नियोजन करा, झपाटून कामाला लागा..!

नियोजन करा, झपाटून कामाला लागा..!

तज्ज्ञांचा सल्ला - करिअरची गुरुकिल्ली मिळवण्याची आज शेवटची संधी 

कोल्हापूर - गेले दोन दिवस येथे रंगलेल्या क्रिएटिव्ह ॲकॅडमी प्रस्तुत सकाळ लक्ष्य करिअर प्रदर्शनाला आज दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसूदन हॉलमध्ये प्रदर्शन सुरू असून उद्या (ता. १) करिअरची गुरुकिल्ली मिळवण्याची अखेरची संधी असेल. 

दरम्यान, प्रदर्शनांतर्गत आज झालेल्या सर्वच व्याख्यानांना विद्यार्थी व पालकांनी गर्दी केली. दहावी-बारावीनंतर करिअरचा मार्ग निवडण्यापेक्षा शालेय दशेपासूनच भविष्यातील करिअरचा विचार करून योग्य नियोजन 
करा आणि झपाटून कामाला लागा, असा मौलिक मंत्र यानिमित्ताने मिळाला. 

प्रदर्शनाच्या निमित्ताने एकाच छताखाली ‘लोकल टू ग्लोबल’ शैक्षणिक संधींचा खजिना उपलब्ध झाला आहे. प्रदर्शनात संगणक, माहिती तंत्रज्ञान, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, अभियांत्रिकीच्या विविध शाखा, मेडिकल आणि ॲनिमेशन, बॅंकिंग आदी संस्थांचा समावेश आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांच्या स्टॉलसह इतर विविध विद्या शाखांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध क्‍लासेसचा प्रदर्शनात सहभाग आहे. एकाच छताखाली लाखो शैक्षणिक संधींचे पर्याय प्रदर्शनातून उपलब्ध झाल्याने विद्यार्थी व पालकांच्या मनातील संभ्रमावस्था कमी झाल्याच्या प्रतिक्रिया यावेळी आवर्जून व्यक्त झाल्या. दरम्यान, संत गजानन शिक्षण संस्था, महागाव, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, यड्राव, डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत.

आजची व्याख्याने
सकाळी अकरा - पुण्यातील प्रा. क्षितिज पाटुकले ‘दहावी-बारावीनंतर पुढे काय’ या विषयावर संवाद साधतील. प्रा. पाटुकले यांनी ‘इन्शुरन्स आणि पेन्शन मॅनेजमेंट’ या विषयावर पीएचडी संपादन केली असून इन्शुरन्स, बॅंकिंग आणि फायनान्स या विषयावर त्यांच्या राज्यभरात अनेक ठिकाणी कार्यशाळा व सेमीनार्स झाले आहेत. ते मूळचे कुरुंदवाडचे आहेत.  

दुपारी साडेबारा - लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) डॉ. प्रदीप ब्राम्हणकर ‘एनडीए प्रवेश आणि त्याची तयारी’ या विषयावर ते संवाद साधतील. डॉ. ब्राह्मणकर पुण्यातील ॲपेक्‍स करिअर प्रशिक्षण संस्थेचे संचालक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर अनेक विद्यार्थ्यांची ‘एनडीए’मध्ये निवड झाली आहे.  

सायंकाळी पाच - पुण्यातील प्रसिद्ध क्रिएटिव्ह ॲकॅडमीचे 
विनित सुतार आणि इम्रान शेख ‘आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरची दिशा’ या विषयावर मार्गदर्शन करतील. क्रिएटिव्ह ॲकॅडमी ही आठवीपासूनच आयआयटी फौंडेशन आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारी संस्था आहे.

मोफत कल चाचणीला प्रतिसाद
प्रसिद्ध करिअर समुपदेशक दिवाकर ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत कल चाचणी परीक्षा झाली. त्यालाही विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांचा कल जाणून घेवूनच पालकांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असे यावेळी श्री. ठाणेकर यांनी सांगितले. कल चाचणीसाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुक्रवारी (ता. २) समुपदेशन केले जाणार आहे. दुधाळी येथील विकास हायस्कूलमध्ये दुपारी तीन वाजता समुपदेशन केले जाणार असून अधिक माहितीसाठी संपर्क - ९८९०९७२४६३ 

आत्मविश्‍वासानेच करिअरसाठी व्हा सज्ज 
तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्याविषयी सर्वात अगोदर सर्व माहिती जाणून घ्या. कुठल्या संस्थेत, क्‍लासमध्ये प्रवेश घेणार आहात त्याचीही सर्वांगीण माहिती घ्या आणि मगच तिथे प्रवेश घ्या, असा मौलिक सल्ला आज प्रसिद्ध समुपदेशक प्रा. शिरीष शितोळे यांनी दिला. ‘करिअर घडवताना’ या विषयावर संवाद साधताना त्यांनी करिअरच्या विविध वाटा आणि दिशा याबाबत सविस्तर विवेचन केले. पालकांनी मुलांवर कोणत्याही प्रकारचा दबाव न टाकता त्यांचा कल जाणून घ्यावा आणि त्यानंतरच पुढील निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com