कोल्हापूरात जिल्ह्यात आढळतात महिन्याला १५ कुष्ठरोगी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यात कुष्ठरुग्णांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. जिल्ह्यात साधारणपणे महिन्याला १५ ते १६ रुग्ण सर्वेक्षणात आढळून येत आहेत. यात कागल तालुक्‍यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अधिक आहे.

कोल्हापूर - कुष्ठरुग्णांची संख्या वाढत असल्याने कुष्ठरोग निर्मूलनासाठी राज्य शासनाच्या वतीने मोहीम हाती घेण्यात आली आहे. यापूर्वी ‘देवीचा रोगी कळवा, आणि बक्षीस मिळावा’ अशी जाहिरात केली जात होती. याच धर्तीवर कुष्ठरोग निर्मूलनासाठी थोडासा बदल करत ‘कुष्ठरुग्ण कळवा आणि खात्री झाल्यावर बक्षीस मिळवा’ अशी योजना राबविण्यात येत आहे.

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यात कुष्ठरुग्णांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. जिल्ह्यात साधारणपणे महिन्याला १५ ते १६ रुग्ण सर्वेक्षणात आढळून येत आहेत. यात कागल तालुक्‍यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अधिक आहे.

कुष्ठरुग्णांकडे समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्यामुळे या रोगाच्या निर्मूलनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. कुष्ठरोगाच्या निर्मूलनाबरोबरच त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कामही राजर्षी शाहू महाराजांच्या काळापासून सुरू आहे. त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी स्वतंत्र वसाहत स्थापन करून त्या ठिकाणी चांगली घरे बांधून दिली. आजदेखील ही कुष्ठरोगी वसाहत आहे. या वसाहतीत आजपर्यंत हजारो कुष्ठरोग्यांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यासाठी आरोग्य विभागाचे सहायक संचालकांचे कार्यालय शेंडापार्क येथेच ठेवण्यात आले आहे. या कार्यालयातर्फे जिल्ह्यात कुष्ठरुग्णांसाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजना राबविल्या जातात. दरवर्षी कुष्ठरुग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण केले जाते.

या सर्वेक्षणात गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात कुष्ठरुग्ण वाढत असल्याचे दिसून येते. २०१५-१६ मध्ये १२४ रुग्ण आढळून आले होते. २०१६-१७ मध्ये १२२ आणि या वर्षी सप्टेंबर अखेर १२५ रुग्ण आढळले आहेत. पुढच्या महिन्यात पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यात आणखी काही रुग्ण आढळून येण्याची शक्‍यता आहे. या वर्षी आढळून आलेल्या १२५ कुष्ठरुग्णांमध्ये ४५ महिला आणि ३ बालकांचा समावेश आहे. ज्या गावामध्ये सर्वाधिक आणि ज्या गावात सर्वात कमी कुष्ठरुग्ण सापडतात त्यांचे प्रामुख्याने सर्वेक्षण केले जाते. गेल्या महिनाअखेरपर्यंत झालेल्या सर्वेक्षणात कागल, हातकणंगले तालुक्‍यात अधिक रुग्ण सापडत असल्याची नोंद आहे.

पंतप्रधानांच्या प्राधान्यक्रम यादीत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचा समावेश आहे. त्याची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सहायक संचालक (कुष्ठरोग) कार्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आरएनटीसीपी अंतर्गत डीएमसी येथे कार्यरत असणाऱ्या लॅब टेक्‍निशियन यांची दोन दिवसाची कार्यशाळा घेण्यात आली. जिल्ह्यात आणि शहरात आढळणाऱ्या सर्व कुष्ठरुग्णांची नोंद होणे आवश्‍यक आहे. त्यावरून कुष्ठरोग्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन होत असते. तरी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले आहे.

कुष्ठरोगाची लक्षणे
त्वचा तेलकट, लालसर, जाडसर, सुजलेली दिसणे. कानांच्या पाळ्या जाड होणे. भुवयांचे केस विरळ होणे. अंगावर गाठी येणे. त्या शरीराच्या बऱ्याच भागांवर व बऱ्याच संख्येने पसरणे. अशा डांगावर बऱ्याचदा बधिरता येते, संवेदनेचा अभाव ही कुष्ठरोगाची लक्षणं असू शकतात.

समाजामध्ये कुष्ठरोगाविषयी अनेक गैरसमज, भीती आणि अंधश्रद्धा आहेत. कुष्ठरोग निश्‍चित बरा होतो. तरीही भीतीपोटी किंवा अंधश्रद्धेपोटी लोक आजार लपविण्याचा प्रयत्न करतात. नागरिकांनी या रोगाची लक्षणे दिसताच शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा.
- डॉ. हर्षला वेदक, सहायक संचालक (कुष्ठरोग) 

Web Title: Kolhapur News Leprosy cases found in district