श्रीपूजक चुकलेच; मंदिर राजकीय अड्डा नव्हे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

कोल्हापूर - श्री महालक्ष्मीला घागरा-चोली नेसवून श्रीपूजकांनी चूक केलेलीच आहे. मात्र त्याविरोधात आंदोलनापूर्वी देवस्थान समितीने तोडगा काढायला हवा होता. त्याशिवाय श्रीपूजकांवर गुन्हा नोंद करण्यापूर्वी त्यांच्याकडून माफीनामा लिहून घ्यायला हवा होता. आंदोलन चिघळण्यात देवस्थान समिती आणि जिल्हा प्रशासनाचीच मोठी चूक असून उद्या (ता. 22) होणाऱ्या बैठकीतून तोडगा काढण्यासाठी संबंधित सर्व घटकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन आज श्री अंबाबाई भक्त समितीच्या बैठकीत करण्यात आले. उत्तरेश्‍वर महादेव मंदिरात ही बैठक झाली.

कोल्हापूर - श्री महालक्ष्मीला घागरा-चोली नेसवून श्रीपूजकांनी चूक केलेलीच आहे. मात्र त्याविरोधात आंदोलनापूर्वी देवस्थान समितीने तोडगा काढायला हवा होता. त्याशिवाय श्रीपूजकांवर गुन्हा नोंद करण्यापूर्वी त्यांच्याकडून माफीनामा लिहून घ्यायला हवा होता. आंदोलन चिघळण्यात देवस्थान समिती आणि जिल्हा प्रशासनाचीच मोठी चूक असून उद्या (ता. 22) होणाऱ्या बैठकीतून तोडगा काढण्यासाठी संबंधित सर्व घटकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन आज श्री अंबाबाई भक्त समितीच्या बैठकीत करण्यात आले. उत्तरेश्‍वर महादेव मंदिरात ही बैठक झाली. संभाजी साळुंखे, महेश उरसाल, प्रमोद सावंत, मधुकर नाझरे आदींनी यावेळी भूमिका मांडली. 

श्रीपूजकांकडून चूक झाली किंवा मंदिरातून श्रीपूजकांना हटवा, ही आंदोलनाची मागणी असली तरी आंदोलनाला आता जातीय स्वरूप आले आहे. महालक्ष्मी मंदिरातून श्रीपूजकांना हटवा, अशी मागणी करताना इतर मंदिरांचाही विचार व्हायला हवा. देवस्थान समितीतच मोठा भ्रष्टाचार असून समितीच बरखास्त करण्याची मागणी करायला हवी. आंदोलनाच्या माध्यमातून श्री महालक्ष्मी देवीविषयी काही अवमानकारक मजकूर सोशल मीडियावरून प्रसिद्ध होत असून त्यांच्यावर कारवाई व्हावी. पोलिस प्रशासन कारवाई करणार नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा यावेळी देण्यात आला. येत्या काळात श्रीपूजक असोत किंवा आंदोलक दोन्ही घटकांनी आचारसंहिता पाळायला हवी. मंदिराच्या आत कुठल्याही प्रकारचा गोंधळ येथून पुढे खपवून घेतला जाणार नाही. मंदिराच्या पावित्र्यासाठी आणि परिसरात शांतता व सुव्यवस्थेसाठी प्रसंगी आम्ही आंदोलनाबरोबर राहू. मात्र त्याचा राजकीय अड्डा कुणी करत असेल आणि त्यासाठी राजर्षी शाहू महाराजांच्या नावाचा वापर होत असेल तर मात्र जशास तसे उत्तर देणार असल्याचेही समितीने सांगितले. या वेळी राजू चव्हाण, निखिल माळकर, रमेश साळोखे, श्‍याम पाटील, संजय पाटील, अरुण तिबिले, अवधूत भाटे, नितीश कुलकर्णी, गोविंद देशपांडे, महेश धनवडे, सचिन पाटील, राहुल पाटील, रवींद्र भोसले, सुनील पाटील, सुधाकर सुतार, राजेंद्र सूर्यवंशी, राजू जाधव (एनडी), मयूर तांबे आदी उपस्थित होते.

Web Title: kolhapur news mahalaxmi mandir