तयारीची सुरुवात केली. ते माझे लर्निंग इयर होते. मात्र 2014ला मी या स्पर्धेत टॉप थ्रीमध्ये आलो. त्यानंतर मला ब्रिटिश फॉर्म्युला थ्रीचे वेध लागले. माझ्यासाठी 2016 हे लर्निंग इयर होते. त्यावर्षी जगभरातून आलेल्या ड्रायव्हर्सच्या वेगाचा थरार अनुभवता आला. मी 2017ला विशेष नियोजन केले. आहार, फिटनेस यावर लक्ष केंद्रित केले. रेसिंगमध्ये ऐंशी टक्के मेंटली स्ट्रॉंग राहावे लागते, हे लक्षात घेत योगासनावर भर दिला. त्याचा परिणाम म्हणून मला ब्रिटिश फॉर्म्युला थ्रीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करता आली. रेस पाहण्यासाठी माझी आई व भाऊ हजर होता. त्यामुळे माझा आत्मविश्‍वास आणखी दुणावला होता. नरेन कार्तिकेयन यांच्यानंतर या रेसिंगमध्ये भारताचे नाव उज्ज्वल करणारा मी दुसरा भारतीय होतो. त्यामुळे या विजयाचा आनंद माझ्यासाठी नक्कीच वेगळा आहे, असेही तो म्हणाला. 

देशातील अनेक ड्रायव्हर्संना आंतरराष्ट्रीय स्तरावर रेसिंगची संधी हवी आहे. त्यासाठी प्रथम देशात त्या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध होणे आवश्‍यक आहे. त्यांना प्रायोजक मिळाले, तर ते देशाचे नाव नक्कीच मोठे करतील. त्यासाठी आवश्‍यक इक्विपमेंटस्‌ देशात मिळत नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. ते मिळवून देण्याची जबाबदारी शासनाची असल्याचे तो सांगतो. 

कोल्हापूरकर पाठीशी राहतील 
कृष्णराज म्हणाला, ""विवेकानंद महाविद्यालयात बी.कॉम. द्वितीय वर्षात शिकत आहे. महाविद्यालयाने मला खूप सहकार्य केले आहे. माझे वडील धनंजय महाडिक, आई अरुंधती महाडिक, भाऊ पृथ्वीराज व विश्‍वराज हे मला वेळोवेळी प्रोत्साहन देत आले आहेत. सर्व कोल्हापूरकर भविष्यात माझ्या यशासाठी पाठीशी राहतील, हा विश्‍वास आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com