गावातील एकी पुन्हा एकवटण्याची गरज - खोत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

गावाची सांघिक व एकीची भावना पुन्हा एकदा एकवटण्याची गरज आहे,’’ असे मत लेखक कृष्णा खोत यांनी आज येथे व्यक्त केले.    

कोल्हापूर - ‘‘नवीन बदल स्वीकारताना ग्रामीण गावाचा चेहरामोहरा बदलत आहे. त्यासोबत मनातील आपुलकी, एकमेकांविषयीचा जिव्हाळा कमी होत आहे. निकोप समाजनिर्मितीसाठी हा बदल अडथळा ठरणार असून, एकमेकांचे जगणे समजून घेत एकमेकांना आदर देत जगणे, असे ग्रामीण भागातील चित्र होते. त्यातील गावाची सांघिक व एकीची भावना पुन्हा एकदा एकवटण्याची गरज आहे,’’ असे मत लेखक कृष्णा खोत यांनी आज येथे व्यक्त केले.     

येथील करवीर नगर वाचन मंदिरातर्फे सुरू असलेल्या वि. स. तथा भाऊसाहेब खांडेकर स्मृती व्याख्यानमालेत ‘बदलता गाव - एक चिंतन’ या विषयावर ते बोलत होते. 

श्री. खोत म्हणाले, ‘‘ग्रामीण भागातील संस्कृतीही एकमेकांवर अवलंबून होती. त्यामुळे घरांची रचनाही एकमेकांना लागून होती. त्यामुळे शेजारधर्म पाळला जात होता. एकमेकांच्या घरात येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शेजारी धावून येत होते. त्यामुळे जिव्हाळा, आपुलकी गावात नांदत होती. अलीकडच्या काळात उलट परस्थिती झाली आहे. आपल्या घरात काय चाललंय हे दुसऱ्याला समजू नये अशी घरांची रचना आहे. त्यामुळे शेजाऱ्यांतील होणारा संवाद कमी होत आहेत. यातून सगळे अवतीभोवती असूनही एकटेपणा जाणवण्याइतपत आहे.’’  नंदकुमार मराठे, अश्‍विनी वळीवडेकर उपस्थित होते. मनीषा शेणई यांनी सूत्रसंचालन केले. दीपक गाडवे यांनी प्रास्ताविक केले.  

Web Title: Kolhapur News Krushna Khot speech in Vi Sa Khandekar Lecture