रिक्षाचालकांचीही कर्जमाफीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - प्रामाणिक रिक्षाचालकांचे कर्ज माफ करा, या प्रमुख मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्हा सर्व रिक्षाचालक - मालक संघटनेच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. प्रामाणिकपणे रिक्षा व्यवसाय करूनही विमा आणि इतर खर्चात वाढ झाल्यामुळे रिक्षाचालक कर्जबाजारी झाला आहे. उद्योजकांप्रमाणेच त्यांचीही कर्जमाफी करा, अशी मागणी ॲड. बाबा इंदुलकर यांनी मोर्चाने जाऊन केली. मागण्यांचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार यांना देण्यात आले.

रिक्षाचालकांच्या मागण्यांसाठी आज सुमारे दीड-दोनशे रिक्षाचालकांनी मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून मोर्चा काढला. दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरू झालेल्या मोर्चामुळे मध्यवर्ती बस स्थानक परिसरात गर्दी झाली होती. तेथून मोर्चा प्रादेशिक परिवहन कार्यालयात पोचला. तेथे ‘आर.सी.बुक कोरे करा’, ‘रिक्षाचालकांचे कर्ज माफ करा’, अशा घोषणा देत सर्व रिक्षाचालक - मालकांनी निदर्शन केली. ॲड. बाबा इंदुलकर यांनी त्यांचे नेतृत्व केले. 

शहर आणि जिल्ह्यात ३० वर्षांपेक्षा अधिक काळ रिक्षाचालक व्यवसाय करीत आहेत. प्रवाशांच्या सेवेत ते अविभाज्य घटक ठरले आहेत. शासन नियमानुसार ते व्यवसाय करीत आहेत. वाहन कर, विमा, पासिंग, फिटनेस यांचे तंतोतंत पालन करून रिक्षा व्यावसायिक प्रामाणिकपणे व्यवसाय करत आहेत. तरीही शासनाच्या उदासीनतेमुळे कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत, सहकार्य मिळत नाही. परवानगी नसताना सहा आसनी रिक्षांचा प्रवासी वाहतूक व्यवसाय चालतो. परवाना, परमीट नसतानाही जुन्या, मोडक्‍या तीन आसनी रिक्षांचा प्रवासी वाहतूक व्यवसाय, क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक, अशा अनेक कारणावरून प्रामाणिक रिक्षाचालकाला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. दिवसाकाठी केवळ १५०-२०० रुपये शिल्लक राहत आहेत. २०१६ मध्ये देशातील राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ११ मोठ्या उद्योजकांचे अंदाजे १ लाख ४ हजार कोटी रुपयांची कर्जे ‘राईट ऑफ’ केली अर्थात माफ केली आहेत. अशाच पद्धतीने रिक्षाचालकांना झालेली कर्जे शासनाने माफ करावीत, अशी आमची मागणी असल्याचे निवेदन डॉ. डी. टी. पवार यांना शिष्टमंडळाने दिले.

विजय गायकवाड, जाफर मुजावर, रमेश पोवार, अरुण घोरपडे, अवि वांद्रे, अमोल पांढरे, अतुल जोहरी यांच्यासह इतर रिक्षाचालक-मालकांचा शिष्टमंडळात समावेश होता.

Web Title: kolhapur news loanwaiver demand by rickshaw driver