खासदार धनंजय महाडिक - सतेज पाटील यांच्यात शह-काटशह

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

कोल्हापूर - राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या वतीने आयोजित कृषी-पशुपक्षी प्रदर्शनासाठी मेरी वेदर मैदान न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी तसे लेखी आदेश काढले आहेत. 
या निर्णयावरून महाडिक व आमदार सतेज पाटील यांच्यात पुन्हा शह-काटशहाचे राजकारण रंगण्याची शक्‍यता आहे. 

कोल्हापूर - राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या वतीने आयोजित कृषी-पशुपक्षी प्रदर्शनासाठी मेरी वेदर मैदान न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी तसे लेखी आदेश काढले आहेत. 
या निर्णयावरून महाडिक व आमदार सतेज पाटील यांच्यात पुन्हा शह-काटशहाचे राजकारण रंगण्याची शक्‍यता आहे. 

श्री. महाडिक यांच्या वतीने २६ ते २९ जानेवारी दरम्यान पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या अशा कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन शहरातील मेरी वेदर मैदानावर होईल, अशी जाहिरात श्री. महाडिक यांच्याकडून सुरू आहे. मैदानाची मालकी शासनाची असली तरी ते शहरात असल्याने त्यावर महापालिकेच्या परवानगीशिवाय काही करता येत नाही. श्री. महाडिक यांनी महापालिकेकडे या मैदानाची मागणी केली होती. 

गेली अनेक वर्षे हे प्रदर्शन मेरी वेदर मैदानावरच भरवले जाते. गेल्या वर्षीही याच मैदानावर हे प्रदर्शन झाले होते. परंतु, त्यानंतर २० मार्च २०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हे मैदान खेळाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी न देण्याचा ठराव करण्यात आला. महापालिकेत राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता आहे. त्याचे नेतृत्व आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील करतात. 

या दोघांचे सद्यःस्थितीत खासदार महाडिक यांच्याशी मतभेद आहेत. त्यातूनच हा ठराव करण्यात आल्याचे बोलले जाते. या ठरावाच्या आधारे आयुक्त चौधरी यांनी १२ जानेवारीला हे मैदान कृषी प्रदर्शनाला देता येणार नसल्याचे श्री. महाडिक यांना लेखी कळवले आहे. 

आता याच मैदानावर हे प्रदर्शन घेण्याचा चंग श्री. महाडिक यांनी बांधला आहे. त्यातून त्यांनी हे मैदान प्रदर्शनासाठी मिळावे म्हणून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे मागणी केली आहे. मैदान शासनाच्या मालकीचे असल्याने ते मिळावे, असे या संदर्भातील अर्जात म्हटले आहे. 

जिल्हाधिकारी यांनाही हे अधिकार नसल्याने त्यांच्याकडून हा अर्ज राज्याच्या महसूल सचिवांकडे उद्या (ता. १७) पाठवण्यात येणार आहे. अलीकडे खासदार महाडिक यांची महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी वाढलेली जवळीक, आमदार अमल महाडिक हे भाजपचे असल्याने ही ताकद वापरून श्री. महाडिक यांचे या प्रदर्शनासाठी मैदान मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पाटील यांचे तपोवन मैदानावर प्रदर्शन
दीड महिन्यापूर्वी आमदार सतेज पाटील यांनीही कृषी व पशुपक्षी प्रदर्शन भरवले होते. महापालिकेत त्यांच्या नेतृत्वाखालील सत्ता असूनही त्यांनी मेरी वेदर मैदानाची मागणी यासाठी केली नाही. तथापि, त्यांच्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात असलेल्या तपोवन मैदानावर त्यांनी हे प्रदर्शन भरवून मतदारसंघातील संपर्क मोहीम कायम ठेवली आहे.

Web Title: Kolhapur News Mahadik-Satej political war