कर्जमाफीची रक्कम उद्यापासून होणार जमा

सुनील पाटील
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर -  शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीची रक्कम सोमवार (ता. २३)पासून खात्यावर जमा होण्याची शक्‍यता आहे. याबाबत शासनाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे व उपनिबंधकांनी जिल्हा बॅंकेकडे पात्र शेतकऱ्यांची यादी आज मागवली आहे. त्यानुसार जिल्हा बॅंकेतील यंत्रणा कामाला लागली. 

कोल्हापूर -  शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीची रक्कम सोमवार (ता. २३)पासून खात्यावर जमा होण्याची शक्‍यता आहे. याबाबत शासनाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे व उपनिबंधकांनी जिल्हा बॅंकेकडे पात्र शेतकऱ्यांची यादी आज मागवली आहे. त्यानुसार जिल्हा बॅंकेतील यंत्रणा कामाला लागली. 

शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीत जिल्ह्यात अडीच लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ५८५ कोटी ६८ लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. ही रक्‍कम थेट शेतकऱ्यांच्या नावावर जिल्हा बॅंकेत किंवा राष्ट्रीयीकृत बॅंकेत जमा केली जाणार आहे. 

जिल्ह्यातून २ लाख ७० हजार ५९० शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी अर्ज आले. या अर्जांपैकी १७ हजार ६२० शेतकऱ्यांना अपात्र  ठरविले. २ लाख ५२ हजार ९७० शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. जिल्हा बॅंकांत ५३ हजार २६२ थकबाकीदार आहेत. २२३ कोटी १७ लाखांची थकबाकीची रक्कम आहे. राष्ट्रीयीकृत, खासगी, ग्रामीण बॅंकांमधील ५४ हजार ७२९ थकबाकीदार आहेत. याचे ६५ कोटी १३ लाख रुपये थकीत आहेत. दरम्यान, कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील एकूण १ हजार ८४७ विकास कार्यकारी सहकारी संस्थांमधील २ लाख ५२ हजार ९७० सभासदांना मिळणार आहे.

कर्जमाफीसाठी संस्था पातळीवर सभासद आणि कर्जनिहाय अर्ज ऑनलाईन भरले. शासनाने केलेल्या छाननीत कोल्हापुरातील १७ हजार ६२० शेतकरी कर्जमाफीला अपात्र ठरले. अपात्र ठरलेल्यांची यादी वगळून टप्प्याटप्प्याने पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जात आहे. त्याच यादीनुसार कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा केली जाईल. दरम्यान, पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या यादीची बॅंक व शाखानिहाय फोड करून ही रक्कम ज्या त्या शेतकऱ्याच्या नावावर जमा केली जाईल. यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालय व जिल्हा बॅंकेचे अधिकारी आणि कर्मचारी आज सुटीच्या दिवशीही कामाला 
लागले आहेत. 

१० हजारांपासून ते दीड लाख जमा होणार
शासनाने पाठविलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्यांचे योग्य नियोजन झाले तर सोमवारपासून ज्या त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे; पण ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे, सरकारी नोकरी आहे, खासगी, पण टॅक्‍स भरणारा कर्मचारी आहे, अशा हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफीला अपात्र ठरविले. तर, अटी-शर्थीत बसणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर १० हजारांपासून दीड लाखांची रक्कम जमा केली जाईल. शासनाने याबाबतची माहिती देण्यासाठी आज जिल्हा निबंधक व जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हा बॅंकेला माहिती कळविली. 

जिल्ह्यातील कर्जमाफीची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जाईल. शासनाने मागितलेल्या सर्व माहितींची पूर्तता केली जात आहे. सोमवारपासून कर्जमाफीची रक्‍कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकते.
- धनंजय डोईफोडे, विभागीय सहनिबंधक.

Web Title: Kolhapur News Loan waiver amount submitted in account from tomorrow