मानवनिर्मित आपत्ती कमी होण्याची गरज : चंद्रकांत पाटील

मानवनिर्मित आपत्ती कमी होण्याची गरज : चंद्रकांत पाटील
मानवनिर्मित आपत्ती कमी होण्याची गरज : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर - नद्या व नाल्यांकाठी इमारती बांधल्याने मानवनिर्मित आपत्ती निर्माण होत आहे. विकासाकडे पाऊल टाकताना निरनिराळ्या आपत्तींच्या दिशेने होणारी वाटचाल धोकादायक आहे. त्यामुळे मानवनिर्मित आपत्ती कमीत कमी होऊन विकास घडावा, अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे व्यक्त केली. शिवाजी विद्यापीठात एक जूनपासून सुरू असलेल्या आव्हान राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, महापौर हसीना फरास प्रमुख म्हणून उपस्थित होते. शिबिराचा लोककला केंद्रात समारोप झाला.

पाटील म्हणाले, ""शिबिरातून प्रत्येक जिल्ह्यात तीस जणांचा आपत्ती व्यवस्थापनासाठीचा गट तयार होत आहे. या गटाने आता महाविद्यालयांवर जाऊन आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना द्यावे. दुर्घटना होऊ नये, यासाठी दक्षता बाळगणे हा आपत्ती व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग आहेच; पण त्याच्याइतकेच आपत्तीच्या क्षणी आपद्‌ग्रस्तांना मदत करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ असणे हेही महत्त्वाचे आहे. चॅन्सलर्स ब्रिगेडच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला आता आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल.'' त्यांनी गतवर्षी रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना आणि त्यानंतरच्या कालखंडातील बचाव व मदत कार्य, माळीण दुर्घटनेनंतर झालेले गावाच्या पुनर्वसनाचे कार्य, ठाणे येथील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतून पाच शालेय विद्यार्थ्यांना तासानंतरही वाचविण्यात आलेले यश, असे प्रसंग सांगून आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व शिबिरार्थींना सांगितले. देशाच्या आपत्ती व्यवस्थापनात मोलाचे योगदान देणाऱ्या एन.डी.आर.एफ.च्या जवानांचीही त्यांनी प्रशंसा केली.

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, ""जिल्ह्यात येणाऱ्या महापुराच्या आपत्तीचा आढावा घेत सर्व विभाग सज्ज आहेत. ज्या गावात महापूर येतो त्या 129 गावांतील 25 ते 50 वयोगटांतील ग्रामस्थांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले आहे. व्हाईट आर्मी व जीवनज्योतीतर्फे पन्नास गावांत प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आपत्ती आल्यानंतर आपत्तीत अडकलेल्यांना तत्काळ मदतीसाठी आपण कमी पडतो. रिलीफ व रिहॅबिलिटेशनमध्ये आपले काम चांगले आहे.''
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, ""विद्यापीठ एनएसएसच्या माध्यमातून एक व्यक्ती एक पेंडी, एक मूठ धान्य असे उपक्रम राबवून गतवर्षी दुष्काळग्रस्त भागातील नागरिक व जनावरे यांना दिलासा देण्याचे काम करण्यात आले. त्याचप्रमाणे शेततळी, छोटे बंधारे यांच्या बांधकामात श्रमदान केले.'' यावेळी वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाच्या "माध्यमविद्या' विशेषांकाचे प्रकाशन झाले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे, तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) निरीक्षक एस. डी. इंगळे उपस्थित होते. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी राज्यपाल तथा कुलपती श्री. विद्यासागर राव यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. डॉ. डी. के. गायकवाड यांनी आव्हान शिबिराचा आढावा घेतला. डॉ. तृप्ती करेकट्टी आणि नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.  आपत्ती व्यवस्थापनाच्या जनजागृती फेरीदरम्यान सोलापूर विद्यापीठाची स्वयंसेवक विद्या कदम हिने निधी गोळा केला. कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र वडजे व विद्या यांनी तो जिल्हाधिकारी श्री. सुभेदार यांच्याकडे सुपूर्द केला.

पुणे व सातारा जिल्हा सर्वोत्कृष्ट
आव्हान शिबिरात पुणे व सातारा जिल्ह्यांचे संघ सर्वोत्कृष्ट ठरले. त्यांना उत्कृष्ट कॉन्टिंजेन्ट फिरता चषक देण्यात आला. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे प्रा. अतुल अकोठोर व पुण्याच्या सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या प्रा. सारिका पेरणे यांना उत्कृष्ट कॉन्टिंजेन्ट लीडर, तर महेश गणेश बन (महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक), कुणाल मानकर (उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), हर्षा सुनील भट्ट (महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक) व समिका सावंत (बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली) यांना उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्काराने गौरविण्यात आले. जनजागृती फेरीमधील सर्वोत्कृष्ट सहभागासाठीचा फिरता चषक मुंबई विद्यापीठाने पटकावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com