...म्हणूनच आम्ही सभेला आलो : महादेवराव महाडिक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - धर्माला ग्लानी आली की, एखादी शक्ती अवतार बनून येते, त्याचप्रमाणे मी व पी. एन. पाटील या सभेला उपस्थित आहोत, या शब्दांत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी  ‘गोकुळ’च्या सभेला लावलेल्या उपस्थितीबद्दल खुलासा केला. 

कोल्हापूर - धर्माला ग्लानी आली की, एखादी शक्ती अवतार बनून येते, त्याचप्रमाणे मी व पी. एन. पाटील या सभेला उपस्थित आहोत, या शब्दांत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी  ‘गोकुळ’च्या सभेला लावलेल्या उपस्थितीबद्दल खुलासा केला. 

‘गोकुळ’ची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. या सभेला पहिल्यांदाच पी. एन. व श्री. महाडिक उपस्थित होते. सभेतील इतर प्रथांना फाटा देत या दोघांची 
भाषणे झाली. 

श्री. महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘‘राज्यातील नव्हे तर देशातील एक नंबरचा चार्टर्ड अकौंटंट आणून संघाची चौकशी करा, आम्ही त्याला घाबरत नाही. या संघाला वैभव शिखरावर नेण्याचे काम उत्पादकांनी केले आहे, त्याला कर्मचाऱ्यांची भक्कम साथ मिळाली आहे.

उत्पादकांच्या गोठ्यापर्यंत सेवा पुरवणारा देशातील हा एकमेव संघ आहे. त्यामुळेच जिल्ह्यात ‘गोकुळ’ ला पर्याय नाही. ‘अमूल’ने सुरुवात केली. पण त्यांना यश मिळाले नाही. कणखर मनाचे उत्पादक इकडे तिकडे गेले नाहीत.’’

पैसा माणसाला मोठा करतो, वर नेतो. पण वर जाताना कोणताही माणूस पैसा नेत नाही, असा टोला लगावून श्री. महाडिक म्हणाले, ‘‘संघाच्या कारभारावर बोलणाऱ्या विरोधकांनी राज्यातला नव्हे तर देशातील एक नंबरचा सीए आणून कारभाराची चौकशी करावी, त्यांना त्यात काहीही आक्षेपार्ह मिळणार नाही. त्यांनी बोलायचे म्हणून काहीही बोलू नये.’’ या वेळी पी. एन. म्हणाले, ‘‘राज्यात नव्हे तर देशात ९२ कोटी इतका विक्रमी फरक कोणताही संघ देत नाही. संघाच्या एका कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी ‘गोकुळ’ हा सहकारी संस्था आहे की, टाटा, बिर्ला यांची कंपनी असा गौरव केला होता. त्यावरूनच संघाचे काम दिसून येते. या गुणवतापूर्ण कामामुळेच संघाला राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ही चांगल्या कामाची पोचपावतीच आहे.’

या सभेला शाहुवाडीचे आमदार सत्यजित पाटील हेही उपस्थित होते. कार्यक्रमात एनडीडीबीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ संचालक अरूण नरके यांचा सत्कार करण्यात आला. पी. एन. यांनीही श्री. नरके यांचे अभिनंदन केले. सभेला सर्व संचालक उपस्थित होते. 

त्यांना ‘आंबे’ मिळणार नाहीत
लोक बाभळीच्या झाडाला दगड मारत नाहीत तर आंब्याच्या झाडालाच मारतात. पण ‘गोकुळ’ च्या या झाडावर श्रीकृष्ण खेळला आहे. त्यामुळे या झाडाच्या आंब्याचा देठ मजबूत आहे. त्यामुळे कोणालाही या झाडाचे ‘आंबे’ पडणार नाहीत, संघासाठी योगदान देणाऱ्यालाच त्याचे फळ मिळणार, असा टोलाही श्री. महाडीक यांनी यावेळी लगावला. 

टाळ्या, शिट्ट्या
या सभेला पी. एन. व महाडीक हे व्यासपीठाकडे येण्यास निघताच उपस्थितांनी टाळ्या व शिट्ट्यांसह या दोघांच्या जयजयकाराच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. श्री. महाडीक यांनी आपल्या भाषणात संघाची प्रगतीचे आकडे कोणत्याही कागदाशिवया वाचून दाखवले. त्यात दूध संकलन, वासरू संगोपन योजनेतील लाभार्थी, दूध विक्री, दुध फरकाची रक्कम आदिंचा समावेश होता.

Web Title: kolhapur news mahadevrao mahadik comment