'स्वामिनाथन'च्या शिफारशी पवारांनी का स्वीकारल्या नाहीत ? - माधव भंडारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

कोल्हापूर - कृषी क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी स्वामिनाथन आयोगाची स्थापना भाजपच्या काळात झाली. त्याचा पहिला अहवाल २००४ मध्ये, तर दुसरा २००६ मध्ये आला. त्या वेळी डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान, तर शरद पवार कृषिमंत्री होते. त्या वेळी त्यांनी हा अहवाल स्वीकारता येणार नाही, असे सांगितले; मात्र सत्तेवरून पायउतार होताच अहवाल लागू करा, असे श्री. पवार सांगत आहेत.

कोल्हापूर - कृषी क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी स्वामिनाथन आयोगाची स्थापना भाजपच्या काळात झाली. त्याचा पहिला अहवाल २००४ मध्ये, तर दुसरा २००६ मध्ये आला. त्या वेळी डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान, तर शरद पवार कृषिमंत्री होते. त्या वेळी त्यांनी हा अहवाल स्वीकारता येणार नाही, असे सांगितले; मात्र सत्तेवरून पायउतार होताच अहवाल लागू करा, असे श्री. पवार सांगत आहेत.

पहिल्यांदा त्यांनी हा अहवाल का स्वीकारला नाही, ते जाहीर करावे, असे मत भाजपचे राज्याचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी  येथे व्यक्त केले. कृषी उत्पादनाला उत्पादन खर्चापेक्षा दीडपट हमीभाव देण्याची अंमलबजावणी यंदाच्या खरीप हंगामापासून करू, असेही त्यांनी सांगितले. एका कार्यक्रमासाठी श्री. भंडारी कोल्हापुरात आले होते, त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

ते म्हणाले, ‘‘सर्वच निवडणुकांकडे आम्ही गांभीर्याने पाहतो. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीतील पक्षाचा पराभव व्हायला नको होता. भविष्यात चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न राहील. यापुढच्या निवडणुकांवर या निकालाचा काही परिणाम होणार नाही. राज्यात भारतीय जनता पक्षाने जे काम केले, त्यातून काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांच्या अस्तित्वाचाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यातून वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्‍नांवर काही संघटनांना पुढे करून राज्यातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न सुरू असून आज निघणारे मोर्चे त्याचाच भाग आहे. आघाडी सरकार ही संकल्पनाच भाजपपूर्वी जनसंघाने रुजवली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २६ पक्षांचे सरकार पाच वर्षे चालविले, आताही ३० ते ३५ पक्ष भाजपबरोबर आहेत. स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची भीती वाटू लागल्याने काहीजण ही आघाडी सोडत आहेत, त्या सर्वांसह शिवसेनेलाही आमच्या शुभेच्छा आहेत.’’

ते म्हणाले, ‘‘गुजरातचे यश काठावरचे असले तरी ते देदीप्यमानच आहे. सलग २२ वर्षे एखाद्या पक्षाला सत्ता देण्याची परंपरा भारतात नाही. जातनिहाय समाजाची विभागणी, पक्षांकडून मतांचे विभाजन अशा परिस्थितीत गुजरातची सत्ता राखली हे कमी नाही. महाराष्ट्रात सरकारचे काम चांगले नसते तर विधानसभेनंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मग ती महापालिका असो, जिल्हा परिषद, पालिका, ग्रामपंचायत यात भाजपला लोकांनी भरभरून पाठिंबा दिला नसता. कर्नाटकात भाजपच सत्तेवर येईल, असा निष्कर्ष वेगवेगळ्या चाचणीतून निघत आहे. दर पाच वर्षांनी कर्नाटकमध्ये सरकार बदलते, या आशेवर आम्ही नाही; पण कर्नाटकच्या निकालाचा परिणाम त्यानंतर होणाऱ्या सर्वच निवडणुकांत दिसेल.’’

भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, हिंदू युवा प्रतिष्ठानचे अशोक देसाई, विजय जाधव आदी उपस्थित होते.

राज स्वतःच रोजगारमुक्त
श्री. भंडारी म्हणाले, ‘‘ज्यांचा एकच आमदार आहे, ज्या मुंबई महापालिकेत ते मालक असल्यासारखे वागतात, तिथे एकही नगरसेवक नाही. ज्यांच्या विचारावर एकही माणूस निवडून येऊ शकत नाही, अशा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच रोजगारमुक्त केले आहे. त्यांच्याकडून मोदीमुक्त भारताचा नारा म्हणजे यापेक्षा मोठा विनोद नाही.’’

६ एप्रिलला महाभाजप महामेळावा
मुंबईत ६ एप्रिलला महाभाजप महामेळावा होणार आहे. हा मेळावा म्हणजे निवडणुकीचीच तयारी आहे. मेळाव्यासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांपासून आमदार, खासदार, मंत्री उपस्थित राहणार आहेत. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्‍समध्ये होणाऱ्या या मेळाव्याला राज्यभरातून तीन लाख लोक सहभागी होतील असा अंदाज आहे, अशी माहिती श्री. भंडारी यांनी दिली.

आर्थिक स्थिती मजबूतच
राज्याची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचा दावा श्री. भंडारी यांनी केला. ते म्हणाले, ‘‘जागतिक बॅंकेच्या मानांकनानुसार राज्यावर एकूण उत्पन्नाच्या २२.५० टक्के कर्ज असायला हवे. सध्या हे प्रमाण १६.५० टक्के आहे. तुलनेने जादा कर्ज घेतले असले तरी रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे.’’

शत्रू नव्हे, स्पर्धक
राज्यात आपला मुख्य राजकीय शत्रू कोण या प्रश्‍नावर श्री. भंडारी म्हणाले, ‘‘आम्ही शत्रू कोणालाही मानत नाही. ते आमचे विरोधकही नाहीत. आमच्यादृष्टीने ते स्पर्धक आहेत आणि स्पर्धा ही जिंकण्यासाठीच असते.’’

Web Title: Kolhapur News Madhav Bhandari comment