`ओटी`च त्यांच्या शिक्षणाचा आधार

भूषण पाटील
मंगळवार, 12 जून 2018

देवीबद्दल श्रद्धा 
ओटीच्या साहित्य विक्रीच्या माध्यमातून या चौघांची घनिष्ट मैत्री झाली आहे. या चौघांना देवीबद्दल अपार श्रद्धा आहे. म्हणूनच दर मंगळवारी आणि शुक्रवारी निघणाऱ्या देवीच्या पालखी सोहळ्यात ते उत्साहाने सहभागी होतात. अंबाबाईवरील श्रद्धेतून त्यांनी ओटी विक्री करून आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे.

कोल्हापूर - वेळ मिळत नाही, घरचे मनासारखे शैक्षणिक साहित्य देत नाहीत, इंग्रजी शाळेत घालत नाहीत, अशा तक्रारी अनेक मुले करताना दिसतात; मात्र काही मुले अशीही आहेत, जी आपल्या घरच्या आर्थिक परिस्थितीचे भान ठेवून काम करतात. यातून ते आपला शैक्षणिक खर्च, तर भागवतातच शिवाय कुटुंबालाही आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न करतात. लक्ष्मी संपगावी आणि दर्शन संपगावी ही भावंडे याचे उत्तम उदाहरण आहेत. अंबाबाई मंदिर परिसरात पर्यटकांना सुटीच्या कालावधीत ओटीचे साहित्य आणि रांगोळी विकून ते आपला शैक्षणिक खर्च भागवण्याचा प्रयत्न करत आहेत.  

मूळचे कर्नाटकातील महादेव संपगावी हे कामाच्या शोधत कुटुंबासह कोल्हापुरात आले. सध्या ते हणमंतवाडी येथे राहत आहेत. महादेव हे हमाली काम करतात, तर त्यांची पत्नी अंबाबाई मंदिराच्या आवारात रांगोळीच्या साहित्याची विक्री करते. या दाम्पत्याची मोठी मुलगी लक्ष्मी आता चौथी पास झाली, तर छोटा मुलगा दर्शन तिसरीत गेला आहे. या दोघांचे वय लहान असले तरी त्यांना असलेली समज वाखाणण्यासारखी आहे. घरच्या आर्थिक स्थितीची त्यांना जाणीव आहे. सुटीच्या दिवसात मंदिरात पर्यटकांची गर्दी असते. 

या काळात लक्ष्मी आणि दर्शन मंदिराच्या आवारात ओटीच्या साहित्याची ते विक्री करतात. मे महिना आणि दिवाळी सुटीव्यतिरिक्त शनिवारी आणि रविवारीही साहित्याची विक्री करून मिळणाऱ्या पैशातून ते आपला शैक्षणिक खर्च भागवतात. लक्ष्मी आणि दर्शनप्रमाणेच दिशा शिंदे आणि रामेश्‍वरी शिंदे या बहिणीसुद्धा सुटीत मंदिराच्या आवारात ओटीच्या साहित्याची विक्री करतात. या चौघांप्रमाणेच अंबाबाई मंदिराचा परिसर अनेकांच्या कुटुंबांचा आधार आहे. ओटीचे साहित्य, गजरा, खेळणी विकून शिक्षण पूर्ण करण्यासाठी धडपडत आहेत.

Web Title: Kolhapur News Mahalxmi oti helps in education