आता एकच मागणी "हटाओ पुजारी' 

आता एकच मागणी "हटाओ पुजारी' 

कोल्हापूर - श्री महालक्ष्मी मूर्तीची हेळसांड करणाऱ्या आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा अवमान करणाऱ्या श्रीपूजकांना मंदिरातून हटवा, असे साकडे आज शिवसेनेसह विविध पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घातले. "अंबाबाईच्या नावानं चांगभलं', "अंबामाता की जय', "आता एकच मागणी - हटाओ पुजारी' अशा तासभर घोषणा मंदिर परिसरात देण्यात आल्या. दरम्यान आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून बुधवारी (ता. 21) दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना भेटून पुढील दिशा ठरवण्याचा निर्णय बैठकीत झाला. यावेळी मंदिरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

श्री महालक्ष्मीस घागरा-चोली परिधान करून पूजा बांधल्याने भाविकांच्या भावना दुखावल्याच्या भूमिकेतून गेले अकरा दिवस विविध पक्ष, संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. त्याला श्री अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजकांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून उत्तरेही दिली. मात्र श्रीपूजकांनी गुन्हा नोंद झाल्याने आंदोलनकर्त्यांच्या समन्वय बैठकीच्या मागणीला नकार दिला. त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय काल झालेल्या बैठकीत झाला. त्याचा पहिला टप्पा म्हणून आज श्री महालक्ष्मीला साकडे आंदोलन झाले. जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अद्यापही याबाबत कोणतीच ठोस भूमिका न घेतल्याने यावेळी तीव्र भावना व्यक्त झाल्या. 

आज सकाळी दहा वाजता भवानी मंडपात सर्व कार्यकर्ते जमले आणि घोषणा देत सर्वांनी महालक्ष्मी मंदिरात प्रवेश केला. रविवार असल्याने पर्यटकांची गर्दीही मोठी होती. त्यातच आंदोलनकर्त्यांनी थेट मंदिरात प्रवेश केल्याने काही काळ दर्शन रांग रेंगाळली. मंदिरात प्रवेश केल्यानंतर मोठी घोषणाबाजी सुरू झाली आणि स्वाभिमानी संघटनेचे सचिन तोडकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी सोवळ्यात गाभाऱ्यातून दर्शनाचा आग्रह धरला. मात्र आणखी गोंधळ निर्माण होऊ नये, या भूमिकेतून पोलिसांनी त्यांना दर्शनास नकार दिला. सुमारे अर्धा तास मंदिरात घोषणाबाजी करून श्री महालक्ष्मीस साकडे घालण्यात आले. त्यानंतर मंदिर परिसरात पुन्हा बैठक सुरू झाली. 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, ""भाविकांच्या भावनांचा अनादर होऊनही श्रीपूजकांची समन्वयाची भूमिका नाही. जिल्हा प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. त्यामुळे आता थेट त्यांनाच भेटून आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल.'' 

प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई म्हणाले, अकरा दिवस आंदोलन सुरू असले तरी जिल्हा प्रशासन कोणतीच भूमिका घेत नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि काही नेत्यांनी त्यासाठी प्रशासनाला आदेश दिले आहेत का, असा सवाल उपस्थित केला. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला. माजी आमदार सुरेश साळोखे यांनी पंढरपूरच्या धर्तीवर श्रीपूजकांना हटवावे, असे मत मांडले. माजी नगरसेवक राजू लाटकर म्हणाले, ""राजर्षी शाहूंचा अवमान कोल्हापूरने कधीही खपवून घेतलेला नाही. त्यामुळे श्रीपूजकांना हटवा.'' ""रितसर पावती करूनही पोलिसांनी श्री महालक्ष्मीचे दर्शन सोवळ्यात घेऊ दिले नाही. दहा दिवसांची मुदत आम्ही जिल्हा प्रशासनाला दिली आहे. त्यानंतरही सकारात्मक कार्यवाही न झाल्यास गाभाऱ्यात जाऊन आम्ही देवीची पूजा बांधू,'' असा इशारा स्वाभिमान संघटनेचे सचिन तोडकर यांनी दिला. मंदिर परिसरात अंबाबाई मंदिर असे फलक लावणार असल्याचे स्वप्नील पार्टे यांनी सांगितले. डॉ. सुभाष देसाई, माजी महापौर आर. के. पोवार, स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार, शारंगधर देशमुख, शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, सुजीत चव्हाण, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शुभांगी पोवार, शहरप्रमुख रिया पाटील, इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, शिवसेना करवीर उपतालुकाप्रमुख सुनील पोवार, अवधूत साळोखे, शरद तांबट, सुहास साळोखे, चंद्रकांत पाटील, साताप्पा शिंगे, राजू यादव, महादेव पाटील, शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे फिरोजखान उस्ताद, शिरीष जाधव, अनिल कदम, सुजाता सोहोनी, दीपाली शिंदे, वहिदा मुजावर, सुनीता राऊत, शीतल तिवडे, संध्या भोसले, सुजाता चव्हाण, सुमन वाडेकर, दिलकत सय्यद, मंजिरी वालवालकर, नेहा मुळीक आदींचा सहभाग होता. 

आई, श्रीपूजकांना सुबुद्धी दे...! 
""आई, तुझ्या पूजेसाठी या आंध्रातून जे सेवक आणले, त्यांनी घागरा-चोळी नेसवून तुला अवमानित केले. राजर्षी शाहू महाराजांची सनदही तथाकथित ठरवली. तुझ्याभोवती ज्या श्रीपूजकांनी वेढा घातला आहे, त्यांना हटव आणि अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांना सुबुद्धी दे,'' असे साकडे श्री महालक्ष्मीस घालण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com