श्रीपूजक ठाणेकर यांना मंदिरात प्रवेशास मनाई 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

कोल्हापूर - कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी श्रीपूजक अजित ठाणेकर व त्यांचे वडील बाबूराव ठाणेकर यांना अनिश्‍चित काळासाठी महालक्ष्मी मंदिर परिसरात प्रवेशासाठी मनाई करण्यात आल्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या श्री अंबाबाई मंदिर समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 

कोल्हापूर - कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी श्रीपूजक अजित ठाणेकर व त्यांचे वडील बाबूराव ठाणेकर यांना अनिश्‍चित काळासाठी महालक्ष्मी मंदिर परिसरात प्रवेशासाठी मनाई करण्यात आल्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या श्री अंबाबाई मंदिर समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 

""ठाणेकर परिवार मंदिरात येऊ नयेत याची काळजी घेण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जबाबदारी घेतली आहे,'' असे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सांगितले. ""त्यांना कायद्यानुसार मंदिरात प्रवेशासाठी बंदी घालता येते का हे पाहिले पाहिजे, कायद्याच्या कसोटीवर याचा निकाल होईपर्यंत त्यांना मंदिर परिसरात प्रवेशासाठी मनाई केली आहे.'' 

जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, ""महालक्ष्मीला घागरा-चोळी नेसवण्यावरून श्रीपूजक अजित ठाणेकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काल (गुरुवार) करण्यात आली होती. याच वेळी त्यांच्यावर कोणती कारवाई करणार हे ठरवण्यासाठी समन्वय समिती नियुक्त केली होती. त्यानुसार आज झालेल्या बैठकीत ठाणेकर कुटुंबीयांना यावर ठोस तोडगा निघेपर्यंत मंदिरात प्रवेशास मनाई करण्याचे ठरले.'' 

अंबाबाई समितीच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, ""पंढरपूरप्रमाणे अंबाबाई मंदिरातही श्रीपूजक हटाव, अंबाबाई बचाव' ही भूमिका कायम आहे. जोपर्यंत पुजारी हटत नाही, तोपर्यंत हा लढा सुरू राहील. दरम्यान, देवीला घागरा-चोळी घालणारे अजित ठाणेकर व त्यांचे वडील बाबूराव ठाणेकर यांना मंदिरात प्रवेशबंदी करावी, अशी मागणी समितीने केली. ठाणेकर मंदिरात दिसले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याला समन्वय समिती जबाबदार राहणार नाही. ठाणेकरांच्या मंदिरातील मनमानी कारभाराबद्दल भाविकांत तीव्र भावना आहेत. काल (गुरुवारी) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबतच्या बैठकीतही ठाणेकरांनी, "देवीला घागरा-चोळी घातल्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो', असे म्हणणे अपेक्षित होते; मात्र त्यांनी उद्दामपणा दाखवल्याच्या तीव्र भावना समितीतील सर्वच सदस्यांनी व्यक्त केल्या. त्यामुळे त्यांना मंदिरात प्रवेशबंदी झालीच पाहिजे.'' 

प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई म्हणाले, ""श्रीपूजकांची मनमानी वाढली आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी महालक्ष्मी मंदिरात आल्यानंतर त्यांनी सर्वसामान्य भाविकांप्रमाणेच दर्शन घेतले; मात्र 10 तारखेस राज्यपाल दर्शनासाठी येणार होते. त्यावेळी गाभाऱ्यात राज्यपालांना बसण्यासाठी गाद्या ठेवण्यात आल्या होत्या. हे कितपय योग्य आहे. भाविक हा भाविक आहे. त्यांना गाद्या देण्यामागील हेतू काय? श्रीपूजकांची मनमानी थांबविण्यासाठी शासनाने मंदिरात मानधनधारी पुजारी नियुक्त करून मंदिरात जमा होणाऱ्या देणग्या शासन जमा करून घ्याव्यात.'' 

या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, डॉ. सुभाष देसाई, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, बाबा पार्टे, वसंतराव मुळीक, राजेश लाटकर, चंद्रकांत पाटील, इंद्रजित सावंत उपस्थित होते. 

"इतर श्रीपूजकांबद्दल राग नाही' 
अजित ठाणेकर व त्यांचे वडील बाबूराव ठाणेकर कुटुंबीयांशिवाय इतर कोणत्याही श्रीपूजकांबद्दल राग नाही. "ठाणेकर पिता-पुत्र हटाव' मागणीसाठी आजची बैठक होती. दरम्यान, सोशल मीडियावर याला जातीय रंग देण्याचे काम सुरू आहे. हे तत्काळ थांबविले पाहिजे, असे आवाहनही शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी आज केले. 

अंबाबाई मंदिर समन्वय समिती अशी 
दिलीप देसाई, डॉ. सुभाष देसाई, सुरेश साळोखे, संजय पवार, दिलीप पाटील, विजय देवणे, आर. के. पोवार, राजू लाटकर, वसंत मुळीक, जयश्री चव्हाण, ऍड. चारुशीला चव्हाण, सचिन तोडकर, बाबा पार्टे, अनंत माने व शरद तांबट यांची समन्वय समितीत नियुक्ती केली आहे. 

Web Title: kolhapur news mahalaxmi mandir