कारखानदाराचा खून जमीन वादातून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

गोकुळ शिरगाव - तामगाव (ता. करवीर) येथील खाणीत मृतदेह आढळलेल्या कारखानदाराचा जमीन वादातून खून झाल्याची माहिती पुढे आली आहे. अजिज सैफुउद्दीन वजीर (वय ४५) असे त्यांचे नाव असल्याचे गोकुळ शिरगावचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज खाडे यांनी सांगितले.

गोकुळ शिरगाव - तामगाव (ता. करवीर) येथील खाणीत मृतदेह आढळलेल्या कारखानदाराचा जमीन वादातून खून झाल्याची माहिती पुढे आली आहे. अजिज सैफुउद्दीन वजीर (वय ४५) असे त्यांचे नाव असल्याचे गोकुळ शिरगावचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज खाडे यांनी सांगितले. दरम्यान, अजिजची पत्नी फातिमा यांनीही दुजोरा दिला आहे.

अजिज यांची पत्नी फातिमा यांनी सांगितले की, अजिज यांच्या वडिलांनी एस. व्ही. इंजिनिअरिंग वर्क्‍स कारखाना सुरू केला. ४ नोव्हेंबर २०१७ ला अजिज घरातून काम बघून येतो म्हणून सांगून गेले होते. गेली पाच महिने ते परतलेच नाहीत. काही वर्षांपूर्वी साडेचार गुंठ्यांचा प्लॉट व एक गुंठा जमीन तामगाव व नेर्ली येथील एकाला गहाणवट दिली होती. त्याचे पैसे परत करूनही त्याने व्याजासह आणखी रकमेची मागणी केली होती. यातील मध्यस्थीनेही अजिजला फसवले होते. दरम्यानच्या काळात मिरज येथे वडिलांची शेतीची वाटणी करण्याचेही निश्‍चित झाले होते. अजिज घरातून जाण्याच्या एक दिवस अगोदर वाटणीवरून वाद झाला होता. वडिलांच्या निधनानंतर कारखाना बंद पडला, कर्जही झाले. 

दरम्यान, कारखाना चालत नसल्याने अजिज कुटुंबासह पुण्याला आठ वर्षे राहिले. नंतर पुन्हा ते गोकुळ शिरगावला आले. कणेरी व तामगाव परिसरात पत्नी, मुलं भाड्याच्या घरात राहत आहेत. परंतु, भाडे देण्यासाठी मिळकत नसल्याने ते कारखान्याजवळच्या खोलीत राहू लागले.

तामगाव खाणीत मृतदेह सापडल्याची माहिती फातिमा यांना मिळाली. फातिमा यांनी खिशात ताईत ठेवण्यासाठी हिरव्या रंगाच्या कपड्याचा खिसा केला होता. नवीनच पॅन्टच्या दोन जोड्या आणल्या होत्या. त्यापैकी एक जोडी त्यांच्या अंगावर होती व एक घरी होती. यावरून तो मृतदेह माझ्याच पतीचा आहे, अशी खात्री पटल्याचे फातिमा यांनी सांगितले. पण हा मृतदेह अजिज यांचाच आहे हे डीएनए टेस्टचा अहवाल आल्यावरच नक्की होईल. तोपर्यंत मृतदेह अजिजचाच आहे, असे ठाम सांगणार नाही, असेही फातिमा यांनी सांगितले.

सह्या करण्यास नकार
जमीन घेणाऱ्यांनी नकली कागदपत्रे तयार केली होती. त्याच्यावर अजिज यांच्या सह्या पाहिजे होत्या. परंतु, त्यांनी सह्या करण्यास नकार दिला होता. त्यामुळे नेमके बेपत्ता होण्यामागचे कारण पोलिसांनी शोधून काढणे गरजेचे असल्याचेही फातिमा यांनी सांगितले.

जमिनी हडपण्यासाठी खून
अजिज वजीर यांची वडिलोपार्जीत जमीन तामगावला खाणीजवळ, कारखाना परिसरात जागा होती. या दोन्ही जागा गहाणवट दिल्या होत्या. पैसे आले की सोडवायच्या होत्या; पण या जमिनीपायी घातपात झाल्याचा संशय अजिजच्या पत्नी फातिमा यांनी व्यक्त केला आहे.

दोन संशयित ताब्यात

तामगाव परिसरातील खाणीत मिळालेल्या कारखानदाराच्या खूनप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते. संबंधित कारखानदाराचा मोबाईल हॅण्डसेट मिळाला आहे. त्याचे संदर्भ घेऊन पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेऊन 
चौकशी सुरू केल्याचे सांगितले.

मृतदेहाच्या खात्रीसाठी त्याच्या नातेवाइकांच्या रक्ताचे व इतर नमुने घेण्यात येणार आहेत. यासाठी आवश्‍यक डीएनए कीट पुण्यातून आणावे लागते. त्यासाठी आज गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यातील संबंधित अधिकारी पुण्याला रवाना झाले. संबंधित कीट उद्या उपलब्ध झाल्यानंतर पत्नीचे रक्ताचे आणि इतर नमुने घेऊन पुण्याला पाठविले जातील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

‘त्या’ खुनाशी पडताळणी
चित्रनगरी परिसरातील अशाच पद्धतीने एक खून झाला आहे. त्याला किमान पन्नास दिवस झाले आहेत. त्याचा तामगावातील खुनाशी संबंध आहे काय, याची पडताळणी सुरू आहे. चित्रनगरी परिसरातील विहिरीत आणखी काही महत्त्वाचे धागे-दोरे मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्या विहिरीतील पाणी कमी करण्याचे प्रयत्न दिवसभर सुरू होते.

Web Title: Kolhapur News land issue Murder of Industrialist