हक्कदार पुजारी हटवा; अन्यथा जनक्षोभ 

हक्कदार पुजारी हटवा; अन्यथा जनक्षोभ 

कोल्हापूर  - श्री महालक्ष्मीच्या मूर्तीची हेळसांड करणाऱ्या आणि राजर्षी शाहू महाराजांचा अवमान करणाऱ्या श्रीपूजकांना पंधरा दिवसांत हटवा; अन्यथा उसळणाऱ्या जनक्षोभाला जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, अशा मागणीचे निवेदन आज श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिले. श्री महालक्ष्मी देवीची घागरा-चोली नेसवून पूजा बांधल्यानंतर भाविकांतून नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर आंदोलन सुरू असूनही प्रशासनाने बघ्याची भूमिका का घेतली, असा जाबही विचारला. दरम्यान श्रीपूजकांना नोटीस काढली असून पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत उद्या (ता. 22) दुपारी चारला बैठक घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. सुभेदार यांनी सांगितले. 

आंदोलनाच्या नियोजनानुसार दुपारी बाराला निवेदन देण्यासाठी समितीचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोचले. मात्र कार्यकर्त्यांची संख्या अधिक असल्याने ताराराणी सभागृहात कार्यकर्त्यांनी भूमिका मांडावी आणि त्यानंतर निवेदन देण्याचा निर्णय झाला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी आंदोलन ब्राह्मणविरोधी नसून केवळ उर्मट श्रीपूजकांविरोधात असल्याचे स्पष्ट करून हक्कदार पुजाऱ्यांना मंदिरातून हटवा, अशी मागणी केली. प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांनी मूर्तीची दुरवस्था, त्याबाबत पुरातत्त्व विभागाने दिलेले आदेश, मंदिरात जमा होणारे दागिने आणि देणग्या, तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका, देवस्थानच्या जमिनींची परस्पर विक्री आदी विषयांवर विवेचन केले. देवस्थान जमिनींबाबत शासनाने चौकशी सुरू केली होती. मात्र भाजपचे सरकार आल्यानंतर ती का थांबली, असा सवालही त्यांनी केला. 1997 ला तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांसमोर देवीला पारंपरिक काठा-पदराचीच साडी नेसवण्याचा ठराव झाला असताना वारंवार श्रीपूजक चुका का करतात, असेही ते म्हणाले. 

उद्योजक आनंद माने यांनी पंढरपूरच्या धर्तीवर महालक्ष्मी मंदिरात श्रीपूजकांच्या नेमणुका पगारी नोकर म्हणून कराव्यात, अशी मागणी केली. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि त्यानंतर येथील न्यायालयात निशिकांत मेथे यांच्यासह दाखल केलेला दावा, याबाबतची माहिती त्यांनी दिली. डॉ. सुभाष देसाई यांनी मागण्यांचे वाचन केले. 

मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, ""देवीच्या लक्ष्मीकरणाचा घाट श्रीपूजकांनी घातला आहे. याबाबतचा अधिक अभ्यास आणि संशोधन देवस्थान समिती व शिवाजी विद्यापीठाने करायला हवे होते. मात्र ते न झाल्याने आम्ही पुढाकार घेऊन याबाबतची माहिती सर्वांसमोर आणली आहे. आंदोलन त्याचाच एक भाग आहे.'' 

माजी महापौर आर. के. पोवार, जिजाऊ ब्रिगेडच्या जयश्री चव्हाण, अनिल घाटगे आदींनी यावेळी विविध मागण्या सादर केल्या. यावेळी उपमहापौर अर्जुन माने, माजी आमदार सुरेश साळोखे, डॉ. संदीप नेजदार, बाबा पार्टे, शरद तांबट, राजू लाटकर, शारंगधर देशमुख, प्रा. जयंत पाटील, चारूलता चव्हाण, देवस्थान समितीच्या सदस्य संगीता खाडे, शिवाजीराव जाधव, शुभांगी पोवार, वैशाली महाडिक, इंद्रजित सावंत, राजू लिंग्रस, पद्माकर कापसे, स्वप्नील पार्टे, हर्षल सुर्वे आदींसह विविध पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

महालक्ष्मी मूर्तीवर पांढरे डाग दिसत आहेत. हे डाग कशामुळे येत आहेत, याबाबत औरंगाबाद केंद्रीय पुरातत्त्व रासायनिक विभागाचे श्रीकांत मिश्रा यांनी काही दिवसांपूर्वी अडीच तास पाहणी केली होती. त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठविला आहे. यावर शुक्रवारी (ता. 23) देवस्थान समितीच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. 
- अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी 

समितीच्या प्रमुख मागण्या : 
- अंबाबाईची पूजा काठा-पदराच्या साडीमध्येच बांधावी. नवरात्रोत्सवातही त्यात बदल नको. 
- अंबाबाई मंदिर असा उल्लेख शासन दरबारी कागदपत्रांत असून जाहीर निवेदने, बोर्डासह रेल्वेलाही श्री अंबाबाई एक्‍स्प्रेस असे नाव द्यावे. 
- श्री पंढरपूर, शिर्डी, तुळजापूर येथील मंदिरांप्रमाणे अंबाबाई मंदिरातील तथाकथित हक्कदार पुजारी हटावेत. सुशिक्षित पुजाऱ्यांची मुलाखत, लेखी परीक्षेद्वारे पगारी नोकर म्हणून नियुक्ती करावी. 
- विद्यमान पुजाऱ्यांनी आपण हक्कदार कसे ठरलो, याचे पुरावे जनतेसमोर सादर करावेत. 
- मंदिरात देवीला येणारे दागिने, साड्या, रोख रक्कम शासकीय खजिन्यात जमा व्हावी. देवस्थानच्या पेटीत, हुंडीत रोख रक्कम व दागिने अर्पण करू न देणाऱ्या पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. त्याचा रोजचा हिशेब जनतेसमोर सादर करावा. 
- व्यसनी, शासकीय कर चुकवणारे, गुन्हे दाखल असलेल्या पुजाऱ्यांना त्वरित मंदिर प्रवेशावर बंदी घालावी. 
- मूर्ती संवर्धनाची जनमाहितीची (गोपनीय नाही) सीडी जाहीर करावी. 
- गाभाऱ्यात शासनातर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. 
- अंबाबाई स्त्रीदेवता असल्यामुळे बहुजन समाजातील स्त्रियांकडूनच पूजा व्हावी. 
- भारतीय राज्यघटनेप्रमाणे महिलांना गाभारा प्रवेश द्यावा. 
- आजवर देवीच्या नावावर मिळवलेल्या कोट्यवधी पैशाचा हिशेब विद्यमान पुजाऱ्यांनी दिला पाहिजे. या पैशाचा उपयोग भक्तांसाठी, मंदिरासाठी आजवर झाला नाही. तो शेतकरी कर्जमुक्ती, विविध सामाजिक कामांसह तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी करावा. 
- सार्वजनिक हित आणि धार्मिक श्रद्धा जपण्यासाठी विद्यमान पुजाऱ्यांना पंधरा दिवसांत मंदिर प्रवेश बंद करावा; अन्यथा जिल्हाधिकारी आणि पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना जनक्षोभाला सर्वस्वी जबाबदार धरले जाईल. 

प्रोसेडिंगची मागणी 
जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या चर्चेचे रीतसर प्रोसेडिंग व्हावे, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली. न्यायालयीन आणि रस्त्यावर उतरून अशा दोन्ही माध्यमांतून आंदोलन सुरू राहणार असून प्रोसेडिंग आवश्‍यक असल्याची भूमिका समितीने मांडली. 

काही काळ गोंधळ 
राष्ट्रवादी सेवादलाचे अनिल घाटगे भूमिका मांडत असताना त्यांना इतर कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. मात्र उद्या (गुरुवार) होणाऱ्या बैठकीत असा प्रकार घडू नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com