कोल्हापूरातील करवीर वाचन मंदिरात अंधांसाठी अब्रार सॉफ्टवेअर 

अमोल सावंत
गुरुवार, 4 जानेवारी 2018

लुई ब्रेल जन्मदिन विशेष 

कोल्हापूर - करवीर नगर वाचन मंदिरातर्फे वाचकांसाठी नित्य नवे उपक्रम केले जातात. या उपक्रमांचाच एक भाग म्हणून 2010 मध्ये अंधांसाठी ब्रेल ग्रंथालय विभाग सुरू केला. याबरोबर अंधांसाठी अब्रार नामक सॉफ्टवेअरही उपलब्ध करून दिले.

कोल्हापूर - करवीर नगर वाचन मंदिरातर्फे वाचकांसाठी नित्य नवे उपक्रम केले जातात. या उपक्रमांचाच एक भाग म्हणून 2010 मध्ये अंधांसाठी ब्रेल ग्रंथालय विभाग सुरू केला. याबरोबर अंधांसाठी अब्रार नामक सॉफ्टवेअरही उपलब्ध करून दिले.

ग्रंथालय विभाग आणि सॉफ्टवेअरचा लाभ अनेक अंध विद्यार्थी, व्यक्ती घेत आहेत. ब्रेल ग्रंथालयात विविध नामवंत लेखकांची पुस्तके, चरित्रे आहेत. या पुस्तकांनी अंध व्यक्तींच्या जीवनात जगण्याची असीम जिद्द निर्माण केली. आठवड्यातून किमान चार ते पाच अंध व्यक्ती या ग्रंथालयात येऊन वाचनाचा आनंद मिळवितात.

ग्रंथपाल मनीषा शेणई म्हणाल्या, ""पुणे येथील ब्रेल विभागाच्या संपादिका मीरा बडवे यांनी करवीर नगर वाचन मंदिर संस्थेला ब्रेल भाषेत रूपांतरित केलेल्या 47 पुस्तकांचे 89 खंड पाठवून दिले. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या गणेश भक्त मंडळाने संस्थेला अंध विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे अब्रार हे अत्याधुनिक उपकरण भेट दिले. नागपूर येथील सक्षम संस्थेने हे उपकरण विकसित केले आहे. माधव नेत्रपेढीने ते प्रचारात आणले. याबरोबर ब्रेल विभागातील पुस्तकांची यादीही उपलब्ध आहे. यामध्ये 125 पुस्तकांचा समावेश आहे.'' 

अंजली निगवेकर, दत्तात्रय वाडेकर, संगीता निकम, वसंत सुतार, प्रिया पवार, श्रद्धा धोंगडे, प्रणाली कांबळे, शुभम चौगुले, रोहन लाखे, राजू शिंदे, शरद पाटील, अक्षदा सूर्यवंशी अशा अनेक विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतला. खाली जमीन, वर आकाश, थैलीभर गोष्टी, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांचे आई समजून घेताना, चाकाची खुर्ची, वीणा गवाणकर यांचे एक होता कार्व्हर, गोष्टी माणसांच्या, डॉ. नरेंद्र जाधव यांचे आमचा बाप अन्‌ आम्ही, डॉ. अभय बंग यांचे माझा साक्षात्कारी हृदयरोग, वाईज अँड अदरवाईज, महाश्‍वेता, पुण्यभूमी भारत अशा पुस्तकांचा लाभ विद्यार्थी घेतात. 

विद्यार्थ्यांना पुस्तक मिळाले, तर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय असतो. वाचनालयातील कर्मचाऱ्यांनाही अंध विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचे समाधान मिळते. 40 विद्यार्थी या ब्रेल पुस्तक विभागाचे सभासद आहेत. पुणे येथील निवांत अंध विकासालयातून दरवर्षी ब्रेल लिपीवरील पुस्तके येतात. यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
- मनीषा शेणई,
ग्रंथपाल. 

काय आहे अब्रार उपकरण? 
अब्रार उपकरणामुळे एकावेळी आठ ते दहा विद्यार्थी अभ्यास करू शकतात. अब्रार हे ऑडिओ रेकॉर्डिंगचे मशिन आहे. यात विद्यार्थी कोणतेही व्याख्यान रेकॉर्ड करून ते ऐकू शकतात. हे उपकरण वापरासाठी सोपे आहे. याचा चांगला उपयोग अंध विद्यार्थ्यांना होतो. 

ब्रेल ही भाषा नव्हे...! 
ब्रेल ही भाषा नव्हे; तर ती एक डॉटस्‌ नामक सिस्टम आहे. अंध व्यक्ती किंवा डोळ्यांना कमी दिसते, अशा व्यक्ती या डॉटस्‌ना स्पर्श करून पुस्तके वाचू शकतात. याबरोबर शिक्षक, पालक, अन्य लोक जे डोळस आहेत, अशांनाही ब्रेल लिपी वाचता येते. काही लोक म्हणतात, की ब्रेल ही वैश्‍विक भाषा आहे. जगातील अन्य भाषा ब्रेलमधील वर्णमालेचा उपयोग करतात. लुईस ब्रेल यांच्या नावावरून ही लिपी तयार केली. 

Web Title: Kolhapur News Louis Braille Birthday special