करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव रविवारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

कोल्हापूर - साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव रविवारी (ता. १) तर शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराराणी यांचा रथोत्सव सोमवारी (ता. २) होत असून या लोकोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. 

कोल्हापूर - साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव रविवारी (ता. १) तर शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराराणी यांचा रथोत्सव सोमवारी (ता. २) होत असून या लोकोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. 

दरम्यान, नयनरम्य आतषबाजी, एलईडी लाईट इफेक्‍टस्‌ आणि रांगोळ्या व फुलांच्या आकर्षक पायघड्या यंदाच्या सोहळ्याचे आकर्षण असेल.

शिवछत्रपती, ताराराणींचा रथोत्सव
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिवछत्रपती व महाराणी ताराराणी यांची आठवण जागृत राहावी यासाठी १९१४ मध्ये रथोत्सव सुरू केला. आज जरी शिवाजी महाराज हिंदुस्थानचे राष्ट्रपुरुष असले तरी इंग्रजांच्या राजवटीत त्यांचे नाव घेऊन एखादा उत्सव साजरा करणे, ही खूपच क्रांतिकारी घटना होती. अशा वेळी राजर्षी शाहू महाराजांनी जोतिबाच्या चैत्र यात्रेनंतर येथे शिवाजी महाराज व ताराराणी रथोत्सवाची सुरुवात केली. सोमवारी (ता. २) हा रथोत्सव होईल. रथोत्सव सोहळ्यात सर्वांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे, असे आवाहन छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टने केले आहे. 
 

महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे झुणका-भाकरीचा प्रसाद तर न्यू गुजरी मित्र मंडळातर्फे संपूर्ण गुजरी आणि महाद्वार मार्गावर व्हाईट मेटल लाईटस्‌ उजळणार आहेत. मुंबई आणि सांगलीच्या रंगावलीकारांच्या रांगोळ्या असतील आणि पंधराशे किलो प्रसाद मंडळातर्फे वाटप केला जाईल. त्याशिवाय गुजरी कॉर्नरला अंबाबाईची भव्य प्रतिकृती उभी केली जाणार आहे. 

रस्त्यांचे काम

रथोत्सव मार्गावरील रस्त्याच्या पॅचवर्क कामाला प्रारंभ झाला असून दोन दिवसांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. त्याशिवाय अंबाबाई मंदिर व तुळजाभवानी मंदिरात रथाची स्वच्छता आणि इतर कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. 

सलग सुट्ट्यामुळे गर्दी

गुरुवार (ता. २९) पासून सलग चार दिवस सार्वजनिक सुट्या आल्याने मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी राहणार आहे. उन्हाच्या तडाख्याच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांना विविध सुविधा दिल्या जाणार आहेत. त्यासाठी देवस्थान समितीने नियोजन केले आहे.

अंबाबाई रथोत्सव
दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हा रथोत्सव होतो. रथोत्सवाच्या निमित्ताने संस्थानकालीन परंपरा अनुभवण्यास मिळते. अंबाबाईचे तसेच संस्थानकालीन वैभव भाविकांना पाहण्यास खुले करण्याच्या उद्देशानेच या रथोत्सवास आता लोकोत्सवाचे स्वरूप अाले आहे. २०१० पासून चांदीच्या रथातून देवी दर्शन देण्यासाठी बाहेर पडते. 
 

Web Title: Kolhapur News Mahalaxmi Rathoushav on Sunday